आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मराठी तमाशा परंपरेतील ढोलकीतला जादूगार!! हार्ड ऍड फास्ट ढोलकीवादक शैलेश भंडारे येळावीकर!!

मराठी तमाशा परंपरेतील ढोलकीतला जादूगार!! हार्ड ऍड फास्ट ढोलकीवादक शैलेश भंडारे येळावीकर!!

माणसं नावाबरोबर कीर्तीनेही कितीतरी मोठी असतात याचा पुरेपूर अनुभव मला तमाशा कला परंपरेचा अभ्यास करताना खऱ्या अर्थानं जाणवलं आहे. एका अर्थी कर्तृत्वाने नाव मोठं होतं, हेही तितकंच खरं असताना जर घरचा वारसा लाभला तर त्याला कर्तृत्ववाची जोड मिळते आणि नावालाही बरंच वलय प्राप्त होतं. आणि मग पुन्हा त्या क्षेत्रात माणूस विशिष्ट स्थानी जाऊन पोहोचतो. या गोष्टीला पारंपरिक तमाशा क्षेत्र अपवाद नाही असे मला मनोमन वाटते.

महाराष्ट्रातील पारंपरिक तमाशा परंपरेचा अभ्यास करताना, या क्षेत्रातल्या पिढीजात घराण्यांचा विचार करताना निरिक्षणातून बऱ्याच गोष्टी जाणवल्या आहेत.
एका सध्याच्या नामांकित ढोलकी वादकबाबत मी हे बोलतो आहे. तमाशाच्या बोर्डावर गायनातून वावरणारा सरदार आणि अभिनयातून धमाल उडवून देणारा सोंगाड्या जितका महत्त्वाचा तितकाच तमाशात गळ्यात ढोलकी अडकवून चपळाईने वाजविणारा ढोल्या खूपच गरजेचा असतो. एका अर्थाने हे पारंपरिक लोककलेतील लोकवाद्य असले तरी त्याच्या गोडव्यामुळे त्याचा चित्रपट संगीतातही आज वापर झालेला दिसतो. अनेक ढोलकी वाचकांनी आपल्या वादन कौशल्याने ढोलकीला शास्त्रीय बैठक प्राप्त करून दिली आहे. इतके हे तमाशातील महत्त्वाचे वाद्य. अशा एका ढोलकी वादाचा हा परिचय आहे. जादूगाराची हातचलाखी चालावी तशी ढोलकी वादनातील जादू दाखविणाऱ्या या नामांकित तमाशा कलावंतांचे नाव आहे शैलेश लक्ष्मण भंडारे नारायणगावकर ( तथा सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील येळावीकर)

उंच स्वरातील काळी चारला वरच्या टिपेला चौपट या स्वरूपात ढोलकी वाजविणारा हा ढोलक्या पश्चिम महाराष्ट्राचे भूषण आहे. एका पारंपरिक तमाशा घराण्यातला तो एक सध्याच्या पिढीचा सच्या वारसदार आहे. सध्या तमाशा परंपरेत ताकतीने ढोलकी वादन करणारे माझ्या माहितीतले जे कलावंत आहेत, त्यात या कलावंताचा उल्लेख होतो.
शैलेश भंडारे येळावीकर या नावानेच पश्चिम महाराष्ट्रात त्यांना ओळखले जाते. उंच दिप्पाड शरीर आणि वागण्यातला डौलदारपणा लाभलेला हा कलावंत खूप मायाळू आहे. समोर आले की हसऱ्या स्वभावाचे दर्शन घडविणारा हा कलाकार साधासुधा नाही तर त्याला तमाशा घराण्याची खूप मोठी परंपरा आहे. म्हणूनच बालगंधर्व परिवाराने या जाणकार कलावंताच्या गुणांची कदर करून या ढोलकी वादकाचा बालगंधर्व पुरस्कार देऊन उचित असा सन्मान केला आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.


सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील येळावी हे राजकीय दृष्ट्या वजनदार आणि लोककलावंतांचा सन्मान करणारे एक महत्त्वपूर्ण गाव. पद्मभूषण वसंतराव दादा पाटील यांचे साडूभाऊ या गावचे सुपुत्र स्वर्गीय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विचाराने प्रेरित झालेले अठरापगड जाति-जमातीचे वास्तव्य असणारे येळावी हे मोठे गाव. इथे भंडारे आणि कांबळे या परिवारात स्वातंत्र्यपूर्व काळापासून जातिवंत आणि नामांकित कलावंतांची परंपरा आहे. ढोलकी आणि कलाट वादन अशी इथली परंपरा आजही परिसराला खूप जवळून माहित आहे. गणपत ढोल्या येळावीकर आणि अशोक सुहासे कलाट वादक ही नावे काही वर्षांपूर्वी खूप लोकप्रिय. एक तमाशातला अवलिया कलाकार तर दुसरा बॅन्ड व्यवसायातील जाणकार कलाट वादक. अशा गावात शैलेश भंडारे सारख्या ढोलकीवादकाला बाळकडू मिळाले ही आवर्जून उल्लेख करावा अशी गोष्ट.


येळावीला स्वातंत्र्यापूर्वीपासून रामा आणि कृष्णा हे भंडारे कुटुंबात खूप लोकप्रिय सुरते होते. १९६८ पूर्वीच्या कलगी पक्षाच्या बाबुराव कुपवाडकर या नामांकित लोकनाट्य तमाशात त्यांनी बरीच वर्षे काढून नाव कमावले होते. स्वातंत्र्यपूर्वी मराठी तमाशाला प्रतिष्ठा मिळवून देणारे शाहीर पठ्ठे बापूराव यांच्याशी सतत सामना ज्यांचा होत असे ते शाहीर भाऊ मालोजी भंडारे तथा भाऊ फक्कड हे सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील उंबरणे या गावचे तमाशा कलावंत. याच भाऊ फक्कड यांच्या वंशावळीतील हे येळावीचे कलाकार.

