राजकीय

मृत्यूच्या दांडीवर लोककलेचा जीवघेणा खेळ खेळणाऱ्या रघुवीरचा पद्मश्रीने गौरव!! -विश्वास पाटील

img 20260127 wa0718

रघुभाऊ खेडकरला मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. गेले जवळपास तीनशे वर्षे माळामुरडाच्या दलित पददलित कलावंतांनी आपल्या गणागोतांसह आणि सोयऱ्यांसह पोटाला चिमटे घेऊन जी “तमाशा” नावाची लोककला जोपासली. तमाशाच्या बोर्डावरसुद्धा जे अभिजात संगीत, नाट्य, विनोद आणि अभिनय अशा कलांचे बहुजनांसाठी संवर्धन केले. त्यांच्या त्या कष्टावर उमटलेली राज्यमान्यतेची मोहर म्हणजे रघुभाऊची पद्मश्री मानावी लागेल.

राजीव गांधीच्या बॉम्बस्फोटातील झालेल्या मृत्यूनंतर लगेचच “राजीव गांधी हत्याकांड” या नावाचा वग रघुनाथच्या तमाशा मंडळाने बसवला होता. ज्यामध्ये लाखो रुपये खर्च करून बांधलेले हेलिकॉप्टर तारेच्या साह्याने प्रेक्षकातून स्टेजवर यायचे. बॉम्बस्फोटाचे साहस दृश्य ट्रीक्शिंगच्या सीनच्या ट्रिकसिनच्या साह्याने दाखवली जायचे. रघुभाऊंची बहीण मंदाराणी या स्त्री असून राजीव गांधीचा अतिशय जबरदस्त असा पुरुषी रोल निभावून न्यायच्या. सोनिया गांधीचे काम त्यांच्याच किरकोळ बांध्याच्या अलकाताई या करायच्या. प्रचंड खर्च करून बसवलेले हे वगनाट्य तेव्हा गावखेड्यात तुफान चालले होते.

एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा स्टेजवरचा देखावा जवळ आला. तेव्हा रघुनाथच्या सहा सात वर्षाच्या भाच्याने बबलूने चुकून पाठीमागच्या पेटीचे झाकण उघडले. टायमिंग पूर्वी आपोआप स्विचऑन होऊन मोठ्या बॉम्ब ब्लास्टचा धमाका उडाला. त्या स्फोटात वामनमामा नावाच्या सोंगाड्याच्या कवटीचे तुकडे होऊन मेंदू बाहेर पडला. छोटा बबलू प्रचंड जखमी होऊन विकलांग बनला. रंगमंचाला अक्षरश: त्या मूळ बॉम्बस्फोटाच्या पेरंबुर ठिकाणाची अवकळा आली.

या अपघाताचा ताण सहन होऊन प्रक्षुबुद्ध झालेल्या रघुनाथ नावाच्या या कलावंताने लाखो रुपये खर्च करून बनवलेले ते हेलिकॉप्टर वैफल्यग्रस्त स्थितीत कुऱ्हाडीने तोडून टाकले.

त्या नंतर हा तुफान गर्दी खेचणारा प्रयोग डोळ्यातून वाहणारे रक्त पुसत बंद करावा लागला. पण घेतलेले कर्ज आणि त्यावरचे व्याज काही झोपले नव्हते. संपूर्ण कुटुंबावर आपल्या ट्रका आणि सामान बारदानासह सारे काही गहाण टाकून स्वतःच्याच मिळकतीवर भाड्याने जगायचे दुर्दैवी दिवस उगवले.

गेली अनेक वर्ष मी पाहतो आहे. महाराष्ट्रातील इतर परंपरागत ढोलकी फडाचा रघुवीर खेडकर सह कांताबाई हा एक नामांकित फड त्यांनी तो मोठ्या जिद्दीने, जिवाचा रक्तभात करत इथपर्यंत रेटत आणला आहे इतकेच. अन्यथा अंगात हाडामांसाशी चिकटलेला आर्थिक विवंचनेचा कॅन्सर सहन करत, जीवनाशी पैजा घेत जगणे हे काही त्यांच्यासाठी सोपे नव्हते.

