
कलगीतुऱ्यातील खरा रस हरपला; रामदास गुंड यांच्या निधनाने कलेत पोकळी – शाहीर ठकसेन शिंदे (गुळूंचवाडीकर)
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे मुक्ता देवी यात्रेनिमित्त रविवारी (दि. १९) रंगणाऱ्या कलगीतुऱ्याच्या जंगी सामन्यात प्रसिद्ध तुरेवाले शाहीर रामदास गुंड काताळवेढेकर यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांची उणीव भासली. नियोजित सामन्यात बदल करावा लागला. त्यामुळे संपूर्ण फड अक्षरशः सुना-सुना पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गेली जवळपास वीस वर्षे कलगीतुऱ्याच्या रंगभूमीवर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले कलगीवाले शाहीर ठकसेन शिंदे गुळूंचवाडीकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “कलगी तुरा या पारंपारिक लोककलेतील एक तेजस्वी हिरा हरपला आहे. कलगीतुऱ्यातला खरा रस रामदास गुंड हेच होते. त्यांच्या जाण्याने आता प्रत्येक सामन्यात त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवेल.”
रामदास गुंड यांची खासियत म्हणजे कोणत्याही विषयावर तत्काळ सवाल-जवाब रंगवण्याची त्यांची अद्भुत क्षमता. डफावर एकदा थाप पडली की, ते आपल्या गाढ्या अभ्यासाच्या जोरावर पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर प्रभावी मांडणी करत. विशेष म्हणजे त्यांच्या हातात कधी वही-पेन दिसत नव्हते; शास्त्र आणि पुराणांचा सखोल अभ्यास त्यांच्या स्मरणातच कोरलेला होता.
“शास्त्र पुराणात ज्याचा हातखंडा, त्याला म्हणतात रामदास गुंडा,” असे ते स्वतः विनोदाने म्हणत असत, अशी आठवणही शिंदे यांनी यावेळी सांगितली. जंगी सामन्यांमध्ये एकमेकांवर टीकाटिप्पणी करत असलो, तरी कार्यक्रमानंतर एकत्र बसून चहा घेण्याची आमची परंपरा होती, असे सांगत त्यांनी दोघांमधील मैत्रीपूर्ण नातेही अधोरेखित केले.
रामदास गुंड हे केवळ उत्तम शाहीर नव्हते, तर ते इतर कलाकारांशीही अत्यंत प्रेमाने वागत. त्यांनी कधीही मनात राग धरला नाही. त्यांच्या या स्वभावामुळेच ते सर्वांच्या मनात घर करून होते.

त्यांच्या निधनामुळे कलगी तुरा या पारंपारिक लोककलेत मोठी पोकळी निर्माण झाली असून, इतका गाढा अभ्यासक शाहीर पुन्हा होणे कठीण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पारगाव येथील कलगीतुऱ्याच्या सामन्यात शाहीर ठकसेन शिंदे यांनी रामदास गुंड यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. ते भावूक झालेच परंतु ऐकणारे श्रोते देखील भावूक झाले त्यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

पारगाव (ता.आंबेगाव) येथे कलगीतुरा सामन्यात दिवंगत शाहीर रामदास गुंड यांच्या आठवणी सांगताना शाहीर ठकसेन शिंदे यांना अश्रू अनावर झाले.



