सामाजिक

शाहीरी भुलली अभंगाला…राजा पाटील (बापू) कवठे महांकाळकर

img 20260327 wa0461
img 20260327 wa0461

साभार लेख – बाबाजी कोरडे (तमाशा व लोककलावंत अभ्यासक)

पंचनामा विशेष – महाराष्ट्रातील ‘सांगली’ जिल्हा हा कुस्तीचा फड,ऊसाचा फड, राजकारणाचा फड, तमाशाचा फड तसेच लेखनीचा फड गाजवणारा जिल्हा म्हणून अवघ्या हिंदुस्थानभर ओळखला जातो.
कुस्ती क्षेत्रात हिंदकेसरी मारूती माने यांनी आपले योगदान दिले आहे.
भारतात याच जिल्ह्याने शेतीत सर्वात जास्त एकरी उसाची मात्रा घेण्याचा विक्रम केला आहे.

यशवंतराव चव्हाणसाहेबांपासून, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील,आर आर पाटील (महाराष्ट्राचे लाडके आबा) तसेच प्रकाशबापू पाटील, शालिनीताई पाटील, मदन पाटील तर आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे नामदार जयंतराव पाटील अशा दिग्गजांनी राजकीय फडात आपले नाव अजरामर केले आहे.
तमाशा क्षेत्रात उमा-बाबाजी सावळजकर, सातू-हिरू कवलापूरकर, यांच्यापासून सुरू झालेली परंपरा त्यांच्या पुढील पिढ्या नेटाने पुढे घेऊन जाण्यासाठी काळू-बाळू कवलापुरकर, शिरढोणकर घराणे, बोरगांवकर मंडळी,तिसंगिकर व पाचेगावकर घराणी जोमाने आपले नाव अखंड महाराष्ट्रात गाजवत आहेत….
विष्णूपंत भावे यांनी प्रथमच सांगलीत संगित नाटकाचा प्रयोग केल्याचा इतिहास आहे.

त्याचप्रमाणे लेखनीचा फड देखील याच सांगली जिल्ह्यातील दिग्गज मंडळींनी गाजवला आहे,व गाजवत आहेत आणि पुढेही गाजवणारच….!!
शाहीर पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, अण्णाभाऊ साठे, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख,तिसंगीकर व शिरढोणकर घराणी यांनी तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव कळसाला पोहोचवले !
…तर आजच्या काळात जेष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक पानिपतकार मा.श्री.विश्वास पाटीलसाहेब यांनी त्या कळसावर जी डौलदार पताका फडकवली, त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताचे नाव साहित्य क्षेत्रात
याच सांगली जिल्ह्यातील प्रतिभावंतांनी गाजवलेले दिसून येते !

काव्य, नाट्य, नृत्य, संगीत अशा प्रकारच्या चौदा विद्या व चौसष्ट कला केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर आपापल्या प्रांतात त्या त्या स्थानिक संस्कृतीप्रमाणे अनादी काळापासून चालत आलेल्या आहेत.विशेष करून भारतीय उपखंडातील वैविधतेमुळे त्यामध्ये अनेक प्रकारची वैविध्यता आपल्याला दिसून येते.अनेक सणसमारंभांमध्ये त्यांचे सादरीकरण करून भारतीय संस्कृतीत त्या कलांचे केवळ जतनच नव्हे,तर त्यांना उत्कर्षापर्यंत पोहोचवीण्याचे फार मोठे कार्य अनेक ज्ञात-अज्ञात शाहीर व लोककलावंत यांनी केले आहे.
भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतीचा हंगाम होळीपौर्णिमेला संपतो.आणि लोकांना सणसमारंभ व यात्रा-जत्रांचे वेध लागतात. लोकवाङ्मय व लोककला जोपासत असताना याच समारंभाच्या निमित्ताने त्याचे सादरीकरण व संवर्धन घडत गेलेले आपल्याला दिसते.

गावखेड्यामध्ये ज्यावेळी होळी पेटवली जाते, त्यावेळी होळीच्या उबदार वातावरणात संगीत, नृत्य, नाट्य व शाहीरी जलसे सादर करण्याची प्रथा व परंपरा अनादी काळापासून आजतागायत चालू आहे.यातूनच लोकरंजन व प्रबोधनाचा वारसा भारतीय उपखंडात चालत आलेला आहे.

