सामाजिक

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या वितरिका झाडांच्या गर्दीत झाल्या गायब!!

1010345534
1010345536

पंचनामा प्रतिनिधी -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या अनेक वितरिकांची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. वितरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे व गवत वाढल्यामुळे अनेक ठिकाणी वितरिका अक्षरशः झाडांच्या गर्दीत गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह अडथळाग्रस्त होत असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे आंबेगाव, शिरूर, पारनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ऊस, डाळिंब, भाजीपाला, फळबागा तसेच इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र वितरिकांची नियमित साफसफाई व देखभाल न झाल्याने अनेक ठिकाणी झाडे-झुडपांनी वितरिकांवरच अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.
वितरिकांमध्ये वाढलेल्या झाडांमुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो, काही ठिकाणी पाणी तुंबते, तर शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक प्रमाणात पाणी पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार लाभक्षेत्रातील शेतकरी करत आहेत.

याच दुर्लक्षाचा फटका पावसाळ्यात परिसरातील नागरिकांनाही बसला आहे. वितरिकांमध्ये झाडे व गाळ साचल्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी तुंबून निवृत्ती पाटीलबुवा पाचपुते यांच्या घरात पाणी घुसले होते. या घटनेत त्यांच्या घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

1010345534

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या सर्व वितरिकांची तातडीने साफसफाई करून झाडे-झुडपे हटवावीत, गाळ काढावा आणि सिंचन व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी आंबेगाव, शिरूर, पारनेर व अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी संबंधित पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

Related posts

रानमळा (ता.आंबेगाव ) येथे श्री धर्मनाथ महाराज यात्रा (बिज) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन !!

Chief Editor

धामणी (लोणी) पहाददरा परिसरातील दुष्काळी शेतकऱ्यांना शेती उपसा सिंचन योजनेसाठी महावितरणकडून वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकरी करणार आमरण उपोषण !!

Chief Editor

कौतुकास्पद….राळेगण (ता.जुन्नर) येथे संपन्न झाला माहेरवाशीनींचा मेळावा !!

Chief Editor

Leave a Comment