
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील गरजू महिला, परित्यक्ता आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी अनुसया महिला उन्नती केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. राज्याचे नेते मा.गृह मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या अध्यक्षा सौ. किरणताई वळसे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हे केंद्र कोणतेही प्रदर्शन किंवा जाहिरातबाजी न करता निष्ठेने समाजसेवा करत आहे.

विशेष म्हणजे तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसलेल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी कोणत्याही प्रकारचे ॲप डाऊनलोड करण्याच्या अटीशिवाय हे केंद्र प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.



याच कार्याची पावती म्हणून नुकतेच मंचर येथील श्री शरदचंद्रजी पवार सभागृह, कृषि उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘समाधान शिबिराच्या’ पहिल्या टप्प्यात संस्थेचा विशेष गौरव करण्यात आला. आंबेगावचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या कार्याचे जाहीर आभार मानले आणि संस्थेचा सन्मान केला.

प्रशासकीय योजना आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा बनून हे केंद्र ज्या पद्धतीने सातत्याने पाठपुरावा करते, त्यामुळे अनेक वंचितांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले आहेत, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

या समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाने एकाच ठिकाणी सर्व योजनांचे लाभ देण्याचा जो स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे, त्यामध्ये अनुसया केंद्राचे योगदान मोलाचे ठरले आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या हातात योजनांचा लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याची केंद्राची कार्यपद्धती आज संपूर्ण तालुक्यासाठी कौतुकाचा विषय ठरली आहे.

शासकीय कामात सामाजिक बांधिलकी जपून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या या संस्थेमुळे खऱ्या अर्थाने महाराजस्व अभियानाचा हेतू साध्य होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.