पालीच्या यात्रेत दहा वर्षांपूर्वी नांगरलेल्या शेतात या फडाच्या मोटारी पार्क केल्या गेल्या होत्या. त्यावेळी मी कांताबाईंशी गोष्टी करताना, जीवनभर त्यांनी कष्टाने जो लोककलेचा रथ हाकला. तो हाकताना पदोपदी त्यांना जे कष्ट , अडवणूक, नाडवणूक, कर्जदाराकडून होणारे अपमान हे सारे आठवले असावे. कांताबाई डोळे पुसत सहज बोलून गेल्या. “साहेब यशकीर्तीचा एवढा मोठा समिंदर पार करून आले. पण गाठीला त्या दर्यातल्या पाचसहा बादल्या पण उरल्या नाहीत बघा.” अन मग अचानक उमाळा फुटून त्यांच्या डोळ्यातून जशा काही धबधब्या सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या.

गरिबीत जन्माला आलेल्या कांताबाईला साधे घुंगरू खरेदी करणे परवडत नव्हतं. तेव्हा बाभळीच्या वाळक्या शेंगा पायाला बांधून त्या नृत्य शिकल्या होत्या. मध्येच लोककलेच्या सिंहासनावर रंग सम्राटासारखा बसलेला कुंकवाचा धनी तुकाराम खेडकर जग सोडून गेले. तरी त्या नेटाने उभ्या राहिल्या. सवती मत्सर म्हणजे काय याचा डागण्या देणारा अनुभव त्यांनी सोसला. कोकणामध्ये सवतीच्या दर्शनाबरोबर कांताबाईंचा सुंदर चेहरा तव्यात करपलेल्या भाकरी सारखा काळा पडला. पण तरीही नटेश्वराच्या आणि रसिकजणांच्या पाठिंब्याने त्यांनी आपल्या फडाला मोठे नाव मिळवून दिले.

“विठू माझा लेकुरवाळा” अशा भूमिकेतूनच आपल्या साऱ्या बहिणींसह इतर कलावंतांचा मेळा रघुभाऊंनी सांभाळला. जीवनावर प्रचंड श्रद्धा असलेला हा रघुभाऊ नावाचा माणूस. आज इथं तर उद्या तिथं असा रोजचा प्रवास फडा बरोबर चालू. पण रघुभाऊचा जो देव्हारा आणि त्यातील देवतांची संख्या लक्षात घेता एक भरलेली बैलगाडी न्यावी तसा ते आपला भव्य देव्हारा सोबत घेऊन प्रवास करतात. नुसता प्रवास नव्हे तर रोज किमान दोन अडीच तासाची श्रद्धापूर्वक पूजापाठांची ती त्यांची कडी शिस्त आजही चालू आहे. त्यांच्या भगिनी अलकाताई यांच्यासारखी प्रचंड आणि चौफेर वाचन करणारी वाचक मी पाहिली नाही.

पंचवीस वर्षा मागचा तो दिवस माझ्या जीवनातील मर्मबंधातील ठेव ठरावा असा अजून माझ्या लक्षात आहे. कांताबाई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मुलाखतीसाठी बाळासाहेब थोरात यांनी आपल्या संगमनेर मधील साखर कारखान्याच्या पाठीमागे टेकडीवर उंचावरच आमच्यासाठी एक जुने रेस्ट हाऊस निवडले होते. सोबत दलित कवी दिनकर साळवे होता. तिथल्या भिरभिर वाऱ्यात छतावरचा पत्रा वाजत असतानाच आमचा गप्पांचा फड रंगला. काही क्षणातच मला जाणवले की, थंडी वाऱ्यातून मोठ्या कष्टाने आपल्या लेकराना बचावणाऱ्या एखाद्या गरुडाच्या मादीसारखं करारीपण आणि हिम्मत कांताबाईंच्या अंगात सळसळते आहे.

