
“येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी.. जाणाऱ्यांच्या मनामध्ये फिरून येण्याची ओढ हवी..”
ज्या ठिकाणी आपण सर्वजण म्हणजेच आपले कुटूंब एकत्र राहतो, आधार देतो, सुख दुःख वाटून घेतो ती वास्तू कशी असायला हवी..ती फक्त आनंदी नसावी तर समाधानी असावी.. कारण आनंद हा भौतिक पातळीवर असतो मात्र समाधान हे आत्मिक पातळीवर असते..! साखर, लिंबू, मीठ हे सर्व आपआपल्या आनंदात एकत्र राहतात पण जेंव्हा ते सर्व एकत्र मिसळतात तेंव्हाच तर मधुर चविचे सरबत तयार होते..त्यासाठी त्या लिंबाला कापून घ्यावे लागते आणि पिळून घ्यावे लागते..तसेच मीठ, साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते..
“म्हणूनच घरातील पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत.. आपण पंढरपूरला गेल्यावर विठुरायाच्या शेजारी उभ्या न राहता रुसून मागच्या बाजूला उभ्या असलेल्या रुक्मिणी आईसाहेबाना हात जोडून एक प्रेमळ भक्त विनंती करतो की “आईसाहेब तुम्ही आमच्या विठुरायावर रागावू नका..रूसू नका..तुम्ही जोडीनेच छान दिसता.. शिव-शक्ती एकवटली की भोळया भक्तांना भक्तीचा समुद्र उचंबळून आल्यासारखा वाटतो..”तसेच आपल्या गृहमंदिरात पती -पत्नी मनाने एकरूप झाले म्हणजेच चवदार सरबत नाहीतर मधुर असे “अमृत” नक्की तयार होईल..!! आणि आपल्या त्या घरात खेळीमेळीचे वातावरण निर्माण होईल…
आपले आई बाबा एकमेकांशी कीती प्रेमाने वागतात हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो.. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात..
घरात कुटुंबाने एकत्र राहताना कसं, लोणच्यासारखं असावं.. त्या लोणच्यातील प्रत्येक साहित्याची चव वेगळी, स्वाद वेगवेगळा असतो. लिंबू किंवा कैरी हे आंबट असते..साखर किंवा गुळ हे गोड असते..त्यात टाकली जाणारी मेथी कडु असते..मीठ खारट असते, मीरची तिखट असते..पण हे सगळेच एका बरणीत एकत्र केल्यावर..एकमेकांचे गुण घेऊन सुंदर लोणचे तयार होते..तसेच कुटुंबातील आपण सर्वजण असावेत.. ज्याप्रमाणे लोणच्या तील प्रत्येक घटक मग ते तिखट असो, अथवा कडवट असो स्वतःची वेगळी ओळख टिकवून दुसर्यात मिसळून जातो..आणि एक अप्रतिम चव निर्माण करतो… तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी एकमेकांच्या स्वभावाचा आदर करून सुसंवाद साधला तर त्या घराचे “गोकुळ” व्हायला वेळ लागणार नाही..!! “मी” पणाची जागा जेंव्हा “आम्ही” ने घेते तेंव्हाच खर्या अर्थाने नात्यात मुरलेल्या लोणच्या सारखा गोडवा निर्माण होतो…!!
“Conduct of Parents is education of Children..!”
मुले ही अनुकरणीय असतात.. आईचा कडवट चेहरा आणि वडिलांचा “आरडाओरडा” हा घराचा उकिरडा बनवून टाकतो…. आणि आपले वास्तूतज्ञ समस्येच्या मुळाशी न जाताच बिनबुडाचे उपाय सुचवतात..! आणि निर्बुद्ध मंडळी म्हणजेच आम्ही त्यावर हजारो रूपये खर्च करून नंतर पस्तावा करत बसतो..अरे कुणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्याच घरात शांती आणणे हे..तुम्हाला तरी योग्य वाटते काय…..आणि पटते तरी काय..? तुम्ही घरातील सर्व मंडळी समंजसपणे वागुन एकमेकांवर स्वतः पेक्षाही जास्त प्रेम करून आपली हीच वास्तू कीतीतरी समाधानी ठेवू शकता..! जेष्ठ नागरिकांनी स्वतःची प्रकृती साथ देत असेल तर अर्थार्जण करून मुलांना हातभार जरूर लावावा..! रिटायर्ड लाईफ म्हणजेच निष्क्रियता नव्हे.. काहीही कारण नसताना लोळत पडलेली माणसे आपल्याच गृहमंदिरात हाॅस्पिटलच वातावरण तयार करतात..! त्यापेक्षा माळ घेऊन जप करणारी माणसं आदरणीय वाटतात..
मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आपल्या आई वडीलांशी खूप नम्रतेने वागावे.. त्यांच्या चुका काढत बसू नये.. सून म्हणून आपले आजवरचे संपूर्ण विश्व सोडून आलेल्या मुलीला खूप खूप प्रेम आणि आधार द्यावा महणजे आपली वास्तू ही खरोखरच आदर्श वास्तू म्हणून गणली जाईल..!!
श्री. निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे, कारेगावकर
छ.संभाजीनगर-४३११३६
मो.नं.- 9881084320


