
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.या किडीच्या भुंगेरा वगळता बहुतेक सर्व अवस्था या जमिनीच्या आतमध्ये होतात. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी भुंगेरे बाहेर येण्याच्या मे-जून महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या वळवांच्या पावसावेळी सामुदायिकरीत्या प्रयत्न करणे आवश्यक असते.
मे-जूनमध्ये होणाऱ्या वळवाच्या पावसामध्ये हुमणी किडीचे भुंगेरे सुप्तावस्थेतून बाहेर येतात. ते खाद्य आणि मीलनासाठी बाभूळ, कडुनिंब यांसारख्या झाडांवर गर्दी करतात. ते खाली पाडून गोळा करून नष्ट करणे, या उपायामुळे पुढील हंगामातील हुमणी किडीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते.
या भुंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे (Light Traps) हा सर्वांत स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. प्रकाश सापळा तयार करण्यासाठी
एक मोठे प्लॅस्टिकचे घमेले, १००/२०० वॉटचा बल्ब, डिझेल किंवा रॉकेल इत्यादी साधनांचा वापर केला जातो.शेताच्या बांध, कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली एका खांबावर ५-६ फूट उंचीवर वायरची व्यवस्था करून बल्ब लावावा. त्याच्या बरोबर खाली ३-४ फूट व्यासाचे घमेले ठेवावे. त्यात पाणी घेऊन थोड्या प्रमाणात डिझेल किंवा रॉकेल मिसळावे.
सापळ्याचे स्थान व वेळ –
प्रभावी क्षेत्र : १ हेक्टर क्षेत्रासाठी १ ते २ प्रकाश सापळे पुरेसे असतात.. हा सापळ शेतात किंवा शेताच्या बांधावर तयार करता येतो. या सापळ्यातील प्रकाशामुळे हुमणीचे भुंगेरे आकर्षित होतात. त्यातील दररोज किमान १०० भुंगेरे खाली ठेवलेल्या रॉकेल मिश्रित पाण्यात पडून मरतात. त्यातील ५० टक्के नर आणि ५० टक्के मादी भुंगेरे असले, तरी त्यांच्या मिलनातून संभाव्य पिढीच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो.
एक मादी भुंगेरा ५० ते ६० अंडी घालते. त्यातून किमान ५० हुमणीच्या अळ्या तयार होऊ शकतात. त्याला आळा बसतो. एका गावात किमान १० शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते.
महत्त्वाची बाब म्हणजे या वेळी ‘ एल निनो ’ च्या प्रभावामुळे कमी पाऊस व पावसाचे खंड यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. हुमणीचे भुंगेरे मॉन्सून पाऊस सुरू होईपर्यंतच म्हणजेच २० ते २५ जूनपर्यंत दिसतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सामुदायिकरीत्या उपाययोजना कराव्यात. प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक प्रकाश सापळा लावला तरी पुढील हंगामातील प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होईल. पुढे नियंत्रणासाठी मोठा खर्च करण्यापेक्षा आता प्रतिबंधात्मक उपाय करणे कधीही फायद्याचा सौदा आहे.
या प्रकाश सापळ्यामुळे शेतकर्यांना मोठा फायदा होतो रासायनिक फवारणीची गरज कमी होते. भुंगेरे मोठ्या प्रमाणात सापळ्यात अडकतात, त्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो.जैवविविधतेला धक्का न लावता फक्त हानिकारक किडींचा नाश होतो. सापळ्यात अडकलेले भुंगेऱ्यावरून संभाव्य प्रादुर्भावाचे स्वरूप कळते.

लाखणगाव ( ता.आंबेगाव ) येथील शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य अशोक कानसकर यांनी शेतात तयार केलेला प्रकाश सापळा





