विशेष लेखमाला-धामणीच्या खंडोबाची यात्रा!!
साभार लेख-श्री पांडुरंग महाराज बाळासाहेब सुक्रे खडकवाडी (ता.आंबेगाव)ख्यातनाम संगीत विशारद
धामणीच्या खंडोबाची यात्रा!!
—————————————
“धामणी गावचा खंडोबा “हे महाराष्ट्रातील एक मोठे जागरूक देवस्थान आहे. राज्यातील सहयाद्री पर्वतरांगांच्या कपारीत वसलेले पौराणिक व धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये पुर्व भागात धामणी या गावी विराजमान आहे. अनेक जिल्ह्यातील भाविकांचे ते प्रामुख्याने कुलदैवत व श्रध्दास्थान आहे.
अलिकडेच या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम खूपच चांगल्या व वैचारिक पद्धतीने झालेले आहे. मंदिराचे संपुर्ण प्रांगण सुध्दा कलात्मक पद्धतीने आखीव- रेखीव बनवले आहे. सुंदर व आकर्षक वेगवेगळ्या मुर्तीच्या स्थानापन्नते मुळे या ठिकाणाचे, नाविन्य पूर्ण चैतन्य बहरून आले आहे. म्हाळसाकांत मल्हारी देवाच्या परिसरात आल्यावर, खूपच छान वाटते व मन प्रसन्न होते आणि वाटते की, मल्हारी देवाच्या द्वारी दर्शनाला , परतून निवांतपणे यायलाच पाहिजे….
धामणी गावालगतच डोंगराच्या पायथ्याला निसर्गाच्या सानिध्यात, दरवर्षी माघी पौर्णिमेला , या ठिकाणी मोठी यात्रा भरते. हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. काही लोकांचे ते कुलदैवत असल्याने भाविक आवर्जून पौर्णिमेला धार्मिक विधी व दर्शनासाठी येतात. या पावन भूमीत खंडोबा देवाची भव्य-दिव्य अशी तेजस्वी मुर्ती ,चटकन आपले लक्ष्य वेधून घेते. आपल्याला एकटक समोर पाहत राहावेसे वाटते. खंडेरायाची ऐवढी मोठी बलाढ्य मुर्ती ,आपल्याला इतरत्र क्वचितच पाहायला मिळते. देवाच्या उजव्या बाजूला म्हाळसा व डाव्या बाजूला बाणू माता बसलेली आहे. मंदिराची रचना व बनावटीचे काम पाहिल्यावर आपल्याला अंदाज बांधता येतो की, हे मंदिर किती पुरातन व कलात्मक आहे. मंदिराच्या चौहू बाजूने भक्कम अशी दगडी बांधकामाची तटबंदी आहे. मंदिराच्या समोर इंग्रज काळामधील मोठी घंटा संगीतमय नाद करत असते.
मंदिराच्या बाहेरील आवारात खोबरे , भंडार ,पेढे व पुजेचे साहित्य घेऊन दुकानदार बसलेले असतात. तेही अगदी नितळ मनाने तळी-भंडार घेऊन जा आणि देवाचे दर्शन करून आल्यावर पैसे द्या !! असा आदरयुक्त विश्वास सर्व भक्ताप्रती ठेऊन, आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करत असतात.
मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर पुजारी, भक्तांनी आणलेल्या तळी-भंडाराने देवाची पुजा करून भक्तांना भंडार लावून आशिर्वाद देतात. देवाचे दर्शन घेऊन भक्त बाहेर आल्यावर , आजुबाजूच्या भक्त मंडळीना बोलवून परत एकदा तळी-भंडार करत… खंडेरायचे चांगभले.., सदानंदाचा येळकोट.. ,येळकोट- येळकोट जय मल्हार नामाचा गजर करत , खोबरे व भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करतात. तेव्हा अनेक भक्त जण धावत जाऊन ते खोबरे गोळा करतात . हा प्रत्यक्ष देवाने दिलेला प्रसाद आहे , अशी एक गोड भावना भाविक भक्तांची असते. म्हणून मोठ्या चपळाईने पळत जाऊन तो उचलून ग्रहण करतात.
