
पंचनामा प्रतिनिधी – ज्ञान, अचूकता आणि वेग यांचा सुरेख संगम साधत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे येथील अंतिम वर्ष बी.फार्मसीची विद्यार्थिनी कु.रुचा कोरडे हिने राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पेक्ट्राटिक्स फार्मा प्रा. लि. आणि मायक्रोबायोलॉजिस्ट्स सोसायटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६’ मध्ये तिने तब्बल २०० विद्यार्थ्यांमध्ये अव्वल स्थान पटकावून समर्थच्या शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकविला.
औषधनिर्माणशास्त्र, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र तसेच जीवनविज्ञान क्षेत्रातील अलीकडील प्रवाह या विषयांवर आधारित या राष्ट्रीय प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांच्या विषयज्ञानासोबतच त्यांची आकलनशक्ती, तर्कशक्ती, निर्णयक्षमता आणि अद्ययावत ज्ञानाची कसोटी पाहण्यात आली. देशभरातून सहभागी झालेल्या २०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत रुचा कोरडे हिने आपल्या भक्कम विषयज्ञानाचा आणि आत्मविश्वासाचा प्रभावी प्रत्यय दिला.
विशेष म्हणजे, रुचा हिने २५ पैकी तब्बल २५ गुण मिळवत शंभर टक्के अचूकता साधली. एवढेच नव्हे, तर अवघ्या ४ मिनिटे १५ सेकंदांत प्रश्नमंजुषा पूर्ण करून तिने वेग आणि अचूकतेचा अनोखा समन्वय साधला. तिच्या या नेत्रदीपक कामगिरीने राष्ट्रीय स्तरावरील २०० स्पर्धकांमध्ये ती सर्वाधिक गुण मिळविणारी आणि अव्वल ठरली.
रुचा कोरडे हिचे हे यश केवळ एका स्पर्धेतील विजय नसून सातत्यपूर्ण अभ्यास, विषयावरील सखोल प्रभुत्व, अचूक निरीक्षणशक्ती, प्रसंगावधान आणि आत्मविश्वास यांचा परिपाक असल्याचे मानले जात आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
फार्मसी क्षेत्रामध्ये झपाट्याने होत असलेले तांत्रिक बदल, आधुनिक औषधनिर्मिती प्रक्रिया, जैवतंत्रज्ञानातील क्रांतिकारी प्रगती, सूक्ष्मजीवशास्त्रातील अत्याधुनिक संशोधन तसेच जीवनविज्ञानातील नव्या संकल्पना यांचे अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. अशा राष्ट्रीय स्तरावरील ज्ञानाधारित स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची प्रत्यक्ष कसोटी पाहता येते, स्पर्धात्मकतेला धार मिळते आणि राष्ट्रीय व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते.

“कु.रुचा कोरडे हिने मिळविलेले हे यश समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी असून, ज्ञानाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करता येते, याचा आदर्श तिने निर्माण केला आहे,” असा विश्वास संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय पातळीवरील या अभिमानास्पद यशामुळे समर्थच्या शैक्षणिक परंपरेत ज्ञान, गुणवत्ता आणि गुणवत्तापूर्ण स्पर्धात्मकतेचा आणखी एक उज्ज्वल अध्याय जोडला गेला आहे.
कु. रुचा कोरडे हिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. शरद पारखे तसेच संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



