
पंचनामा लोणी धामणी प्रतिनिधी – धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेच्या दुसर्या दिवशी सोमवारी (२ फेब्रुवारी २६) पंचक्रोशीतील मानाच्या काठीच्या पारंपारिक मानकर्यांच्या नवसाच्या काठ्यांची मिरवणूक पारंपारिक वाद्याच्या गजरात सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडार्याची मुक्तपणे उधळण करुन मोठ्या उत्साहात देवाच्या मानाच्या काठीचा सोहळा पार पडला.

धामणीच्या माही पुनवेच्या यात्रेला पारंपारिक नवसाच्या व मानाच्या काठीचे मानकरी समस्त राजगुरु मंडळी (अवसरी खुर्द ता.आंबेगांव) पंचरास मंडळी (संविदणे ता.शिरुर) कांदळकर (कवठे यमाई ता.शिरुर) वाळूंज पाटील (वाळूंजनगर,लोणी) आगरकर मंडळी (पाबळ ता.शिरुर) नरके मंडळी (तळेगांव ढमढेरे ता.शिरुर) समस्त पंचरास मंडळी (धामणी,लोणीता.आंबेगाव) आल्हाट मंडळी (येडगांव ता.जुन्नर)घोडे मंडळी हाजी टाकळी ता.शिरुर) येथील मानकर्यांनी सहभाग घेतला या सर्व आडनावांच्या कुळांनी या पारंपारिक सोहळ्याचा वारसा आजतगायत जतन केलेला दिसून येत होता.

सध्याच्या गतीमान व बदलतं युग असताना व सर्वत्र भौतिक साधनाची आणि चारचाकी दुचाकी वाहनाची रेलचेल असताना धामणीच्या खंडोबाच्या माही पुनवेच्या यात्रेला अनेक कुटुंबे आपल्या कुटुंबियासह पारंपारिक बैलगाड्या जुंपून दरमजल प्रवास करुन येथे येतात.याशिवाय देवाच्या महाद्बाराच्या शिखराला मानाची काठी टेकवण्यासाठी खांद्यावर काठी घेऊन पायी धामणीला येतात.मानाच्या काठीला चोहोबाजूनी रंगीबेरंगी कापडाची केलेली आकर्षक सजावट व काठीच्या टोकाला लावण्यात आलेले मोरपिसामुळे काठी सुशोभित दिसते.काठीच्या सोहळ्यात सहभागी होणार्या मानकर्यांची व भक्ताची निस्सीम श्रध्दा,परंपरा व देवाच्या नवसपूर्तीची भावना श्रेष्ठ असल्याचे यावेळी दिसून आले.
मानाच्या काठीची मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरुवात होऊन पहिला काठीचा मान अवसरी खुर्द येथील समस्त राजगुरु मंडळीच्या मानाच्या काठीला असतो.त्यांनी वाजतगाजत व पारंपारिक वाद्याच्या गजरात भंडार्याची उधळण करून देवाची मानाची काठी “मल्हार”महाद्बाराच्या वरती असलेल्या देवाच्या अश्वाच्या शिल्पाला टेकवण्यात आल्यानंतर सदानंदाचा येळकोटचा मोठा जयघोष करण्यात आला.

मिरवणूकीत फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.मिरवणूकीत महिला भाविकांचा सहभाग लक्षणीय होता सर्व भाविक पिवळ्याधमक भंडार्याने माखलेले होते.पंचक्रोशीतील भाविकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
पंचरास,घोडे,घोडेकर,कांदळकर,आगरकर,वाळूंज,नरके,आल्हाट या परंपरागत कुळाच्या मानाच्या काठ्या वाजतगाजत येऊन माही पुनवेच्या मानाच्या काठीचा सोहळा शांततेत पार पडला.खंडोबा देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने काठीच्या मानकर्यांचा देवस्थान जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव व देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,शांताराम भगत,पांडुरंग भगत,नामदेव भगत,सिताराम वाघे,ज्ञानेश्वर वाघे,सुरेश पवार यांनी मानाचा फेटा व पानफूल देऊन सत्कार करण्यात आला.