मंदिराच्या आतील परिसरात वाघ्या-मूरूळी द्वारे जागरण-गोंधळाचे कार्यक्रम सतत चालू असतात. कमीत कमी पाच नामाचे जागरण तरी देवाच्या द्वारी व्हावे ,अशी भावना बहुतेक भाविकांची असते. मंदिराच्या चहुबाजूने बाहेरील गावच्या आलेल्या माता -भगिनी तीन दगडाची चुल करून नैवेद्य बोन व पुरणपोळीचा स्वयंपाक करताना दिसतात. त्या पुरणाचा वास खूप छानपणे इतरत्रही दरवळत असतो. मंदिराचा संपूर्ण परिसर हा, पूर्णपणे भक्तीमय वातावरणाने फुलून गेलेला असतो.
पौर्णिमेचा दिवस म्हणजे, यात्रेचा पहिला दिवस! या दिवसी सगेसोयरे, पाहुणे मंडळी, मित्र मंडळीं यांना यात्रेसाठी खास आमंत्रीत केलेले असते. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य व पाहुणे मंडळीसाठी विविध गोड पदार्थांचे जेवण असते. पाहुणे मंडळी सुद्धा या यात्रेची जणू आतुरतेने वाटच पाहत असतात.
या दिवशी सकाळी १० वाजता गावातील वेशी मधून , प्रत्येक गाडा-मालक , भाऊबंद, मित्रमंडळी, नातेवाईकांसह जोपासलेल्या व जिवापाड प्रेम केलेल्या, खिल्लारी बैलांची स्वतंत्रपणे एकामागून एक अशी मिरवणूक काढली जाते. त्यासाठी दूर – दूर च्या गावातील वाजंत्री मंडळी आपआपले ताफे आणून यात्रेची शोभा वाढवतात. शेतकरी वर्ग आनंदाने आपल्या बैलगाड्या पुढे नाचत भंडाराची उधळण करत असतात. आपल्या अगदी मुलांप्रमाणे संभाळलेल्या बैलांवरून नोटा ओवाळून ही ओवाळणी म्हणून, वाजंत्री मंडळींच्या प्रमुखाच्या तोंडात त्या नोटा ठेवून खंडेरायाचा गजर करत बेफामपणे नाचत असतात. खरोखरच गावातील वेशी मधील हा संगीत नजराणा काही विलक्षण आसतो की, विचारू नका मंडळी !! या आनंदोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतील नटूनथटून आलेली मुले- मुली, माता-भगिनी मिळेल त्या ठिकाणी बसून, गर्दीतील आपली नाचणारी माणसे व आवडत्या बैलांच्या मिरवणुकीचा हा नेत्रदीपक सोहळा, मोठ्या उत्साहाने पाहत असतात.
दुपारी घाटामध्ये गाड्यांची शर्यत चालू होते. खिलारी दोन बैल गाड्याला जुंपून पुढे चाहूरेकरी शिवळाटीत घालून आणि त्यांच्या पुढे घोडी पळवण्याचा कार्यक्रम चालू झाला की , एकदम शांतता निर्माण होते आणि बैलगाडा घाट चढून वर गेल्यावर संपूर्ण घाट शौर्यरूप धारण करतो. कोणी फेटा उडवून तर कुणी उडया मारून, शिट्या वाजवून तर कोणी जोरात ओरडून, कोणी झाली ..रे…झाली म्हणून आपला आनंद व्यक्त करतात. या महत्त्वाच्या क्षणी घाटात एक प्रकारचे चैतन्य निर्माण झालेले असते. हा रांगडा खेळ प्रेक्षक कुतुहूलपणे पाहत, स्वतः आनंदी होतात. मंडळी एखादा गाडा सुटला! धुरेकऱ्यांनी एकसाथ उडया मारल्या आणि चार ही बैल एका जिवाने सरळ रेषेत जोरदार पळाले तर, समजदार प्रेक्षक वर्ग उभे राहून टाळयांचा खडखडाट करतात. ही एक प्रकारे त्यांना दाद असते. येथेही चोखंदळ जातीचे प्रेक्षक घाटात शेवट पर्यंत बसून असतात. या ठिकाणी काही नवसाचे गाडे पळविले जातात. विशेष सांगायचे म्हणजे! या यात्रेचे वैशिष्ट्य असे आहे की, या यात्रेच्या घाटात कुठल्याही प्रकारचा इनाम दिला जात नाही. गाड्यावाले उत्सुपुर्वपणे येथे गाडे आणून पळवतात. या यात्रेत अधून – मधून बगाडेही पळवली जातात. त्यामुळे, या यात्रेला काही जण बगाडांची यात्रा म्हणूनही संबोधतात. या यात्रेच्या फडात पाहुणे मंडळी तसेच परिसरातील नामांकित गाडयावले देखिल देवाची यात्रा म्हणून, या घाटात आपले गाडे पळवतात. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी बैल- गाडे पळविणे थांबते.
