सामाजिक

लोणी (धामणी ) गावाने जपली कलगीतुऱ्याची परंपरा; नागपंचमीच्या निमित्ताने रंगणार कलगीतुऱ्याचा सामना !!

1010551813
1010551813

पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतील महत्त्वाचा आणि लोकजीवनाशी घट्ट नाते सांगणारा कलगीतुरा आजही लोणी (धामणी ) गावात मोठ्या उत्साहाने जपला जात आहे. नागपंचमीच्या निमित्ताने लोणी येथे यंदाही भव्य कलगीतुरा सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, गावातील या पारंपरिक लोककलेला ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून जतन केले आहे.

यावर्षी कलगी वाले शाहीर तानाजी माळवदकर व तुरेवाले शाहीर साहेबराव पवार यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पंचरस मंडळ यांच्या गणाने होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धवराव लंके हे करणार आहेत.

कलगीतुरा ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा ठेवा मानला जातो. ‘कलगी’ आणि ‘तुरा’ या दोन बाजूंमधील प्रश्नोत्तर, काव्य, गाणे, लावणीसदृश सादरीकरण, अध्यात्मिक व पौराणिक संदर्भ तसेच सामाजिक विषयांवरील भाष्य या माध्यमातून ही कला सादर केली जाते. उत्स्फूर्त काव्यरचना, शब्दांचे चातुर्य, विनोद, संगीत आणि वैचारिक मांडणी यामुळे कलगीतुऱ्याला ग्रामीण भागात विशेष लोकप्रियता मिळाली आहे.
पूर्वी गावागावांत जत्रा, यात्रा आणि सण-उत्सवांच्या निमित्ताने कलगीतुऱ्याचे सामने रंगत असत.

बदलत्या काळात अनेक पारंपरिक लोककला मागे पडत असताना लोणी गावाने मात्र ही परंपरा सातत्याने जपण्याचे काम केले आहे. त्यामुळे नव्या पिढीलाही या लोककलेची ओळख आणि तिचे सांस्कृतिक महत्त्व समजण्यास मदत होत आहे.

लोणी येथे सन १९९३ पासून कलगीतुऱ्याची परंपरा सुरू असून, यंदा तिचे ३४वे वर्ष आहे. नागपंचमीच्या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिसरातील कलाप्रेमी, रसिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. कलगीतुऱ्यातील सवाल-जवाब, उत्स्फूर्त काव्य आणि कलाकारांची रंगतदार जुगलबंदी हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते.

ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या कलगीतुऱ्याचे जतन करून लोणी गावाने लोककलेची परंपरा पुढील पिढीकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आधुनिक मनोरंजनाच्या साधनांच्या काळातही गावकऱ्यांचा या लोककलेशी असलेला जिव्हाळा आणि उत्साह निश्चितच कौतुकास्पद आहे.

सर्व लोणी धामणी ग्रामस्थांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून राजकीय,सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देणार आहेत. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोणी (धामणी) ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाने केले आहे.

1010457105
1010457105

Related posts

बी. जे. एस. विद्यालय वाघोली येथील डॉ.विष्णू देवडकर विद्यापीठाच्या (Ph.D.) पदवी ने सन्मानित !!

Chief Editor

भ्रष्टाचार : देशाचा आणि गावाच्या विकासाला लागलेली घातक कीड

Chief Editor

अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद !!नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार

Chief Editor

Leave a Comment