
पंचनामा विशेष – साभार लेख श्री. बाबाजी कोरडे (लोककला अभ्यासक)
महाराष्ट्रामध्ये ‘लोकनाट्य तमाशा’ या कलाप्रकाराच्या संक्रमन व विकसित होण्यासाठी अनेक जाती धर्मातील लोककलावंतांनी आपापल्या परीने योगदान दिले आहे. त्यामध्ये आपापल्या अंगभूत गुणांना विकसित करत तमाशाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात ‘गोंधळी’ समाजातील अनेक कलावंतांनी आपले देखील योगदान दिलेले दिसून येते.
महाराष्ट्रात आजही देवीची परंपरागत जागरण-गोंधळ घालण्याची परंपरा आहे. काव्य, नाट्य, नृत्य,गायण,अभिनय अशा चतुरस्त्र कलाप्रकारामधून व त्या परंपरेतून अनेक शाहीर तसेच लोककलावंत महाराष्ट्राला दिलेले दिसून येतात. याच गोंधळी परंपरेच्या चतूरस्त्र गुणांचा उपयोग पुढे तमाशा परंपरा विकसित होण्यासाठी झाला आहे. त्यातूनच तमाशाला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्याचे कार्य ज्या गोंधळी परंपरेच्या लोककलावंतांनी केले,त्यात प्रामुख्याने ‘राधाकृष्ण राहूरीकर’ या अष्टपैलू कलावंताचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल !!
सन १९४७ साली वडील अंबादास व आई हिराबाई यांच्या पोटी राधाकृष्ण यांचा जन्म झाला.लहानपणीच आपल्या वडिलांच्या सोबत गोंधळासारख्या भक्तीरसपुर्ण लोककलेतून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला. सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.परंतू नोकरी व्यवसाय न करता आपल्या अंगभूत कलागुणांच्या जोरावर राधाकृष्ण यांनी तमाशा क्षेत्रात पदार्पण केले.
१९६४ साली तमाशा महर्षी तुकाराम खेडकर यांच्या अचानक मृत्यूनंतर त्यांच्या फडातील अनेक दिग्गज कलाकार विखूरले गेले.त्यातूनच पुढे १९६५ साली वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर या तमाशा फडाची स्थापना झाली. विष्णू चासकर, अनंत पांगारकर, दत्तोबा चव्हाण, तसेच स्त्री कलावंत म्हणून पारूबाई सविंदणेकर, कौसल्या पुणेकर, उषा कोल्हापूरकर अशा नामवंत कलाकारांबरोबर राधाकृष्ण राहूरीकर हेदेखील सदर फडात सामील झाले.
बालवयातच माधवराव नगरकर सह गणपतराव सविंदणेकर या नामवंत तमाशा फडात त्यांनी बिगारी काम करत असताना इतर जेष्ठ कलावंतांचा अभिनय,गायन तसेच वादन इत्यादी कामांचे जवळून निरीक्षण केले होते.तसेच घरातूनच या गोष्टींचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले असल्याने त्यांना या गोष्टी शिकून घेण्यासाठी फार वेळ लागला नाही.
गोरा वर्ण, भरपूर उंची तसेच प्रमाणबद्ध शरीर या गोष्टींमुळे राधाकृष्ण सर्वांच्या नजरेत ताबडतोब भरत असे.त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यातील हजरजबाबी व मार्मिकपणामुळे लवकरच त्यांना गणगौळण व रंगबाजीमध्ये सरदारकी वाट्याला आली. अंगभूत अभिनय कौशल्याने त्यांनी लवकरच वगनाट्यात प्रवेश केला, आणि प्रेक्षकांच्या पसंतीला देखील उतरले !
