सामाजिक

वाळव्याचा बहुमान सर्वदूर नेणारा कलायात्री : विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर

img 20260118 wa0779
img 20260118 wa0779

साभार लेख – प्रा. सुरेश आडके संपादक – ऋतुपर्ण दिवाळी अंक

      वाळवा तालुक्याने महाराष्ट्राला अनेक थोर रत्ने दिली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर पठ्ठे बापूराव, क्रांतीसिंह नाना पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील, पी. सावळाराम, सरोजिनी बाबर यांनी वाळवा तालुक्याची कीर्ती महाराष्ट्रभर पसरवली. या परंपरेत अभिमानाने घ्यावे असे आणखी एक नाव म्हणजे बोरगावचे कलायात्री, विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर.

आपल्या कलासक्तीला जपण्यासाठी गुलाबरावांनी सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला. इस्लामपूरच्या एका तमाशात ऐनवेळी मिळालेल्या भूमिकेतून त्यांनी आपल्या अंगी असलेल्या उच्चतम कलाविष्काराची चुणूक दाखवून दिली. त्या एका क्षणाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्यानंतर जीवनाच्या अखेरपर्यंत हा ‘सोंगाड्या’ आपल्या कलेतून जगाला हसवत राहिला. त्यांच्या अभिनयातील सहजसुंदर विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. हजरजबाबी शब्दफेक, मर्मभेदी विनोद आणि प्रसंगावधान हे त्यांच्या अभिनयाचे ठळक वैशिष्ट्य होते.
तमाशातील भूमिका गाजत असतानाही गुलाबमामा स्वस्थ बसले नाहीत. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतसुद्धा स्वतःचा तमाशा फड उभारायचा, हा ध्यास त्यांनी जिद्दीने पूर्ण केला. एकीकडे रंगमंचावर सोंग साकारणारा कलाकार आणि दुसरीकडे फड सांभाळण्याची जबाबदारी या दोन्हींचा ताण किती मोठा असेल, याची कल्पनाही करता येत नाही. तरीही त्यांनी फड सांभाळला, कलाकारांची कुटुंबवत्सल आत्मीयतेने काळजी घेतली. त्यांनी आयुष्यभर रंगवलेला सोंगाड्या आजही रसिकांच्या स्मरणात जिवंत आहे. अखेरपर्यंत त्यांनी कला जगली; म्हणूनच त्यांना ‘कलायात्री’ म्हणणेच योग्य ठरते.
वाळवा तालुका आणि जन्मभूमी बोरगाव या गावाविषयी त्यांना विलक्षण आत्मीयता होती. म्हणूनच ‘बोरगावकर’ हे आडनाव त्यांनी मोठ्या अभिमानाने स्वीकारले. वाळवा तालुक्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात जी सोनेरी पाने जोडली, त्यामध्ये गुलाबराव बोरगावकर यांचे नाव ठळकपणे उठून दिसते.
यांचे चिरंजीव आझाद ऊर्फ पापाभाई यांना जरी कलेचा थेट वारसा पुढे नेता आला नसला, तरी वडिलांच्या स्मृती जपण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. तमाशा कलावंतांशी त्यांचे ऋणानुबंध आजही जिवंत आहेत.
विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या जीवनकार्याचा साक्षेपी वेध घेणारा डॉ. संपत पार्लेकर लिखित ‘कहाणी एका सोंगाड्याची’ हा चरित्रग्रंथ अलीकडेच प्रकाशित झाला असून, त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे, कलानिष्ठेचे आणि तमाशा परंपरेतील योगदानाचे दस्तऐवजीकरण या ग्रंथातून झाले आहे. हा ग्रंथ म्हणजे गुलाबराव बोरगावकर यांच्या कलायात्रेचे शब्दरूप स्मारकच म्हणावे लागेल.
विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर यांना विनम्र अभिवादन!


✍🏻 प्रा. सुरेश आडके संपादक – ऋतुपर्ण दिवाळी अंक

Related posts

संत निरंकारी मिशन मार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापक स्वच्छता अभियान…

Chief Editor

क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

एक जाहिरात… आणि हजारो डोळे पाणावले!” विनोद कांबळींना मिळालेल्या नव्या संधीने सोशल मीडियाला दिला आशेचा संदेश !!

Chief Editor

Leave a Comment