
पुणे: पुण्याच्या वैभवशाली श्री गणेश विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने “पुणे महानगरपालिका सेवकवर्ग गणेशोत्सव समिती” च्या गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा “कलेश्वरनाथ ढोल पथक, पुणे” यांना वादनसेवेची संधी लाभली. या संधीचे सार्थक करत पथकातील वादकांनी लक्ष्मी रोडवर अत्यंत शिस्तबद्ध, तालबद्ध आणि सुश्राव्य पद्धतीने ढोल-ताशा वादन सादर केले. पारंपरिक वादनकलेतील लय, ताल आणि उत्साहपूर्ण निनादाने संपूर्ण विसर्जन मार्ग भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारून गेला.
कलेश्वरनाथ ढोल पथकाच्या प्रभावी वादनाला उपस्थित गणेशभक्त, नागरिक आणि रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनःपूर्वक दाद दिली. मात्र, या वादनसेवेचे वैशिष्ट्य केवळ पारंपरिक कलेच्या सादरीकरणापुरते मर्यादित न राहता, ‘श्री सेवा समिती, पुणे’ यांच्या संयुक्त संकल्पित विद्यमाने कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा विधायक संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आले, हे ठरले.
‘समर्पण • समन्वय • सातत्य’ या त्रिसूत्रीने प्रेरित ‘श्री सेवा समिती, पुणे’ यांच्या अभिनव संकल्पनेतून गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध समाजोपयोगी संदेशांचे फलक ढोलाच्या पानांवर प्रदर्शित करण्यात आले. त्याद्वारे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वाहतूक शिस्त, महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती, रक्तदान, बालसंस्कार, वीज बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, रुग्णवाहिकेला वाट करून देणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, नियमित करभरणा, सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
गणेशोत्सवासारख्या लोकसहभागी उत्सवाच्या माध्यमातून समाजहिताचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा ‘श्री सेवा समिती, पुणे’ यांचा हा प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरला. पारंपरिक वादनकलेला समाजप्रबोधनाची विधायक दिशा देत ‘उत्सवातून संस्कार आणि कलेतून जनजागृती’ हा विचार या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला.
‘परंपरेचे जतन, वादनकलेची सेवा आणि समाजप्रबोधन’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कलेश्वरनाथ ढोल पथकानेही ‘श्री सेवा समिती, पुणे’ यांच्या संकल्पनेला समर्थ साथ देत गणेशोत्सवाच्या उत्साहाला विधायक सामाजिक संदेशाची जोड दिली.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पुणे महानगरपालिका सेवकवर्ग, उपस्थित गणेशभक्त समुदाय, नागरिक तसेच विसर्जन मार्गावरील विविध स्वागतकक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक व स्वागत करण्यात आले. परंपरा, कला आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम घडविणारा ‘श्री सेवा समिती, पुणे’ यांचा हा उपक्रम गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची प्रभावी वाटचाल अधोरेखित करणारा ठरला. एकमेकांप्रती आभार व्यक्त करत यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवित राहणार असल्याचे समितीचे प्रमुख विश्वस्त हर्षद पोरे, अक्षय लावंड, प्रविण देवकर, सागर जाधव तसेच पथकाचे प्रमुख तुषार गवळी, आदेश शर्मा, मनोज शिंदे आणि किरण काटे यांनी विशेष नमूद केले.


