
सामाजिक कार्याची दखल; पत्रकारितेतील ज्येष्ठ मान्यवर सुकृत खांडेकर यांच्या हस्ते ठाण्यात सन्मान
लोणी : आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार समाजभूषण कैलासराव बबनराव गायकवाड यांना दैनिक ‘झुंजार केसरी’च्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिष्ठेचा ‘पत्रकार भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाणे शहरात आयोजित कार्यक्रमात पत्रकारितेतील ज्येष्ठ मान्यवर सुकृत खांडेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ठाणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, दैनिकाचे मुख्य संपादक मुनीर खान, संपादक अंकुश काटकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पत्रकारिता करताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वंचित, दिव्यांग आणि निराधारांसाठी भरीव योगदान
कैलासराव गायकवाड यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजातील तळागाळातील वंचित घटकांचे राहणीमान उंचावणे, निराधार व विधवा महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळवून देणे, दिव्यांगांचे पुनर्वसन करणे, तसेच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
दिव्यांग व्यक्तींसाठी शस्त्रक्रिया, व्हीलचेअर, कुबड्या, पांढरी काठी, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, दिव्यांग प्रमाणपत्रे आणि विमा सुविधांसाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. तसेच कलावंतांना मानधन मिळवून देणे, सवलतीचे पास उपलब्ध करून देणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
विमुक्त व भटक्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. पाबळ येथील मतिमंद मुलांची शाळा, वाघोली येथील भटक्या-विमुक्त समाजातील मुलांची शाळा, आश्रमशाळा आणि बालगृहे अशा विविध क्षेत्रांत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत काम केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या समाजभूषण पुरस्कारानेही गौरव
गायकवाड यांना आजवर शेकडो पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे लोणीसह आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पुरस्कारप्राप्त कैलासराव गायकवाड यांचे आनंद बारवकर, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पुणे येथील बीव्हीजीएस संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण गोरडे यांनी अभिनंदन केले.