रघुची बहीण मंदाराणी. कमालीची जिद्दी. नागिनी सोबत नृत्य करायचे तिच्या मस्तकात शिरले. मग तडक फडामध्ये एका गारुड्याचे आणि जिवंत नागिणीचे आगमन झाले. मंचावर रोज रात्री मंदा आणि नागिन या दोघीही डोलू लागल्या. पण खेळ संपल्यावर रोज रात्री नव्या गावासाठी प्रवास करावा लागायचा. तेव्हा त्या नागिणीला कलाकारांच्या बसमध्ये मधल्या दांडीला गाठोड्यात घालून अलगद बांधून ठेवले जायचे. तिचे रात्रभर ठिसठिस असे फुत्कार सुरू असायचे. त्या अंधाऱ्या भीतीमुळे सर्वच कलाकारांची वजने वेगाने खाली उतरू लागली. तेव्हा कुठे ते नृत्य थांबले.

रघुभाऊला मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयाशी माझ्या जुळलेल्या स्नेहबंधाचा एक मोठा पोट माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांचे अनुभव आणि विश्व मला माझ्या “गाभूळलेल्या चंद्रबनात” या कादंबरीच्या लेखना वेळी खूप उपयोगी पडले. त्यांचा आणि आमचा फॅमिली फ्रेंड संतोष खेडलेकर आता हा आता “खेडकर” झालेला आहे. ढोलकी फडाच्या पारंपारिक मंचावर रघुवीर खेडकर यांनी एक धमाल विनोदी नट, पट्टीचा गायक आणि अष्टपैलू कलावंत आणि तमाशा निर्माता या नात्याने अनेक दशके आपले रक्त आटवले आहे. त्यांची घराण्याची पुढची पिढी मोहित अमृता आणि पूजा हे सर्वजण लोककलेचा वारसा तसाच नेटाने पुढे चालवत आहेत.

साठीच्या दशकात प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी एका सिनेमासाठी जयश्री गडकर यांच्या ऐवजी कांताबाई सातारकर या गुणी अष्टपैलू कलावतीची निवड केली होती. त्यानंतर आमच्या पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या “एक होता विदूषक” या सिनेमाच्या वेळी सुद्धा रघुवीर खेडकर यांना हिरोच्या भूमिकेत घ्यायचे घाटत होते. जो रोल पुढे लक्ष्मीकांत बेर्डेने केला. पण कांताबाई काय किंवा रघुवीर काय, यांना आपल्या स्वतःच्या सिनेमातल्या वैभवी यशापेक्षा फडामध्ये काम करणाऱ्या इतर शंभरभर कलावंतांचे संसार उघड्यावर टाकायचे नव्हते. त्यामुळे अशा अनेक संधी आल्या आणि गेल्या. पण खेडकर यांच्या घराण्याने कष्टकरी बहुजनांच्या मनोरंजन व प्रबोधनासाठी कष्टाचा रस्ता पकडला. पांढरपेशांच्या नजरेत बदनामीचा डाग लागलेल्या तमाशा कलेची आराधना सोडली नाही.

आज एकूणच पुरस्कार रघुवीरला आणि आनंद महाराष्ट्राला असे जे झाले आहे, ते या मंडळींच्या पुण्याईचे फळ आहे. रघुच्या मातोश्री कांताबाई ह्या अजून काही वर्ष जगायला हव्या होत्या.

पण तरीही आज आपल्या घराण्याच्या आड्यावर कीर्तीची पताका लागल्याने स्वर्गात सुद्धा ती माऊली आनंदाने नाहून गेली असेल. तिचे कौतुक करण्यासाठी पवळाबाई, सरस्वतीबाई, विठाबाई अशा साऱ्या मावल्या गोळ्या झाल्या असतील. स्वर्गाच्या जोत्यावर बसून संगमनेरकडे बोट दाखवत त्या कांताबाईचे कौतुक करत असतील, “अग बघ कांता, आपल्या तमासगिरांच्यात पहिल्यांदाच तुझ्या रघुला पद्मश्री मिळाली. धन्य कांताबाई तुझा उंबरठा सोन्याचा झाला ग!“

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) गावाने राज्यातील लोकांसाठी घालून दिला अनोखा आदर्श !!

Chief Editor

महाशिवरात्री निमित्ताने कोपरगावात नगरपरिषद मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे — अरुण खरात

Chief Editor

धामणी (लोणी) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; विठ्ठल जाधव यांना शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

Leave a Comment