
पंचनामा विशेष – “कीर्ती ही वाफेसारखी आहे, लोकप्रियता हा अपघात आहे, तसंच श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच आहे ती म्हणजेच माणसाचे “चरित्र”.
आयुष्यातील प्रवासात आपल्याला मिळालेली खुर्ची, सत्ता, पद, प्रतिष्ठा ही आपली तात्पुरती ओळख आहे. आपल्या हातातून सत्ता गेली की आपण सर्वचजण इथे बसलेले.. फ्युज झालेले बल्ब आहोत.. आपल्याकडील Power म्हणजेच सत्ता गेली की कलेक्टर आणि त्या ऑफिस मधील साधा कारकून, कमीश्नर आणि पोलीस काॅन्स्टेबल यांच्यात कोणताच फरक नसतो. तसं बघायला गेलं तर उगवता सूर्य आणि मावळता सूर्य… दोघेही सुंदरच असतात.. पण लोक नमस्कार करतात ते उगवत्या सूर्यालाच…मावळत्या सूर्याला कोणीच विचारत नाहीत हे वास्तव विसरून पण चालणार नाही.. आपण जे पद, प्रतिष्ठा यामध्ये जगत असतो – ती आपली खरी ओळख नसतेच.. ती ओळख तात्पुरती असते.. आणि जर आपण त्यालाच आयुष्य समजत असू तर लक्षात घेतलं पाहीजे एक दिवस हे सर्व संपणार आहे… शतरंजच्या खेळात राजा, राणी, ऊंट, घोडा, प्यादे…यांच महत्व हे तो खेळ संपेपर्यंतच असतं… एकदा का खेळ संपला की सगळे एकाच पेटीत ठेवले जातात.. डब्बा बंद..!!
म्हणूनच आयुष्याच्या प्रवासातून जाताना शक्य होईल त्यांना मदतीचा हात द्यायला विसरू नये..हे करत असताना फक्त लोकांनी आपल्याला चांगल म्हणावं म्हणून करू नये..कारण
खरंतर लोकांनी आपल्याला चांगल म्हणावं / शाब्बासकी द्यावी किंवा स्तुती करावी म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात..तर कुणाचंही चांगल व्हावं/भलं व्हाव म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात.. आयुष्यातील प्रवासात मजल दरमजल मुक्काम करत-करतच पुढचा प्रवास करावा लागतो. अशावेळेस कुणाच्याही आयुष्यात आठवण बनून रहायचं असेल तर त्या कॅलेंडर प्रमाणे न राहता ते कॅलेंडर ज्या खिळयाला अडकवलेलं आहे त्या खिळयाप्रमाणे प्रत्येकाच्या ह्रदयात घर करुन रहायला हवं…कारण ते कॅलेंडर प्रत्येक वर्षाला बदलत असतं…परंतू कीतीही वर्ष बदलली तरी त्या खिळयाची जागा कधी बदलते का हो..? तर कधीच बदलत नाही..! वर्षभर भार वाहण्याचं काम खिळा करतो. पण आपण प्रशंसा मात्र त्या फोटोची किंवा कॅलेंडर ची करतो.
हातातून निसटून “गेलेल्या क्षणांना” मोकळीक द्यावी, वर्तमानात जगण्याची ओढ मात्र नक्कीच हवी.. भविष्याच्या स्वप्नांना पंखाचे बळ द्यावे.. आणि आयुष्याच्या या प्रवासात नेहमीच आनंदी असावे.. स्मृतीच्या गाठी सोडून द्यावे अन् नव्या क्षणांना मात्र मिठीत घ्यावे..प्रत्येक दिवस नव्या आशेनं उजळावा.. मनाच्या आकाशात इंद्रधनु रंगवावा.. जीवनाच्या वाटेवर सातत्याने चालत रहावं, प्रत्येक क्षणाला मनात साठवून ठेवावं..सुख दुःखाच्या लहरींना कवेत घ्यावं.. आणि हसत हसत या जीवनाचा आस्वाद व आनंद घ्यावा..! आठवणी जपून ठेवाव्यात.. पण जखमा मात्र विसरून जाव्यात..दुःख कधीच साठवून ठेऊ नये..आनंदाचा मात्र उत्सव साजरा करावा..! आपण मोबाईलची मेमरी फुल्ल झाली की “क्लीन” करतो पण मनाची मेमरी कधीच क्लीन करत नाही…रोजच्या रोज आपल्या मनातील कचरा एका कागदावर उतरावा आणि त्याला जाळूण टाकावा. कारण आपलं रिकामं मन हेच आपल्या “आनंदाच घर” असतं…!!
खिशातून ५० रूपयाची एक नोट जरी पडली तरी आपण लगेच कावरेबावरे होऊन जातो. मात्र आयुष्याची ५० वर्ष उलटली तरी आपल्यात बदल होत नाही. भगवंताने माणसाला आकार देत असताना एकाच प्रकारची माती वापरली आहे. पण कुणी आतून सुंदर दिसतो तर कुणी बाहेरून सुंदर दिसतो. माणसाने कसं त्या समुद्रासारखं अथांग असावं..भरती चा माज नाही आणि ओहोटी ची लाज नाही..! स्मशानभुमीची सुरक्षा यंत्रणा किती कडक असते हे तर विचारूच नका.. कारण तिथे पैसा तर फारच दूरची गोष्ट आहे, तिथे आपले “श्वासही” सोबत घेऊन जाता येत नाहीत..! तुम्ही कीतीही मोठे असा किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरीही.. काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो आणि रात्रंदिवस “आपले वय पितो” आपण मात्र समजतोय की मी जगतोय..!! माणूस खाली बसून आपली तिजोरी उघडून पैसे व संपत्तीची मोजमाप करतोय. काल किती होते व आज किती वाढले..आणि आत बसून तो भगवंत आपले श्वास मोजतोय काल किती होते व आज किती राहिले.. आयुष्यात पासबुक आणि श्वास बूक दोन्ही रिकामे ठेऊन चालत नाहीत ते रिकामे असल्यास भरावे लागतात.. पासबुकात रक्कम आणि श्वास बुकात सत्कर्म
निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे, कारेगावकर
छ. संभाजीनगर
मो.नं.- 9881084320
संपादक – संतोष बापू पाचपुते ८८८८५०९७००


