
पंचनामा प्रतिनिधी भीमाशंकर – जंगलातील एखादा बिबट्या, झाडांच्या फांद्यांवर दिसणारा शेकरू किंवा रंगीबेरंगी फुलपाखरू हे केवळ पाहण्याचे आकर्षण नाही, तर निसर्गाच्या गुंतागुंतीच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. प्रत्येक वन्यप्राण्याची परिसंस्थेत विशिष्ट भूमिका असून, त्यांचे अस्तित्व टिकले तरच जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राहतो. वाढते शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा ऱ्हास यामुळे निसर्गासमोरील आव्हाने वाढत आहेत. त्यामुळे नव्या पिढीमध्ये वन्यजीव आणि पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे मत भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांनी व्यक्त केले.

वन्यजीव विभाग, पुणे आणि भीमाशंकर अभयारण्य-१ यांच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताहा’निमित्त भीमाशंकर येथील निसर्ग परिचय केंद्रात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना वने, वन्यजीव आणि जैवविविधतेचे महत्त्व समजावून सांगताना जाधव बोलत होते.निसर्ग परिचय केंद्रातील कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना वन्यजीवांविषयीची माहिती केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष निरीक्षणातून समजून घेण्याची संधी मिळाली. राज्यप्राणी ‘शेकरू’, बिबट्या, वाघ, राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉरमॉन’, विविध रानफुले आणि औषधी वनस्पती यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. वन्यजीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

वन्यजीवांचे जीवन, त्यांचे अधिवास,अन्नसाखळीतील स्थान आणि जंगलाच्या परिसंस्थेशी असलेले नाते याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. वन्यजीवांचे संरक्षण केवळ वनविभागाची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक घटकाचा त्यात सहभाग आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, प्रत्येक प्राणी हा निसर्गाचा मित्र आहे. त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वन्यजीवांची संख्या कमी झाली किंवा एखादी प्रजाती नष्ट झाली, तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणीय व्यवस्थेवर होतो. त्यामुळे जंगल आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.

वनपरिमंडळ अधिकारी चेतन नलावडे आणि प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे देत वन्यजीवांबाबतची त्यांची जिज्ञासा वाढविली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वन्यजीव संवर्धनाची शपथ घेतली. जंगलात कचरा न टाकणे, वन्यप्राण्यांना त्रास न देणे, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे, या बाबींचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

थोरांदळे, शेवाळवाडी (मंचर), निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच पंढरीनाथ महाविद्यालय, पोखरी येथील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश मिळाला.

कार्यक्रमास वनपरिमंडळ अधिकारी चेतन नलावडे, नियतक्षेत्र वन अधिकारी गुलाब गोरे, अनिल माने, किरण कदम, लक्ष्मण पानसरे, एकनाथ बांगर, सुनंदा वाजे, प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे, प्रा. प्रणिता सदावर्ते, बाळासाहेब कानडे, आदर्श शिक्षक चांगदेव पडवळ, संतोष कानडे, मुख्याध्यापिका प्रमिला हिंगे, शिक्षक संतोष थोरात, विशेष शिक्षिका प्रतिभा पडवळ, अंजली जाधव, काळू भांगरे, सुभाष केंगले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन वनसेवक शिवाजी तिटकारे, नारायण गवारी, सचिन कुऱ्हाडे, युवराज वालकोळी, गणपत लोंढे आणि गणेश तिटकारे यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत नियतक्षेत्र वन अधिकारी गुलाब गोरे यांनी केले, तर आभार शिक्षक चांगदेव पडवळ यांनी मानले.


वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जंगलाकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून न पाहता, तेथील प्रत्येक सजीव घटकाच्या अस्तित्वाचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. वन्यजीवांचे संरक्षण म्हणजे केवळ प्राण्यांचे रक्षण नव्हे, तर भविष्यातील पर्यावरणाचा समतोल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

भीमाशंकर येथील निसर्ग परिचय केंद्रात ‘वन्यजीव सप्ताहा’निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव.

भीमाशंकर येथील निसर्ग परिचय केंद्रात वन्यजीव सप्ताहानिमित्त उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी.


