जीवन प्रवास ताशा सम्राटाचा- ताशा सम्राट बशीर भाई बाबू बेपारी

जीवन प्रवास ताशा सम्राटाचा!!
बहुगुणी, बहुज्ञानी, रत्नपारखी मायबाप रसिकांनो.
” नाते कलेचे त्या रक्ताशी” या लेखमालेतून कैलासवासी( ताशा सम्राट) बशीर भाई बाबू बेपारी मुक्काम पोस्ट बेल्हे, तालुका जुन्नर जिल्हा पुणे .
यांचा जीवन प्रवास आपण वाचणार आहात. त्यांच्या आईचे नाव फातिमाबी असून त्यांना दोन मुलं व चार मुली आहेत. बशीर भाई हे आठ वर्षाचे असतानाच त्यांच्या अंगात कला संचार करू लागली. लहानपणातच ताशा, ढोल आणि हलकी यांच्यावर आपल्या हाताने ठेका धरून वाजवण्याची गोडी वाढतच राहिली. वाद्यांच्या थापावर बालपणातच रसिकांची शाबासकी मिळू लागली. देवाची करणी नारळात पाणी, या म्हणी प्रमाणे त्यांच्या घराण्यातच चुलत्यांचाही तमाशा होता. अहमद साहेब बेल्हेकर सह विष्णू बांगर बेल्हेकर या नावाचा त्यांचाही सहवास लागून ,वाद्याची गोडी व आवड बशीर भाईंना वाढतच गेली काही काळाने बशीर भाईंनी स्वतःचा सनई ताफा काढून संपूर्ण महाराष्ट्रात ताशा वाजून नावच कमावले. आता संपूर्ण महाराष्ट्रात ताशा सम्राट बशीर भाई म्हणून बेल्हे गावाचे नाव झळकू लागले जणू बेल्हेनगरी तमाशा कलेची पंढरीच ठरली. शिवाय बेल्हे या नगरीत काही अनमोल किमतीचे रत्नजडित हिरे होऊन गेले. त्यापैकी अहमद साहब बेल्हेकर माशूम भाई बेलेकर, हमीद भाई बेल्हेकर ,कादरभाई बेल्हेकर ,आणि बशीर भाई बेल्हेकर हे होत शिवाय सध्या इस्माईल भाई हे ताशा वाजवण्यात खूप तरबेज आहेत.आज रोजी बुढ्ढण भाई बेपारी हे वगनाट्यातील खलनायक, अभिनय सम्राट म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात.शिवाय महाराष्ट्रातील संपूर्ण लहान-मोठे तमाशा फड मालक, आणि कलावंत स्री ,पुरुष कैलासवासी बशीर भाई यांना ओळखतच होते ,यात तिळमात्र शंकाच नाही .सर्व फड मालकावर व कलावंतावर प्रेम करणारे सुखदुःखात सहभागी राहणारे ,गोड मधुर वाणी ,लहान मोठ्यांना प्रेमाची वागणूक, इत्यादी गुण त्यांच्या अंगी होते. शिवाय त्यांनी अनेक कलावंत घडविले, तमाशा फड मालकांना सुद्धा कलावंत दिले होते. बशीर भाईंनी काही काळ तमाशा फायन्सर म्हणून काम केले. तमाशाच्या अडीअडचणी दूर करण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. भिका भीमा सांगवीकर, अंजली राजे नाशिककर ,संगीता महाडिक पुणेकर ,लोकशाहीर विलास अटक. यांनाही खूप मोलाचे सहकार्य केले आणि महाराष्ट्रात नाव गाजविले .बशीर भाई यांची राहणी एकदम साधी होती. प्रेमळ स्वभाव हसूनच बोलणे, खरं बोलणे, हे गुण त्यांच्या अंगी होते. ताशा वाजवताना त्यांचे हावभाव, अभिनय आणि ठेका ,हे माणसाला आकर्षण करणारे होते. ताशा वाजवण्याची त्यांची हातोटी काही वेगळीच होती .चाकण जिल्हा पुणे येथे सनई ताफा स्पर्धेत प्रथम, क्रमांकाचे ताशा वादक म्हणून, आर आर पाटील यांच्या हस्ते बशीर भाई, यांनी पुरस्कार ही पटकावला होता. खरं तर माशुम भाई बेल्हेकर यांच्या ढोलकीच्या तोड्यातूनच खरी कला बशीर भाईंना अवगत झाली होती. फकीर भाई बेल्हेकर हे बशीर भाईंचे सर्वात श्रेष्ठ गुरु होते. शिवाय चिरंजीव इस्माईल भाई व बशीर भाई, यांनी जवळपास 50 वर्ष ताफा, चालविला आहे .एक आठवण म्हणून सांगतो दरोडी तालुका पारनेर, येथील शेख बाहाउद्दिन बाबांचा संदल आणि उरूस यांचे खास आकर्षण म्हणजे, साठ वर्ष बशीर भाईंनी केलेली ताशा वाद्याची सेवा होय. बशीर भाईंनी वाद्याच्या सेवेतून रसिकांची साठ वर्षे सेवा केली. आणि शेवटी वयाच्या 70 व्या वर्षी हा जगाचा मायारूपी पिंजरा सोडून परलोकी निघून गेले. पुन्हा असा ताशा सम्राट होणे नाही. खरंच त्यांचे नाव चंद्र सूर्य असेपर्यंत राहणारच ,यात शंकाच नाही.अशा महान कलावंतांची आठवण झाली म्हणजे दाटूनी कंठ येतो त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना.
लेखक – शाहीर खंदारे
ता.नेवासा जि.अहमदनगर
मो.8605558432