अशाच होळीपौर्णिमेच्या दिवशी सन १९५२ साली कवठे महांकाळ जि.सांगली येथे यशवंतराव पाटील यांच्या घरात जे पुत्ररत्न जन्माला आले,
…तेच आजचे प्रथितयश वगनाट्य लेखक, तमाशा फडमालक व शाहीर ‘राजा पाटील कवठे महांकाळकर…!!’
ज्यांना अवघा महाराष्ट्र ‘बापू’ या आदरयुक्त नावाने संबोधतो !

बापूंचे आजोबा स्व.तात्यासाहेब पाटील हे स्वतः भेदीक शाहीर असल्याने पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे अनेक प्रयोग होत असत.त्यांच्याबरोबर बापूंचे वडील यशवंतराव पाटील हेदेखील त्यात सहभाग घेत असत.त्यामुळे शाहीरीचे बाळकडू बापूंना घराण्यातील परंपरेतून मिळत गेले.वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी प्राथमिक शाळेतच त्यांनी स्वरचीत गवळण सादर करून स्थानिक ग्रामस्थ व शिक्षकांसमोर आपल्या शाहीरीचा श्रीगणेशा केला. तर वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वडील यशवंतराव यांच्या प्रेरणेने होळीच्या महोत्सवामध्ये संत तुकारामांची वेशभूषा करून स्वतःमध्ये तुकारामाला सामावून घेतले !

सातवीपर्यंत शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांना प्राथमिक शिक्षक या सरकारी नोकरीसाठी विचारण्यात आले, परंतु आपल्या शाहीरीच्या व लोककलेच्या आवडीमुळे त्यांनी त्या सरकारी नोकरीला नकार दिला !
त्यामुळे स्वतःमधील शाहीरी व अभिनयाचे वेड जोपासण्यासाठी बापूंची पावले आपोआपच तमाशा कडे वळली गेली.सन १९७० साली त्यांनी ‘काळू-बाळू कवलापुरकर’ या नामांकित तमाशा फडात प्रवेश केला.याच फडात त्यांनी शाहीर भाऊ फक्कड लिखित ‘हरीश्चंद्र-तारामती’ या संगीतप्रधान पौराणिक वगनाट्यात ‘बाळ रोहीदास’ ही भुमिका साकारून आपल्या अभिनयाने तमाशा रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुढे सतत चार वर्षे त्यांनी याच फडात अनेक विविध भुमिका साकारून आपली अभिनय क्षमता विकसित केली.
त्यावेळी तमाशासम्राट तुकाराम खेडकर यांचे नाव अवघ्या महाराष्ट्रात गाजत असताना बापूंनी या तमाशाफडात प्रवेश करून,येथेच त्यांनी अभिनेते व गायक साहेबराव नांदवळकर यांच्याकडून गायकीचे धडे गिरवायला सुरुवात केली. नांदवळकरांसारख्या चतूरस्त्र गायकाकडून त्यांना गायकीतील अवघड चिजा व हरकती शिकण्यासाठी खुप मदत झाली.
१९७४-७५ दरम्यान वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळात प्रवेश करून बापूंनी ‘भक्त पुंडलिक’ या वगनाट्याची निर्मिती केली. आणि आपले नाव वगनाट्य लेखक म्हणून गाजवले. याच वगनाट्यात तब्बल सोळा गाणी लिहून दत्ता महाडिक यांनी प्रत्येक गाण्याला वेगवेगळ्या चाली दिल्या….
आणि शाहीर राजा पाटील (बापू) यांनी त्यावर खूष होऊन महाडीकांना प्रथमच ‘संगितरत्न’ असे संबोधले ! पुढे हेच विशेषण महाडीक यांनी आपल्या हयातभर मोठ्या अभिमानाने मिरवलेदेखील !!

आनंद महाजन जळगांवकर या ऐश्वर्यसंपन्न तमाशाफडात काम करत असताना तिथे संगितबारीनंतर रोज नविन वगनाट्याच्या सादरीकरणाची प्रथा होती.त्यामुळे बापूंना वगनाट्य लेखनाची आपोआपच संधी मिळाली. जेष्ठ व श्रेष्ठ वगनाट्य लेखक स्व.गणपतराव व्हि.माने यांना प्रेरणास्थान मानून बापूंनी तब्बल बावीस वगनाट्यांचे लेखन याच काळात केले !
भक्त पुंडलिक, खेकडा चालला दिल्लीला, रक्तात न्हाली अब्रू, वेडा झालो तुझ्यासाठी, डॉ.शर्मा, कायदा गाढव आहे का, या टोपीखाली दडलंय काय ? अशा यशस्वी वगनाट्यांचे सादरीकरण
कलाभुषन रघूवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर, आनंद महाजन जळगांवकर, भिका-भिमा सांगवीकर यांबरोबरच अनेक दिग्गज तमाशाफडांमधून त्यांच्या वगनाट्यांचे शेकडो प्रयोग आत्तापर्यंत यशस्वीपणे सादर झाले आहेत.आणि यातूनच महाराष्ट्रातील तमाशा रसिकांचे लोकरंजन व प्रबोधन तमाशाच्या माध्यमातून झालेले दिसून येते..!!