‘चिंचोलीचा देशमुख’, ‘गुरूची विद्या गुरूला’, ‘गवळ्याची रंभा’ अशा गाजलेल्या अनेक वगनाट्यांमधील विविध भुमिका साकार करून राधाकृष्ण यांनी गायन-वादनाबरोबरच अभिनयातदेखिल आपला ठसा उमटवला. तमाशाचा सुवर्णकाळच होता तो ! नवनवीन वगनाट्यांना मागणी वाढत होती.सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक तसेच रजवाडी व सत्य घटनेवर आधारित वगनाट्यांना महाराष्ट्रातील तमाशा रसिकांनी डोक्यावर घेतले होते. त्यामुळे अनेक लोकनाट्य लेखक उदयाला येऊन नवनवीन प्रयोग सादर करण्यात येण्याचा तो काळ होता. त्यातूनच अनेक तमाशा अभिनेत्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्या.
माधवराव गायकवाड, शंकरराव कोकाटे, रामचंद्र बनसोडे, अशोक पेठकर, अनंत पांगारकर , दत्तोबा चव्हाण, यांच्याबरोबरच राधाकृष्ण राहूरीकर हेदेखील अभिनयामध्ये अग्रेसर राहून ह्या महान अभिनेत्यांनी तमाशा रंगभूमीला अत्यंत मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.
वगनाट्यांबरोबरच गणगौळण व रंगबाजीमध्ये राधाकृष्ण यांनी कृष्ण, मावशी अशा विविधरंगी भुमिका साकारून आपल्या चतूरस्त्र अभिनयाची चुणूक दाखवलीच, याशिवाय पारंपरिक गणगौळण सादरीकरणात नावीन्यपूर्ण प्रयोग सादर केले.
सन १९६७ साली ढवळपुरीकर-महाडीक तमाशा मंडळामध्ये एका नवोदित व सिद्धहस्त वगनाट्य लेखकाचा प्रवेश झाला.ते म्हणजे, ज्यांच्या प्रत्येक वगनाट्याने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले असे लेखनीसम्राट गणपतराव व्ही.माने (चिंचणीकर)…!
पहील्याच वर्षी माने साहेबांचे ‘भिल्लांची टोळी’ हे वगनाट्य बसवले गेले. त्यामध्ये राधाभाऊंनी ‘राजकुमार’ ही भूमिका साकारून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी माने साहेबांनी एक ऐतिहासिक तसेच महत्वाकांक्षी वगनाट्याचे लेखन करून, रंगमंचावर आणण्याचे नियोजन केले. ते वगनाट्य म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील उत्तरार्धात केलेल्या संघर्षाचा धगधगता इतिहास…
‘महाराष्ट्र झूकत नाही’…!
या वगनाट्यामध्ये ‘खंडोजी’ हे पात्र राधाकृष्ण करणार होते.त्यांनी तशी तयारीही केली होती. संभाजीच्या आवाहनात्मक भुमिकेत स्वतः नटसम्राट माधवराव गायकवाड चांदोरीकर हे सर्वानूमते ठरले होते. याच वगनाट्याने त्या काळात महाराष्ट्रात गर्दीचे सर्व उच्चांक मोडले होते. एकदा पुण्यातील ‘आर्यभुषन’ थिएटरमध्ये सदर वगनाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.पंधरा दिवस आधीच वगनाट्याची जाहीरात केवळ पुणे शहरातच नव्हे, तर आसपासच्या पन्नास किलोमीटर परिसरात पोस्टर व लाऊडस्पिकरच्या माध्यमातून केली गेली. प्रयोगाच्या चार दिवस आधीच संपूर्ण तिकीटे विक्री झाली. नविन कोरी ड्रेपरी, शस्त्रे , नेपथ्य सर्व या गोष्टींसाठी भरपूर प्रमाणात पैसा खर्च केला गेला.
परंतू प्रयोगाच्या आदल्याच दिवशी नेहमीच यशस्वीपणे छ. संभाजी महाराजांची आवाहणात्मक भुमिका साकारणारे माधवराव गायकवाड यांना वैयक्तिक कारणासाठी घरी जावे लागले. त्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले ! कारण संभाजी महाराजांची तेजस्वी व मध्यवर्ती भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य पेलणे, हे सामान्य नटाचे काम नव्हते ! परंतु स्वतः लेखक गणपतराव माने व गूलाबराव बोरगांवकर यांच्या मनात त्या भुमिकेला ‘राधाकृष्ण’ योग्य न्याय देऊ शकेल अशी खात्री होती. त्यामुळे त्यांनी राधाकृष्ण यांचेच नाव सर्वांसमोर ठेवले. सर्वानूमते संमती झाली,पण स्वतः राधाभाऊंची मात्र गाळण उडाली !