रात्री देवाची पालखी गावातून मंदिराकडे निघते. गावातील सर्व समुदायाचे भाविक देवाच्या पालखी सोहळ्याला हजेरी लावतात. हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने वाजत -गाजत मोठ्या बंधू प्रेम भावाने पार पडतो.
यात्रेचा मुख्य आकर्षणाचा भाग असतो! आणि तो म्हणजे, तमाशा !! गावातील सर्वांचे व यात्रेला आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन आणि यात्रेकरूंचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून खेडेगावात आजही करमणुकीचे साधन म्हणून ‘लोकनाट्य तमाशा कडे पाहीले जाते. गावातील तरुण व शौकिन मंडळींची ही आवडती मागणी असते. त्यांच्या प्रेमळ मागणीला कोण नाही म्हणणार ? सभोवतालच्या गावातील लोक वाहणे करून या करमणुकीसाठी टोळक्याने हजेरी लावतात. संगीतबारीतल्या मन मोहक नाच-गाण्यातील श्रृंगार रसाचा आनंद घेण्यासाठी, प्रंचड संख्येने प्रेक्षक मंडळी, या ठिकाणी गर्दी करतात. पहिल्या दिवशीचा हा कार्यक्रम, मंदिराच्या शेजारील परिसरात पार पडतो.
गावातील सावतामाळी मंदिरात भक्तीरसाचा आनंद घेण्यासाठी, संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. त्याकरिता शेजारील गावातील गायक- वादक मंडळी आवर्जून हजेरी लावतात. आलेल्या गुणीजनांचा यथोचित सन्मान यात्रा कमेटी सदस्य व संबंधित व्यक्ती अगदी आदराने प्रेमपूर्वक करतात. अशा प्रकारे विविध कार्यक्रमांनी पहिल्या दिवसाची सांगता होते.
पहिल्या दिवशीची झालेली धावपळ आणि पाहुण्या सोबत झालेल्या गप्पा – गोष्टी व करमणुकीच्या साधनांमुळे यात्रेचा दुसरा दिवस थोडा निवांतपणे चालू होतो . सकाळी मंदिराच्या दर्शनी बाजूला, विविध गावातील कलाकार मंडळी आपली पारंपरिक वाद्ये आणून आपली पिढीजात कला सादर करण्यासाठी येथे आवर्जून येतात. सनईच्या मंजुळ स्वरांच्या कारंजांनी व ढोलकी च्या नादाने व कमावलेल्या कलाकृतीच्या अविष्काराने जणू काही ते खंडेरायाचे पूजनच करतात. ऐवढे ते आपल्या वादनात तल्लीन होऊन जातात. आलेले हजारो रसिक भक्त या कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेतात आणि त्यांच्या कलेला प्रांजळपणे दाद देऊन , कौतुक करत आपल्या परीने बक्षीसही देऊन जातात. म्हणतात ना! देवाच्या दारी रिकाम्या पोटी आणि रिकाम्या हाताने कोणी जात नाही.
