
साभार लेख – बाबाजी कोरडे (लोककला अभ्यासक)
पंचनामा विशेष – २०२१ च्या बेल्हे तमाशा महोत्सवात बापूंची व माझी प्रथम भेट झाली. बापूंच्या कलाजीवनाचा आढावा लेखातून घ्यावा अशी मनापासून तयारी केली. प्रत्यक्ष भेटीआगोदर माझे वरचेवर बापूंशी फोनवर जुजबी बोलणं व्हायचं, त्यातूनच त्यांना भेटण्याची इच्छा अनावर होत असे.
बेल्हे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट झाली तेंव्हा भेटीलागी जीवा लागलीसे आस,पाहे रात्रंदिवस वाट तुझी…
अशीच मनाची अवस्था मी त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत अनूभवली !
त्यांच्या जीवनावर लेख लिहीणे हे तर माझे कर्तव्यच !
परंतू कार्यक्रम स्थळी ते शक्य नव्हते. म्हणून येत्या काही दिवसात मी स्वतः कवठे महांकाळ येथे येईल,असे आश्वासन मी त्यांना दिले.
महोत्सवामध्ये आमचे जुजबी बोलणे होत होतेच. महोत्सव संपल्यानंतर दोनच दिवसांनी स्वतः बापूंनी मला फोन करून ते पिंपरी (पुणे) येथे त्यांच्या मुलीच्या घरीच आहेत, असा सांगावा दिला.दैनिक पुण्यनगरी मध्ये तो लेख संपूर्ण राज्य पातळीवर प्रकाशित करायचा असल्याने मीदेखील विलंब न करता त्यांना पिंपरी येथे त्यांच्या मुलीच्या घरीच भेटायला गेलो.
मध्यम उंची, गोरा वर्ण, चेहऱ्यावर निष्पाप भाव असणारा हा कलंदर कलावंत आणि बिलंदर शाहीर पाहताक्षणी कोणाच्याही नजरेत न सलता तत्काळ बसण्याची क्षमता बाळगुन होता.
खानदानी मऱ्हाठा कुटूंबात जन्मलेल्या ह्या वल्लीने तमाशा क्षेत्राला आपल्या अभिनय व लेखनीने खुप उंचीवर नेऊन ठेवले, याविषयी दुमत नाही.
‘संगितरत्न’ ही उपाधी प्रथमच दत्ता महाडिक यांना बहाल करण्याची क्षमता अंगी बाळगणारे हे व्यक्तीमत्व खुप मोठ्या उंचीचे होते….
मुलाखत देताना कोणताही आडपडदा न ठेवणारा,असत्य न बोलता स्वतःमधील दुर्गुनांनादेखिल समोर कबूल करणारा हा संत तुकारामांचा अव्वल दर्जाचा शिष्य होता.

डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ. आनंद यादव यांसारख्या विदूशींबरोबर आपली बौद्धीके परखडपणे मांडणारा व तितक्याच प्रभावीपणे समाजासमोर आपल्या स्वरचीत पोवाड्यातून डफावर थाप देत विद्रोही शब्दसामर्थ्याने संत तुकारामांचे विचारधन व जीवनचरित्र अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तब्बल अकराशे कार्यक्रम करुन मांडणारे बापू म्हणजे एक वेगळंच रसायण होतं !
तमाशा फड काढल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी प्रथम प्रयोग आपल्या साखर कारखान्यावरच झाला पाहिजे अशी प्रेमळ अधिकारयुक्त अट असो, किंवा तत्कालीन उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री नामदार आर.आर. (आबा) पाटील यांनी पडत्या काळात बापूंना केलेली आर्थिक मदत असो…
बापूंचे मोठेपण यातच सामावले आहे !!
शाहीर राजा पाटील (बापू) यांच्या बाबतीत देहूमध्ये एक प्रसंग घडला होता. स्वतः त्यांनीच हा किस्सा मुलाखतीदरम्यान मला सांगितला आहे.
तमाशा क्षेत्राकडून त्यांचा ओढा वारकरी संप्रदायाकडे नुकताच होऊ घातला होता. संत तुकाराम यांच्या चरीत्र व अभंगांनी मुळताच कवीमनाच्या असलेल्या बापूंना मोहिनी घातली होती. आणि संत तुकारामांच्या चरीत्राचा अभ्यास म्हणून ते तुकाराम बिजेला देहूला गेले होते. इंद्रायणी घाटावर गर्दीमध्ये बापूंना अत्यंत तेजस्वी पुरूष सामोरा येऊन त्याने अत्यंत महागडा, नविन पांढरा शुभ्र गर्भरेशमी फेटा बापूंच्या हातात दिला…!
त्याचा चेहरा इतका तेजपूंज होता की, बापूंना त्या तेजाने क्षणभर दिपवून टाकले. क्षणभर बापूंना काहीच समजले नाही.
परंतू दुसऱ्याच क्षणी तो तेजपूंज पुरूष गर्दीत दिसेनासा झाला.
बापूंनी दिवसभर त्याला देहूत शोधण्याचा प्रयत्न केला,परंतू त्यांना पुन्हा तो सत्पुरुष दिसला नाही…!
आणि येथेच बापूंना साक्षात्कार झाला,
…तो तुकाराम असावा !!
बापूंनी तो फेटा आपल्या डोक्यावर बांधताक्षणी बापूंना तुकारामांचे चारीत्र्य आपल्या शाहीरी बाजात सुचले,आणि इतिहास घडला !!
बापुंची प्रदीर्घ मुलाखत घेतली त्यावेळी त्यांची मुलगी अनिता, तसेच बापूंच्या सौभाग्यवती तिथेच हजर होत्या.मुलाखतीच्या शेवटी बापूंनी आपल्या मनातील खंत प्रामाणिकपणे बोलून दाखवली,
“कलेसाठी अनेक गोष्टी केल्या, माझ्या गृहलक्ष्मीला मात्र मी गुंजभर सोनं बनवू शकलो नाही. कारण मी कलेच्या कैफात राहून तिला लंकेची पार्वती केले. मी तिचा अपराधी आहे.अनेक पुरस्कार मिळाले,पण आता उतारवयात एखादा शासकीय पुरस्कार मिळाला तर त्या पैशातून या वयात तरी गृहलक्ष्मीच्या गळ्यात गुंजभर का होईना पण स्वतःच्या हाताने सोन्याचे मंगळसूत्र घालीन !”
…आणि त्यानंतर काही दिवसात बापूंच्या मुलीचा दुखावेगाने मला फोन आला,
“आपले बाप्पू गेले हो !!”
तसं बापूंचं जाणं अवचीत आणि अवेळीच….
तेव्हढं त्यांचं एखाद्या शासकीय पुरस्काराने सन्मानित होणं राहूनच गेलं….
✍️
-बाबाजी कोरडे



