सामाजिक

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – तमाशा रंगभूमीवरील अष्टपैलू सोंगाड्या रमेश खुडे यांचा चार दशकांचा कलाप्रवास !!

1011171259
1011171259

पंचनामा विशेष काठापूर बुद्रुक – बहुगुणी, बहुज्ञानी आणि रत्नपारखी रसिक मायबापांच्या मनावर आपल्या कलेची मोहोर उमटविणारे अनेक कलाकार महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. त्यापैकीच एक नाव म्हणजे तमाशा रंगभूमीवरील अस्सल सोंगाड्या, हजरजबाबी आणि अष्टपैलू कलावंत रमेश विठ्ठल खुडे (काठापूर बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे). गेली तब्बल चाळीस वर्षे आपल्या विनोदबुद्धीने, अभिनयाने आणि बहुरंगी कलाविष्काराने त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या या कलाप्रवासाचे सार एका वाक्यात सांगायचे झाले तर—‘नाते कलेचे माझ्या रक्ताशी…’

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रमेश खुडे यांच्या मनात कलेची ओढ निर्माण झाली. निवृत्ती जाधव (पोंदेवाडीकर) हे त्यांचे गुरू. त्यांनी खुडे यांच्यातील कलागुण ओळखून त्यांना तमाशा रंगभूमीचे धडे दिले. गुरूंच्या मार्गदर्शनातून खुडे यांनी सोंगाड्याची भूमिका तर आत्मसात केलीच; मात्र त्याचबरोबर गण, गवळण, रंगबाजीपासून भैरवीपर्यंत रंगमंचावरील कोणतीही जबाबदारी समर्थपणे पार पाडणारा अष्टपैलू कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

राहणीमान अत्यंत साधे; मात्र कलेवर अपार प्रेम, रसिकांची नाडी ओळखण्याची हातोटी आणि रंगदेवतेप्रती असलेली श्रद्धा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये. रमेश खुडे रंगमंचावर येताच टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट होतो, हे त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक आहे. ‘खुडे कधी स्टेजवर येतील?’ याची रसिक आतुरतेने वाट पाहतात.

दिग्गज कलावंतांच्या सहवासातून समृद्ध झालेली कला

महाराष्ट्रातील तमाशा रंगभूमी गाजविणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांच्या सहवासात काम करण्याची संधी रमेश खुडे यांना मिळाली. कैलासवासी चंद्रकांत ढवळपुरीकर, संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर, विष्णुपंत मामा चासकर, गेनूभाऊ आंबेठाणकर, बापू गिरी म्हाळशिरसकर, अनंतराव पांगारकर, जनार्दन वायदंडे, अण्णा पिंगेवाडीकर यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांच्या सानिध्यात त्यांनी आपली कला बहरवली.

तसेच नंदा पाटील पिंपळेकर यांच्या फडातही त्यांनी काम केले. राधाकृष्ण राहुरीकर, मोहम्मदभाई घोडेगावकर, सावळेराम बुवा रोपळेकर, शांताबाई काळे रोपळेकर, किसन झंजाड, अण्णा परितेकर, दत्तोबा चव्हाण सविंदरेकर, साधू आत्मा कासेगावकर, मुरली भोसले परितेकर, कृष्णा माळवे, केरबा पाटील सावरगावकर, काबू चांदगावकर, नंदकुमार तांबे शिरोलीकर, शालिनीबाई कासेगावकर आदी कलाकारांच्या सहवासाने त्यांच्या कलेला वेगळीच उंची मिळाली.

‘भक्त पुंडलिक’, ‘संत तुकाराम’, ‘भावाची साडी माहेरची’, ‘तिकीट मिळालं गुंडाला’, ‘मुंबईचा हमाल’, ‘मुंबईची केळेवाली’, ‘गाढवाचं लग्न’, ‘एक बाई तिघांची घाई’, ‘काम जरा भानगडीच’ आणि ‘न्याय असा महाराष्ट्राचा’ अशा अनेक जुन्या वगनाट्यांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

