
पंचनामा प्रतिनिधी : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील ढोबळेवाडी येथील वडजादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या मनोरंजनात्मक व स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध खेळांचा आनंद घेतला. यामध्ये सौ. पूजा शामकांत ढोबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘होम मिनिस्टर’चा मान मिळविला.

जारकरवाडी हे आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते. गावातील ढोबळेवाडी येथील वडजादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असते. मंडळाच्या वतीने महिलांची महाआरती, रक्तदान शिबिर यांसह विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

याच उपक्रमांचा एक भाग म्हणून महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगलम ॲग्रोटेकचे डॉ. अविनाश बाबुराव ढोबळे यांच्या माध्यमातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध मनोरंजक खेळ व स्पर्धांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक – सौ. पूजा शामकांत ढोबळे, द्वितीय क्रमांक – सौ. सायली ऋषिकेश पाचपुते, तृतीय क्रमांक – सौ. अक्षदा भरत ढोबळे, तर चतुर्थ क्रमांक – सौ. काजल सुमित पाचपुते यांनी मिळविला.

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक उपक्रमांसोबतच महिलांसाठी मनोरंजनात्मक व सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल मंडळाचे कौतुक होत आहे.