उच्च प्रतिभा व महत्वाकांक्षा असलेला कोणीही कलावंत स्वतःच्या तमाशा फडाचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपड करत असतोच. त्यातूनच बापूंनी १९७७ साली ‘राजा पाटील लोकनाट्य तमाशा मंडळ’ या फडाची स्थापना केली.याकामी कवठे महांकाळ येथील ग्रामस्थांनी त्यांना भरघोस मदत केली.
प्रथम प्रयोग सादरीकरणासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त ‘सांगली सहकारी साखर कारखाना’ येथे बापूंच्या तमाशाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
वसंतदादा पाटील यांनी स्वहस्ते नारळ वाढवून रंगमंचासमोर मातीतच बैठक मारली…
… आणि बापूंनी डफावर थाप !
जातीवंत मी पाटील असूनी
ठेवली ‘पाटीलकी’ गुंडाळून,
तमाशाचा गं डंका गाजवून
फिरतो दाही दिशा गर्जून ||
झुंज झुंजलो रक्त आटलं
फावला मुर्खाला इथं हशा,
जिद्द मनाची उमदेपणाची
जगावेगळा केला तमाशा ||
सोनं घेऊनी शंभर नंबरी
गेलो विकाया लव्हारादारी,
लाथ मारूनी बुटानं ठोकरी
नाही दिली किंमत बरोबरी ||
आमच्या संग जो टक्कर खेळंल
शिकवू आम्ही धडा खरा,
निर (पाणी) काढू मातीत गाडू
वरती राहील नारी लहरी तुरा ||
पुर्वेला गं नारी पंढरपूर
चल इठ्ठलाच्या दर्शनाला,
पश्चिमेला गं कोल्हापूर
शाहू महाराजांचा जन्म झाला ||
सांगली जिल्ह्यात गांव आमचं
‘कवठे महांकाळ’ म्हणती त्याला,
कलावंतांचे आश्रयदाते
तिथंच नारी माझा जन्म झाला..|||
-राजा पाटील (बापू)
ही छक्कड ऐकून स्वतः वसंतदादा पाटील एवढे भारावून गेले की, स्वहस्ते त्यांनी बापूंना फेटा बांधून तब्बल ५०००/-रुपये बक्षीस दिले.
(त्याकाळी सोन्याचा भाव ५००/-रुपये तोळा होता !)
स्वतःच्या शाहीरी व तमाशा फडामुळे बापूंचे नांव अल्पावधीतच गाजू लागले.

१९७७ ते १९८१ अशी पाच वर्षे बापूंनी पाच वर्षे स्वतंत्र तमाशा फडाच्या माध्यमातून लोकरंजनाबरोबर लोकप्रबोधन करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात आपले मोलाचे योगदान दिले आहे. प्रचंड यश मिळत असतानाही आर्थिक गणित जुळत नसल्याने त्यांनी तो फड बंद केला. आणि आपले संपूर्ण लक्ष शाहीरी व लेखनीवर केंद्रीत केले.
याच काळात ते समाजसुधारक व क्रांतीविर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या सहवासात आले.
शाहीरी इतिहासात शाहीर राम जोशी यांना समाजाने किर्तनाकडे वळवले. त्याचप्रमाणे शाहीर अनंत फंदी यांना अहील्याबाई होळकरांनी किर्तनाकडे वळवले.
तसे शाहीर राजा पाटील (बापू) यांना तमाशा सारख्या श्रुंगारप्रधान रसाकडून सांप्रदायिक भक्तीरसाकडे क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी वळवले !