स्वतःचा तमाशा फडही उभारला

कलेप्रती असलेल्या निष्ठेतून रमेश खुडे यांनी ‘सुनिता बारामतीकर सह रमेश खुडे काठापूरकर’ या नावाने दोन वर्षे स्वतःचा तमाशा फडही चालविला. या प्रदीर्घ कलाप्रवासात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना संगीत रत्न दत्ता महाडिक जीवन पुरस्कार, आंबेगाव भूषण पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार यांसह तब्बल १६ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

‘पूर्वीचा तमाशा आणि आताचा तमाशा यात मोठा फरक’

पूर्वीच्या तमाशाची आठवण सांगताना खुडे यांच्या आवाजात आजही जुन्या रंगभूमीची ओढ जाणवते. ते म्हणतात, “पूर्वी हलगी, ढोलकी आणि पायपेटी वाजायला लागली की झोपेतला माणूसही खडबडून उठायचा. गणगवळण, रंगबाजी, फारसा, शिलकार, सवाल-जवाब आणि वगनाट्य असा तमाशाचा थाट सकाळी चार-पाच वाजेपर्यंत रंगायचा. आता इलेक्ट्रॉनिक वाद्यांमुळे तमाशाचे स्वरूप बदलले आहे. रसिकांकडून प्रामुख्याने गाण्यांची मागणी होते आणि कार्यक्रमही अकरा-बारा वाजेपर्यंतच आटोपतो.”

जुन्या तमाशाच्या आठवणी सांगताना त्यांच्या मनात असलेली खंत स्पष्ट जाणवते. मात्र तमाशा ही केवळ करमणुकीची कला नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे आणि ही जिवंत लोककला अजरामर राहील, असा विश्वासही ते व्यक्त करतात.

‘प्रति महाडिक’ हीच मोठी पावती

रमेश खुडे यांच्या कलेचे कौतुक करताना कैलासवासी संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी त्यांना ‘प्रति महाडिक’ ही उपाधी दिली. एका महान फडमालक आणि दिग्गज कलावंताकडून मिळालेली ही कौतुकाची थाप म्हणजे आपल्या कलेची मोठी पावती असल्याचे खुडे सांगतात.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’वर विनोदी गीत

रमेश खुडे यांनी आतापर्यंत सुमारे ६० गाणी लिहिली आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विषयावर त्यांनी एक विनोदी गीत तयार केले असून ते बेल्हे तमाशा महोत्सवात सादर करण्यात येणार आहे. हे गीत श्री साई स्वामी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष माननीय वसंतराव (अण्णा) जगताप यांच्या कार्यावर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘तमाशाने मला जगविले; आता विठाबाई पुरस्काराची आस’

कलेच्या जोरावर संपूर्ण संसार उभा केल्याचे सांगताना खुडे भावुक झाले. त्यांचा मोठा मुलगा उपसरपंच असून एक सून अंगणवाडी शिक्षिका आहे. “मी माझा सगळा प्रपंच तमाशा कलेवर उभा केला. या कलेतून एक गुंठा जागाही घेतली. तमाशा कला माणसाला उपाशी मरू देत नाही, हे त्रिवार सत्य आहे,” असे ते सांगतात.

मात्र त्यांच्या मनात आजही एक खंत आहे. “आत्तापर्यंत मला मोठा पुरस्कार मिळालेला नाही. मला विठाबाई जीवन पुरस्कार मिळाला, तर माझ्या जीवनाचे आणि कलेचे सार्थक झाले असे मी समजेन. त्या जागेवर घराचे कामही सुरू करीन,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले… शब्द काही काळ थांबले… आणि चार दशकांच्या कलासाधनेची कहाणी जणू त्या अश्रूंनीच सांगितली.

खरंच, महाराष्ट्राच्या मातीने अशा कलाकारांना जन्म दिला, हे रसिकांचे भाग्यच. रमेश खुडे यांच्यासारख्या कलावंतांमुळे तमाशाची समृद्ध लोकपरंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या हातून यापुढेही रसिकांची सेवा घडत राहो, त्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना.

लेखन – शाहीर खंदारे
ता. नेवासा

1011111277

Related posts

गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक धडे !!

Chief Editor

रांजणी (ता.आंबेगाव) गावातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा चालला दुबईला !!

Chief Editor

शिंगवे (पारगाव) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद; जनआक्रोश मोर्चा

Chief Editor

Leave a Comment