
पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता. आंबेगाव) येथील पुरातन राम मंदिरात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन पंचक्रोशीतील भाविकांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात गुरुवारी साजरा करण्यात आला.
सोळाव्या शतकात येथील श्रीराम मंदिरात राम,लक्ष्मण व सितामाईच्या मूर्तीची पुर्नप्रतिष्ठापना जगतगुरु संत तुकाराम महाराजाच्या हस्ते झालेली असल्यामुळे येथील राम मंदिरातील रामजन्म सोहळ्यासाठी वारकर्यांची व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी गर्दी झालेली होती.

पहाटे देवस्थानाचे परंपरागत पुजारी मधुकर क्षिरसागर,मुकुंद क्षिरसागर यांच्या हस्ते पंचामृताने श्रीरामाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर या सर्वांगसुंदर मूर्तीना वस्रालंकार घालण्यात आले.त्यानंतर महाआरती होऊन मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले.
श्रीरामाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील शिरदाळे,पहाडदरा जारकरवाडी,चिंचबाईवाडी येथील भाविकांनी गर्दी केलेली होती. सकाळी दहा वाजता ह.भ.प.गणेश महाराज गलांडे आळंदीकर यांचे रामजन्माचे किर्तन झाले. किर्तनाला साथ देण्यासाठी ज्ञानेश संजीवन वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील बाल वारकरी व गायनाचार्य माऊली महाराज देशमुख यांची उपस्थिती होती.संस्थेतील वारकर्यांच्या उपस्थितीने किर्तनाला रंगत आली.

मंदिराच्या गाभार्यात व देवाच्या पाळण्याभोवताली फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती.भाविकांच्या व महिलांच्या गर्दीने मंदिराचा सभामंडप भरलेला होता. रामजन्माच्या वेळी देवाच्या पाळण्यावर भुईमूगाच्या शेंगा,रेवड्या,खारका उधळण्यात आल्या. हा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडालेली दिसत होती.
दुपारी बारा वाजता मुकुंद क्षिरसागर व बाळासाहेब बेरी यांनी श्रीरामाची पंचधातूची देखणी मूर्ती पाळण्यात ठेवली त्यानंतर रेश्मा बोर्हाडे,गुणवंती क्षिरसागर यांच्यासह उपस्थित महिला भाविकांनी”राम जन्मला गं सखे राम जन्मला “हा रामजन्माचा पाळणा गीत म्हणण्यात येऊन यंदाचा रामजन्माचा सोहळा उत्साहात व आनंदात पार पडला.यावेळी भाविकांना खिचडी व केळीचा प्रसाद देण्यात आला.

किर्तनकार गलांडे महाराज व वारकरी भजनी मंडळाचा आदीनाथ जाधव व पांडुरंग बोर्हाडे यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी मंजूश्री क्षिरसागर,प्रिया क्षिरसागर,मोहीनी क्षिरसागर,विद्या रायरीकर,जयश्री पुरंदरे,शुंभागी कुलकर्णी,अञेय चितळे,मंदार क्षिरसागर,विठ्ठल रायरीकर,अमेय चितळे,प्रमोद देखणे,मुरलीधर देखणे,लक्ष्मीकांत रायरीकर व देवस्थानाचे परंपरागत सेवेकरी क्षिरसागर कुटुंबिय उपस्थित होते.


