
दौंड तालुक्याचे पर्यावरणीय वैभव : निसर्ग आणि मानव यांचे सहअस्तित्व
पर्यावरणाविषयी बोलताना आपण अनेकदा जागतिक, राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील प्रश्नांचा विचार करतो. मात्र पर्यावरणाची खरी ओळख आपल्या स्थानिक परिसरातूनच होत असते. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दौंड तालुक्याच्या समृद्ध पर्यावरणाचा, जैवविविधतेचा आणि निसर्गसंपदेचा आढावा घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
दौंड तालुका हा भीमा नदी, ऐतिहासिक रेल्वे जंक्शन आणि एसआरपीएफ केंद्रामुळे राज्यभर परिचित आहे. सुपीक काळी माती, पाण्याची उपलब्धता आणि बागायती शेतीमुळे हा भाग कृषी क्षेत्रात विशेष महत्त्व राखून आहे. परंतु दौंडची ओळख केवळ शेतीपुरती मर्यादित नसून येथे आढळणारी समृद्ध जैवविविधता देखील तितकीच उल्लेखनीय आहे. विविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी, सस्तन प्राणी, सरीसृप आणि कीटक यांच्या असंख्य प्रजाती या परिसरात निसर्गाचा समतोल राखत आहेत.
दौंड तालुक्याच्या एका बाजूने जीवनदायिनी भीमा नदी वाहते, तर दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण शेतीक्षेत्र, गवताळ माळराने, जलस्रोत आणि मानवी वसाहतींचा अनोखा संगम दिसून येतो. नदीकिनारील परिसंस्था, शेतीक्षेत्र, माळराने आणि झुडपी वनराई यांमुळे विविध अधिवास निर्माण झाले असून अनेक वन्यजीवांना येथे सुरक्षित आश्रय मिळाला आहे.
ऊस शेतीच्या वाढत्या विस्तारामुळे काही वन्य प्राण्यांनी या बदलत्या वातावरणाशी यशस्वीरीत्या जुळवून घेतले आहे. बिबट्या, तरस, कोल्हा, रानमांजर, उदमांजर यांसारखे शिकारी प्राणी या परिसरात अधूनमधून आढळतात. काळ्या मातीत मोठ्या प्रमाणावर आढळणारे उंदीर हे अनेक सापांचे प्रमुख खाद्य असल्याने नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे यांसारख्या विषारी सापांची उपस्थिती येथे लक्षणीय आहे. याशिवाय पट्टेरी रेती सर्पासारखे दुर्मिळ आणि बिनविषारी साप देखील या भागात आढळतात. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी सापांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ते शेतीतील उंदरांचे नैसर्गिक नियंत्रण करतात.
दौंड तालुका पक्षीवैविध्यासाठीही विशेष ओळखला जातो. गव्हाणी घुबड, शृंगी घुबड आणि रक्तलोचन घुबड यांसारख्या घुबडांच्या विविध प्रजाती येथे आढळतात. भीमा नदी व परिसरातील जलस्रोतांमध्ये चित्रबलाक, ग्रे हेरॉन, पाणकावळे आणि इतर अनेक जलपक्ष्यांची वस्ती आहे. तसेच सर्पगरुड, नेपाळी गरुड आणि इतर शिकारी पक्षी शेती व माळरान परिसरात सहजपणे दिसून येतात. हे पक्षी उंदीर, कीटक आणि इतर लहान प्राण्यांवर नियंत्रण ठेवून पर्यावरण संतुलित राखण्यास मोलाची मदत करतात. याशिवाय लेपर्ड गेकोसारख्या दुर्मिळ सरपटणाऱ्या प्रजाती देखील या परिसराच्या जैवविविधतेत भर घालतात.
गेल्या अनेक वर्षांपासून जखमी, अडकलेल्या आणि संकटग्रस्त वन्यजीवांच्या बचाव व संवर्धनासाठी कार्य करताना आम्हाला दौंड तालुक्याच्या जैवविविधतेचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाली. प्रत्येक बचाव मोहिमेमधून निसर्गाचे नवे पैलू अनुभवायला मिळाले. या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे.
आज वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, रस्त्यांचे जाळे, बदलती शेती पद्धती आणि नैसर्गिक अधिवासांचे घटते क्षेत्र यांमुळे वन्यजीव आणि पर्यावरणासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण, नैसर्गिक अधिवासांचे जतन आणि पर्यावरण शिक्षण यांना प्राधान्य देणे काळाची गरज आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प करूया —
“निसर्गाचे संरक्षण म्हणजे आपल्या भविष्याची सुरक्षित गुंतवणूक.”
दौंड तालुक्याचे समृद्ध पर्यावरण, वन्यजीव आणि नैसर्गिक वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरण सुरक्षित राहिले तरच मानव आणि वन्यजीव यांचे सहअस्तित्व कायम राहील आणि भावी पिढ्यांना हा अमूल्य नैसर्गिक ठेवा अनुभवता येईल.
🌱 संकल्प
“जैवविविधता जपूया, पर्यावरण वाचवूया आणि निसर्गाशी मैत्री करूया.”
– गायत्री नचिकेत आवधानी
मानद वन्यजीव रक्षक, दौंड तालुका (पुणे जिल्हा)
ईको दौंड – वन्यजीव बचाव व पर्यावरण संवर्धन 🌿🐆🦉🐍🌍








