
पंचनामा प्रतिनिधी – लौकी (ता. आंबेगाव) : पाच दशकांची सांस्कृतिक परंपरा, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत लौकी (मधला मळा) येथील श्री गवळीबाबा सार्वजनिक गणेश व नवरात्र उत्सव मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले. या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी मंडळाला भेट देऊन ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंडळाच्या सभामंडपासाठी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा त्यांनी केली.

वळसे पाटील म्हणाले, ‘‘गेल्या ५० वर्षांपासून गवळीबाबा सार्वजनिक मंडळाने जपलेली सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा कौतुकास्पद आहे. लौकी ग्रामस्थांचा नेहमीच पाठिंबा व आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला आहे. ग्रामस्थांनी शब्द टाकायचा आणि आम्ही तो पूर्ण करायचा, या जिव्हाळ्याच्या नात्यातून लौकी गावाशी आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहेत. मंडळाच्या सभामंडपासाठी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करीत आहोत.’’

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांना धार्मिक श्रद्धेसोबत सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली. कीर्तन, भजन, प्रवचन, जादूचे प्रयोग, ‘खेळ पैठणीचा’ आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना ग्रामस्थ, महिला, युवक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सुवर्णमहोत्सवी वर्षाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंचायत समिती सदस्य उषाताई कानडे यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. पाच दशकांपासून सुरू असलेल्या या उत्सवपरंपरेतून गावातील सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, पंचायत समिती सदस्य उषाताई कानडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकित जाधव, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे, रविकिरण डोंगरे, विकास कानडे, संतोष कानडे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५० वर्षांची परंपरा आणि सभामंडपासाठी जाहीर झालेला निधी यामुळे लौकीतील सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवाला धार्मिकतेसोबत सामाजिक व विकासात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे.