वगनाट्यातील संवाद पाठांतर व यथायोग्य सादरीकरण करण्याची तयारी करताना संपूर्ण रात्र स्वतः लेखक गणपतराव माने, गुलाबराव बोरगावकर यांनी राधाकृष्ण यांच्याबरोबर जागून काढली.
दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रम चालू झाला.गणगौळण संपली, आणि निवृत्तीबुवा कुरणकरांनी शिलकार ठोकला !
आपल्या पहाडी व कडक आवाजात वगनाट्यातील पात्र परिचय करून देत स्वतः लेखक गणपतराव माने यांनी….”प्रथमच संभाजी महाराजांच्या संघर्ष व आवाहनात्मक भुमिकेत ‘राधाकृष्ण राहूरीकर…!”
असे नांव उच्चारताच प्रेक्षकांच्या शिट्ट्या व टाळ्यांच्या कडकडाटात अवघे ‘आर्यभुषन’ थरारले !गोरा वर्ण, कुरळे केस व रुबाबदार व्यक्तिमत्व या जोरावर राधाकृष्ण राहूरीकर यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’ असे काही साकारले, की वगनाट्य संपले तरी आर्यभुषनमधील टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता !!
स्वतःच्या अंगभूत अभिनयातून त्या भुमिकेत ते इतके एकरूप झाले होते की, वगनाट्य संपल्यावर त्यांना ताप येऊन दरदरून घाम फुटला आणि ते मुर्छीत झाले !
त्यांच्यातील ‘संभाजीराजां’ना दृष्ट लागली होती !
नृत्य, अदाकारी, गायण, अभिनय आणि वादन अशा सर्वच कलाप्रकारांमध्ये राधाकृष्ण राहूरीकर यांनी आपले योगदान सिद्ध करून लोकनाट्य तमाशातील ‘चौरंगी चिरा’ अशी बिरुदावली मोठ्या अभिमानाने संपूर्ण तमाशा क्षेत्रात मिरवली.
सन १९९६ साली पुणे जिल्ह्यातील बेल्हे या गावाजवळील गुंजाळवाडी या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना त्यांना छातीत जोरदार कळ आली,व ते मुर्छीत झाले. त्याचवेळी त्यांनी डोळे मिटले, ते कायमचेच !
संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी तमाशा रंगभूमीची मनोभावे सेवा केली, त्या रंगभूमीनेच त्यांना मातेप्रमाने सामावून घेतले…!!
त्यावेळी ते संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या स्वतंत्र तमाशा फडात काम करीत होते. स्वतः महाडीकांनी त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी फक्त पोहचतेच केले नाही, तर त्यांच्यावर ज्या पुर्वीच्या फडमालकाची उचल होती, तीदेखील राधाभाऊंच्या पश्चात महाडीकांनी मिटवली ! एव्हढे केवळ प्रेक्षकांचेच नव्हे तर फडमालकांचेदेखिल प्रेम राधाकृष्ण राहूरीकर यांनी आपल्या चतूरस्त्र अभिनयाने मिळवले होते.
लोकनाट्य तमाशाचा ज्यांनी सुवर्णकाळ गाजवून स्वतः अनूभवला, असे चतुरस्त्र अभिनेते राधाकृष्ण राहूरीकर यांना महाराष्ट्रातील तमाम तमाशा रसिकांच्या तर्फे विनम्र अभिवादन…..
- बाबाजी कोरडे
(तमाशा व लोककलावंत अभ्यासक)
मा.सदस्य, राज्य सांस्कृतिक धोरण समिती, सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र शासन.
राजगुरुनगर, पुणे
संपर्क :9730730146


