
पंचनामा विशेष – सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, निसर्गसौंदर्याने नटलेले आणि धार्मिक महत्त्व लाभलेले हटकेश्वर मंदिर हे जुन्नर तालुक्याचे एक अद्वितीय श्रद्धास्थान आहे.
आदिवासी भागातील गोद्रे गावाजवळ उंच डोंगररांगांमध्ये वसलेले हे प्राचीन मंदिर अनेक दुर्मीळ धार्मिक ग्रंथांत गौरवाने वर्णिले गेले आहे.
नवनाथ ग्रंथात हटकेश्वर मंदिर असलेल्या डोंगराचा उल्लेख “सोन्याचा डोंगर” असा करण्यात आला आहे, तर काशीखंड या ग्रंथानुसार हटकेश्वराचे तीन वेळा दर्शन घेतल्यास काशी यात्रेचे पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. ज्ञानेश्वरीतही या पवित्र स्थळाचा उल्लेख आढळतो. त्यामुळे हटकेश्वर हे केवळ मंदिर नसून अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग यांचे अद्वितीय संगमस्थान आहे.
श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. डोंगरमाथ्यावरून लेण्याद्री गणपती, शिवनेरी किल्ला, चावंड किल्ला, सिंदोळा किल्ला, पिंपळगाव जोग धरण, येडगाव धरण, वडज धरण, माणिकडोह धरण तसेच हरिश्चंद्रगड आणि सह्याद्रीच्या रांगांचे मनोहारी दर्शन घडते.

या डोंगररांगेचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिमेकडील भाग दाट धुक्याने वेढलेला असताना पूर्वेकडे स्वच्छ वातावरण अनुभवायला मिळते. पावसाळ्यात येथे गुलाबी, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांनी फुललेली रानहळदीची फुलबाग, दरवळणारा रानमोगरा, पठारावरील दोन विवरे, जुना महादेव, हटकेश्वर मंदिर आणि शेकडो नंदी भक्तांच्या श्रद्धेची साक्ष देताना दिसतात.
उत्तरेकडील टोकदार सुळके आणि दोन डोंगरांना जोडणारा नैसर्गिक पुल हे गिर्यारोहक व पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरले आहे. त्यामुळेच साहस, अध्यात्म आणि निसर्गप्रेमींसाठी हटकेश्वर हे एक स्वर्गीय ठिकाण बनले आहे.
ज्ञानेश्वरीतील उल्लेख —
“ना तरी कारवेसुनी वसुंधरी ।
जो हिराणाक्षु विवरी ।
ते उघडले हटकेश्वरी ।
जेवी पाताळ कुहर ।।”
अर्थ : हिराणाक्ष दैत्य पृथ्वीला घेऊन विवरात गेला असता, भगवान शंकरांनी त्यास पाताळातून बाहेर काढले ते स्थान म्हणजे हटकेश्वर.
म्हणूनच, काशीचे पुण्य लाभविणारे, सह्याद्रीच्या कुशीतले हे अद्भुत तीर्थक्षेत्र प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावेच.
🚩 जाण्यासाठी मार्ग :
▪️ जुन्नर – गोद्रे
▪️ मढ – गोद्रे
▪️ बनकर फाटा – पिंपळगाव सिद्धनाथ – गोद्रे
💧 पाण्याची व्यवस्था :
मुख्य मंदिराजवळ पाण्याची टाकी उपलब्ध असून नैसर्गिक पुलाच्या दक्षिणेकडील वाटेवरही दुसरी टाकी आहे.
✍️📷 श्री. रमेश खरमाळे,माजी सैनिक
🌿 जय शिवराय । जय सह्याद्री । जय पर्यावरण 🌿


