
पंचनामा संपादकीय – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या मेंगडेवाडीच्या गवारीमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मातृ पितृ पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

गवारीमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असते.शाळेच्या माध्यमातून नेहमीच संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येत असतात.गुरूजन व स्थानिक ग्रामस्थ यांची वैचारिक नाळ उत्तमरित्या जुळली असल्याने शाळेचा नाव लौकिक राज्यभर पसरला आहे.

मातृ -पितृ पूजन म्हणजे आई वडिलांची पूजा करणे. हा दिवस पालकांचा पूजन दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व मुले आपल्या आई वडिलांची पूजा करतात आणी तिलक, हार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतात. हा दिवस आई वडिलांचा सन्मान करण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांमधील बंध दृढ करण्यासाठी, मुलामध्ये आदर,आज्ञाधारकता आणी नम्रता यासारख्या चांगल्या मूल्यांचे आत्मसात करण्यासाठी केले जाते.

आपल्यात येणारे संस्कार हे आई वडिलांच्या आशीर्वादाने येत असतात. त्यामुळे समाजात कशा पद्धतीने रहावे, व्यवहार कसा करावा हे न सांगता शिकविल्या जाते. आईच मातृत्व कधी संपत नसते. तर वडील खरा आकार मुलाला घडविण्यात खर्च करीत असते.जुने विचार व नवीन विचार एकत्र सांगड तयार करून सांसारिक जीवन जगण्याला फार महत्व आहे. आई वडिलांकडून आपल्याला उत्तम संगोपन मिळत असते.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वप्निल गवारी, उपाध्यक्ष वैशाली गवारी, सरपंच बाळासाहेब मेंगडे, मोरया मंगल कार्यालयाचे संजय गोरे, मेंगडेवाडी गावचे पोलीस पाटील नितीन मेंगडे, दैनिक पुढारी चे पत्रकार अरुण गोरडे सर, पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी सूर्यकांत गोरे, शाळेचे मुख्याध्यापक अजित सोनवणे सर, उपशिक्षक राहुल पाटील सर, कु. गायत्री सोनवणे. समस्त ग्रामस्थ गवारीमळा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच महिला मंडळ गवारीमळा उपस्थित होते.
यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला.यावेळी उपस्थित सर्वांसाठी मिष्टान्न भोजनाचे नियोजन करण्यात आले होते.





