सामाजिक

समर्थ शैक्षणिक संकुलात संविधान दिन उत्साहात साजरा !!

1011837846
1011837846

पंचनामा प्रतिनिधी – भारतीय लोकशाहीचा भक्कम आधार असलेल्या संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने समर्थ शैक्षणिक संकुलात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी आपली मनोगते व्यक्त केली.

भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केला, तर २६ जानेवारी १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. संविधानाच्या निर्मितीसाठी दोन वर्षे,अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला. जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारतीय परिस्थितीला अनुरूप अशा तरतुदींचा त्यामध्ये समावेश करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने संविधान निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
यावेळी डॉ.लक्ष्मण घोलप यांनी संविधानाचे महत्त्व विशद करताना भारतीय संविधान हे देशाचा आत्मा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आधार असल्याचे सांगितले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांमुळे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. संविधानातील तरतुदी केवळ पुस्तकापुरत्या मर्यादित न राहता त्या विद्यार्थ्यांच्या विचारांत आणि आचरणात उतरल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ग्रंथपाल सोवळे यांनी भारतीय संविधानाची निर्मिती,ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये आणि राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके यांनी लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.मतदान, सामाजिक बांधिलकी, समानतेचा आदर आणि कायद्याचे पालन या माध्यमांतून लोकशाही मूल्यांचे संवर्धन करता येते,असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांची ओळख करून देतानाच जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम असल्याचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी सांगितले.
यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.उद्धव भारती व प्रा.गणेश बोरचटे यांनी केले, तर प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

1011822282

Related posts

‘इंडस्ट्री 4.0’च्या युगात विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी; समर्थ कॉलेजमध्ये औद्योगिक ऑटोमेशनवर मार्गदर्शन

Chief Editor

माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी !!

Chief Editor

आपलं असणं आणि आपलं हसणं हे आपणचं जपलं पाहीजे”

Chief Editor

Leave a Comment