रामा-कृष्णा यांच्या जोडीला याच गावचे त्यांचे नातेवाईक आणि ढोलकी वादक होते गणपत कांबळे येळावीकर. सांगली जवळच्या कुपवाडचा बाबुराव सरोदे कुपवाडकर यांचा तमाशा १९३० सालापासून शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या परंपरेतला एक नावाजलेला तमाशा होता. शिवा-संभा कवलापूरकर या तुरा पक्षाच्या तमाशातील शाहीर भाऊ फक्कड यांच्याशी त्यांच्या सतत बाऱ्या होत. अशा या कुपवाडकरांच्या तमाशात येळावीकरांनी कलावंत म्हणून नवा तर कमावलेच, पण गावाचे ही नावं दूरवर पोहचविले.

यातच १९५० कालानंतर येळावी गावचा एक नवा उमदा ढोलकी वादक कुपवाडकरांना मिळाला त्यांचे नाव लक्ष्मण भंडारे. ते म्हणजे आजचे आघाडीचे ढोलकी वादक शैलैश भंडारे यांचे वडील. अशी ही कलेचा वारसा लाभलेली पिढी शैलेश (भाऊ) यांच्या पाठिमागे आहे म्हणून ते कलाभूषण रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशातून नारायणगाव आणि महाराष्ट्रभर तमाशा रसिकांना लोकपरिचित आहेत, हे वास्तव आहे.

रामा- कृष्णा सुरत्यांच्या आश्रयखाली आणि गणपत येळावीकर यांच्या मार्गदर्शनाने लक्ष्मण भंडारे यांनी १९७० च्या नंतर छोटा पारावरचा तमाशा फड सुरू केला होता. पुढे १९९३ सालात आपल्याच तालुक्यातील पेड गावच्या रामहारी भाट, त्यांची मुले शिवा- संभा पेडकर यांना घेऊन तमाशा फड काढला होता. तो दोन वर्षे चालला.१९८० पूर्वी लक्ष्मण भंडारे यांची लहान मुले बापूराव आणि शैलेश हे लहानपणापासून तमाशा विषयी बरंच काही शिकत होती. दोघांचाही अभिनयापेक्षा वाद्ये वाजविण्याकडे जास्त कल होत. १९८० च्या दशकात लग्न सराईत वडिलांनी सुरू केलेल्या बॅन्ड कंपणीत आजूबाजूच्या गावातून ढोलकी वाजवून ते धमाल उडवून देत. त्यातूनच या मुलांनी वाढत्या वयात तमाशात प्रवेश केला. आणि दोघांचा तमाशातला प्रवास अखंड सुरू झाला.

शैलेश भंडारे येळावीकर आज नारायणगावचे झाले असले तरी त्यांच्या ढोलकीची जातकुळी मला जवळून माहिती आहे. १९८१ च्या दरम्यान त्यांनी तासगाव तालुक्यातील गुलाबराव मोहिते तासगावकर यांच्या तमाशात प्रवेश केला. हा एक नावाजलेला पारावरचा तमाशा फड होता. शैलेश यांनी काही वर्षे या तमाशातून काम करून १९८६ साली संगीताची राणी मंगला बनसोडे सह विठाबाई नारायणगावकर तमाशात खऱ्या अर्थाने आपली ओळख करून दिली. इथेच त्यांचा मोठ्या तमाशात प्रथम प्रवेश झाला तो आजपर्यंत टिकून आहे. १९९० नंतर पुढे त्यांनी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशात आपले नशीब आजमावले. याचवेळी सांगलीला नामांकित ढोलकी वादक तानाजी वाडेकर यांच्याबरोबर एक वर्ष कलापथक काढले होते. या शैलेश भंडारे यांच्या हातात एक जादू आहे की, ज्यांचा सहवास लाभला त्यांचा बाज ते आजही वाजवू शकतात. त्यात गणपतराव येळावीकर, तानाजी वाडेकर, यलाप्पा मोराळेकर, वसंत घाटनांद्रेकर यांचा उल्लेख करावा लागेल.


१९९४ कालानंतर मात्र शैलेश भंडारे यांनी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा काही वर्षे जवळ केला होता. तिथे तर त्यांना खूप शिकायला मिळाले असे ते अभिमानाने सांगतात. याच काळात तमाशा परंपरेत आणि चित्रपटासाठी ढोलकी वाजविलेल्या सावळाराम बुवा काळे यांची कन्या निमा यांचे बरोबर शैलेश यांचे सांसारिक जीवन सुरू झाले आणि या दोघांनी आजआखेर आपले नाव कमावलेले आहे. बंधू ढोलकी वादक बापूराव दिवंगत आहेत. यांच्याविषयी शैलेश खूप आस्थेनं बोलतात. आपले ढोलकीतले गुरू कोण ? तर गणपतराव येळावीकर आणि बंधू बापूराव, असे ते अभिमानाने सांगतात. शैलेश यांनी आपली मुले उच्चशिक्षित केली आहेत. गावाकडे सतत संपर्क असतो.

शैलेश या नामांकित ढोलकी वादकाची तमाशाची परंपरा आणि जीवनप्रवास असा आहे.

डॉ.संपतराव पार्लेकर/ पलूस. ९६२३२४१९२४

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.