सामाजिक

तमाशाफड मालक विलास गायकवाड उर्फ राज देवठाणकर यांचे निधन हे सरकारी अनस्थेचा बळी आहे- अरुण खरात ( तमाशा लोककला व लोक कलावंत अभ्यासक)

img 20260509 wa0802
img 20260509 wa0802

पंचनामा विशेष – तमाशा फड मालक विलास गायकवाड यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे माझे आणि विलास गायकवाड यांचे अनेक वर्षापासूनचे प्रेमाचे व मैत्रीचे संबंध होते. विलास गायकवाड जेव्हापासून समनापूरला चैत्र महिन्यात तमाशाची राहुटी लावायचे तेव्हापासूनची ओळख मी तेव्हा त्यांची समनापुरला जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन देशदूत या वर्तमानपत्रात मुलाखत छापली होती. आता त्यांची नारायणगावला तमाशाची राहुटी लागते. म्हणजे तमाशा फडाची प्रगती झाली होती.

चैत्रात नारायणगावला गेलो की विलास भाऊ आग्रह करून थंडगार काहीतरी पाजणारच. मागील वर्षी नारायणगावला गेलो असता तेथे पत्रकार रायचंद शिंदे यांनी न्यूज चॅनल साठी आम्हा गावकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या असता त्यात मी म्हटलो की, सर्व तमाशा फड मालक खुश आहेत कारण सर्व जणांच्या बऱ्यापैकी बुकिंग झाले आहे. ही मुलाखत प्रसारित झाल्यानंतर विलास भाऊनी लगेच मला फोन करून सांगितले की अरुण भाऊ असे अनेक फड मालक आहेत की ज्यांच्या अगदी थोड्याच प्रमाणात करार पावत्या झालेल्या आहेत अशा अनेक गोष्टी त्यांनी मला सांगून तमाशा पंढरी नारायणगाव येथील दुसरीही बाजू चांगल्या प्रकारे मांडली.

विलासराव बोलण्यात खूप रोखठोक होते अनेक व्हाट्सअप ग्रुप वरती त्यांना काही गोष्टी पटल्या नाहीत तर ते स्पष्टपणे नाराजी व्यक्त करून लिहीत असत व शेवटची ओळ हमखास असायची की कुणाला काही अडचण असेल तर मला फोन करा. असा त्यांचा बिनधास्त स्वभाव होता. मुला मुलींचे चांगल्या प्रकारे शिक्षण होवून ते विलास गायकवाड यांचा तमाशा कलेचा वारसा समर्थपणे चालवत होते. तरीही बाहेरून धडधाकट वाटणारा हा माणूस आत मधून पूर्णपणे खचला होता असे त्यांच्या बोलण्यातून नेहमी मला वाटायचे.

धंदा नाही अशी त्यांची तक्रार असायचीच परंतु अलीकडे त्यांच्या आरोग्या विषयी ही भरपूर तक्रारी असायच्या. एक कलावंत माझ्यासारख्या एका कलाप्रेमीला विश्वासाने काही गोष्टी सांगायचा. काही दिवसांपूर्वीच संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांचे मार्फत ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर यांना कलारत्न पुरस्कार प्रदान सोहळ्या वेळी आमची भेट होऊन अनेक विषयांवरती प्रदीर्घ चर्चा झाली. तेव्हाही त्यांनी तब्येत साथ देत नाही असे सांगितले तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या आपण सगळ्या तपासण्या करून घेऊ व तज्ञ डॉक्टरांना दाखवू तेव्हा त्यांनी सांगितले की उपचार तर चालूच आहे घरचेही खूप काळजी घेतात परंतु गरज पडली की नक्की मी येईल असे सांगितले. कार्यक्रम स्थळापासून गेस्ट हाउस ला जाऊ पर्यंत गाडीत आमची विलास भाऊ यांच्या तब्येती विषयीच चर्चा चालू होती या गोष्टीला तमाशा फड मालक सुनील कुमार संभाजीनगरकर तसेच गाडीतील इतर कलावंतही साक्षीदार आहेत.

संगमनेर येथील शासकीय विश्राम गृहामध्ये आम्ही सर्वांनी एकत्रित फोटो ही काढले. ते फोटो आणि ती भेट आमची शेवटचीच ठरली…. आपल्या उच्चशिक्षित मुलींनाही पायात चाळ बांधून जाणून बुजून तमाशा रंगमंचावर आपली कला सादर करायला लावणारा बाप हा केवळ लेकरांच्या भवितव्याबाबत विचार करत नव्हता तर तमाशा कलेच्या सुवर्णकाळाबाबत स्वप्नही बघत असावा म्हणून तर सावकाराकडून कर्ज काढून जाणून बुजून उच्च शिक्षित मुलींसह संपूर्ण कुटुंबाला त्यांनी या तमाशा क्षेत्रात उतरवले होते. परंतु पाहिजे तसा व्यवसाय होत नसल्यामुळे सदैव ताणतणावात राहणाऱ्या या फडमालकास शासनाकडून वेळीच काही मदत मिळाली असती तर कदाचित हा जीव वाचला असता.

आत्ताही हा पॅरालेसिसचा झटका एखाद्या नाट्य किंवा सिनेमासृष्टीतील कलावंतास आला असता तर लगेच तातडीची मदत मिळाली असती. परंतु तमाशा कलावंतांकडे सदैव दुर्लक्ष तमाशा फड मालक कलावंत सरकारकडे अनेक वर्षापासून करत असलेल्या मागण्याही मान्य होत नाहीत.

एकंदरीत चोहोबाजूने विचार केल्यास तमाशा कलावंत विलास गायकवाड यांचा मृत्यू हा शासनाच्या अनस्थेचाच बळी आहे असे मला वैयक्तिकरित्या वाटते….. तमाशा फड मालक विलास गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अरुण खरात
( तमाशा लोककला व लोक कलावंत अभ्यासक )

Related posts

चिमण्या वाचवा, निसर्ग टिकवा! पहाडदरा येथे ‘टीव्हीएस कंपनीच्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट’तर्फे जागतिक चिमणी दिन साजरा !!

Chief Editor

तमाशाकडे पाहण्याचा रसिक मायबापांचा दृष्टिकोन चांगला; तमाशा कलेवर रसिकांचे आजही प्रेम !!

Chief Editor

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी !!

Chief Editor

Leave a Comment