पौर्णिमेच्या दिवशी गावातील व पंचक्रोशीत लोकांना विशेष: स्त्री वर्गाला बैलगाड्या मुळे व घरी जेवायला आलेल्या पाहुण्यांमुळे देवाचे दर्शन घेणे शक्य नसते. त्यामुळे कुंटुबातील सर्वजण येऊन देवाचे दर्शन घेतात. माता भगिनी, मुले हे नंतर भर यात्रेत सहभागी होतात. येथे सर्व प्रकारच्या वस्तू अवतरलेल्या असतात. विविध खेळणी, पाळणे, लहान मुलांची गाडया ,घरगुती उपकरणे, शेतीसाठी लागणारी अवजारे, कपडे, फळांची दुकाने, मोठमोठी हाॅटेल, , छोटे – छोटे स्टाॅल, ऊसाचा रसाची दुकाने , कुल्फी अशा प्रकारे यात्रा अगदी भरगच्च भरलेली असते, म्हणून दुसऱ्या दिवशीचा यात्रेला ‘भरयात्रा ‘ही संबोधले जाते.
बहुतेक जणांचा कल हा जिलेबी व भजी खाण्याकडे असतो. कोणी जवळचा मित्र, पाहुणे भेटले की लगेच, आॅफर असते… चला जिलेबी खायला! त्या मागोमाग ऊसाचा रस!
खरोखरच मंडळी…!
“खंडोबा च्या यात्रेची,
मजाच…काय और असते” ना !!
दुपारी ३वाजण्याच्या सुमारास गावातून डफडी वाजवत, आखाडा नेहमी च्या ठिकाणी येतो . मंदिराच्या अगदी जवळच कुस्त्यांचा जंगी आखाडा भरतो. या फडामध्ये अनेक नामांकित पहिलवान दूर -दूरून कुस्ती करण्यासाठी आलेले असतात. आखाडा पाहण्यासाठी आलेल्या सर्वांना वर्तुळाकार बसवले जाते. कुस्त्यांच्या खेळासाठी शौकीनांची मोठी गर्दी झालेली असते. प्रथम आखाड्याचे पूजन होते. त्यानंतर लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्या छोट्या पहिलवानांना पारंपरिक पद्धतीने ‘रेवडी ‘या गोड पदार्थाचे बक्षीस म्हणून वाटप केले जाते. त्यानंतर पंच मंडळी आखाड्याचा ताबा घेऊन, क्रमाक्रमाने वयानुसार तब्बेत पाहून कुस्ती जोडतात आणि त्यांचा खेळ पाहून आखाड्याचा कल पाहून ती सोडतात. ते कोठून आले आहेत!कुस्ती कशा प्रकारे केली . योग्य प्रकारे न्याय देत, पैलवान मुलांना इनाम दिला जातो. शेवटच्या कुस्त्या हया नामांकित मल्लांच्या होतात. परत एकदा डफडयांचा आवाज कानावर पडतो, सर्वजण खंडोबा रायाचा जयजयकार करून, आखाड्याला पूर्ण विराम मिळतो.
दुसऱ्या रात्रीचा नामांकित तमाशा हा विद्यालयाच्या मैदानावर असतो. हा यात्रेचा शेवटचा भाग असतो. दोन दिवस तमाशा पाहण्यासाठी धामणीच्या खंडोबा देवाची यात्रा ही, तमाशा शौकीनांसाठी एक श्रृंगारीक पर्वणीच असते. असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. यात्रा कमेटी तर्फे तमाशा कलावंतांचा सत्कार होतो. अशा प्रकारे यात्रेची सांगता होते. पुढे आठ दिवस यात्रा गावात येते , तीला शिळी यात्रा म्हणतात.
सदानंदाचा…. येळकोट
येळकोट -येळकोट!जय मल्हार !!
चला आता! यात्रेत भेटूया !
धन्यवाद !!
पी. बी. सुक्रे
———————