त्यामुळे बापुंचे अवघे भावविश्व बदलले. नागनाथ अण्णा यांनी त्यांना ‘जगद्गुरू संत तुकाराम’ यांच्या जीवनावर पोवाडा सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले.आणि त्यातूनच बापूंनी संत तुकारामांची जीवनगाथा अभ्यासायला सुरूवात केली.
…. आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील पोवाड्याची निर्मिती झाली !
त्या प्रसिद्ध पोवाड्याचे प्रथमच सादरीकरण १० मे २०१० साली सांगली येथे भरलेल्या ‘विद्रोही साहित्य संमेलना’मध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. व तेथून पुढे अखंड महाराष्ट्रात त्याचे अनेक प्रयोग होऊन, देहू येथील महाविद्यालयात देखिल त्या कार्यक्रमाचे सादरीकरण बापूंकडून केले गेले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बहूधा प्रथमच पोवाड्यातून तुकारामांची जीवनगाथा पोहोचविण्याचे श्रेय शाहीर राजा पाटील (बापू) यांनाच जाते !
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री व उपमुख्यमंत्री नामदार आर आर (आबा) पाटील हे बापूंचे नेहमीच कौतुक करीत असत.
त्यांनीच एकदा बापूंच्या कार्याची दखल घेऊन आपल्या ‘चित्रकूट’ बंगल्यावर बापूंना बोलावून मानाचा फेटा बांधून, तब्बल ७५०००/-रूपयांची थैली बापूंना सप्रेम भेट दिली आहे.
अशी आठवण ते आजही सांगतात.
फक्त सातवी शिक्षण झालेल्या शाहीर राजा पाटील (बापू) यांच्या सोळा लावण्यांवर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रा. आबा शिंदे यांनी डॉक्टरेट (Ph.D.) केली आहे, एव्हढी प्रगल्भता त्यांच्या लेखनातून जाणवते.

तमाशा सारख्या श्रुंगारप्रधान रसाकडून त्यांचा जीवनप्रवास आता सांप्रदायिक भक्तीरसाकडे चालू आहे.आणि याचे श्रेय ते क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना देतात.
तमाशाच्या ‘चाळां’पासून शाहीर राजा पाटील (बापू) यांचा सुरू झालेला कलाप्रवास आता भक्तीमार्गातील ‘टाळां’ पर्यंत पोहोचला आहे.याच माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीची बौद्धिक मशागत करण्याचे शिवधनुष्य त्यांनी आपल्या खांद्यावर जे घेतले आहे,ते अखेरच्या श्वासापर्यंत मोठ्या अभिमानाने मिरवण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे..!
मा.मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील, नामदार राजाराम बापू पाटील, मा.उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी नेहमीच शाहीर राजा पाटील (बापू) यांना मदतीचा हात व प्रोत्साहन दिले आहे.

असा हा सरस्वतीपुत्र मकरसंक्रांतीच्या दिवशी दि.१४ जानेवारी २०२२ रोजी, ज्या खुर्चीवर बसून आयुष्यभर आपल्या लेखणीतून सरस्वतीची सेवा केली,त्याच खुर्चीवर बसले असताना हृदयविकाराच्या पहील्याच झटक्याने त्यांचे वैकुंठगमन झाले.

लोकनाट्य तमाशा क्षेत्रातून निवृत्ती घेऊन स्वतःमधील शाहीरी कलागुणांना संतसाहित्याची सेवा करण्याचं भाग्य दोन दिग्गज व्यक्तीमत्वांना मिळालं.
त्यापैकी एक म्हणजे वैकुंठवासी शाहीर निवृत्तीबुवा कुरणकर ;
… आणि दुसरे म्हणजे आपले सर्वांचे लाडके लोकशाहीर राजा पाटील कवठे महांकाळकर म्हणजे बापू…
दुर्दैवाने दोघेही कर्तृत्वसंपन्न तसेच विद्वत्तासंपन्न असूनही एकही शासकीय पुरस्कार त्यांच्या वाट्याला आला नाही.

कवठे महांकाळ नगरपरीषदेने बापूंच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून नुकत्याच बांधलेल्या सभागृहाला
‘शाहीर राजा पाटील सभागृह’
असं नाव देऊन त्यांच्या चिरंतन स्मृती जपल्या आहेत.

संकलन व लेखन-बाबाजी कोरडे
मा.सदस्य, राज्य सांस्कृतिक धोरण समिती (लोककला उपसमिती)
सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र शासन.
संस्थापक, अध्यक्ष सांस्कृतिक व लोककला विकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.
राजगुरुनगर, पुणे
संपर्क:,9730730146

fb img 1773887073740

Related posts

राजुरी मध्ये ६७६ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी ;२८९ रुग्णांना मोफत चष्मे वाटप तर १३९ रुग्णांची होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया !!

Chief Editor

साकोरे मळा (शिंगवे ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्मार्ट टी.व्ही.ची भेट !!

Chief Editor

धामणीच्या खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवणारा किमयागार किशोर बापू विधाटे !!

Chief Editor

Leave a Comment