वनविभागाने जपलेली वनसंपदा क्षणार्धात जळून खाक !!

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील सागदरा परिसरात भीषण वणवा,हजारो सागाची झाडे आणि इतर वनसंपदेची राखरांगोळी

वनविभागाने जपलेली वनसंपदा क्षणार्धात जळून खाक !!
लोणी (धामणी) प्रतिनिधी -गेली तीन वर्षे वनविभागाने अथक परिश्रमाने जपलेली शिरदाळे येथील सागदरा खंडोबा देवस्थान परिसरातील वनसंपदा काल सायंकाळी लागलेल्या वणव्यात जळून खाक झाली आहे.चोवीस तासाहून अधिक काळ जळत असलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर परिसर जळाला आहे.यामध्ये वनविभागाने शिरदाळे येथील सागदरा परिसरात लावलेली तब्बल अठराशे झाडे व त्यासाठी करण्यात आलेली पाईपलाईन जाळून खाक झाली आहे.वनविभागाला याची माहिती कळताच वनविभागाचे शिपाई श्री.दिलीप वाघ,कल्पेश बढेकर आणि स्थानिक ग्रामस्थ श्री.संदीप मिंडे,श्रीकांत मिंडे,तात्याभाऊ चौधरी,संजय तांबे,विक्रम तांबे,सुरेश तांबे,सिद्धार्थ तांबे,ज्ञानेश्वर तांबे यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा डोंब एवढा भयानक होता की आगीच्या जवळ जाणे देखील अवघड होते.त्यामुळे या आगीत खूप मोठी वनसंपदा जळून खाक झाली असून मोठी नैसर्गिक संपत्ती नष्ट झाली आहे.
शिरदाळे परिसरात वनविभागाच्या वतीने तीन वर्षांपूर्वी सागदरा परिसरात वनराई उभी केली होती.त्यासाठी वनपाल सौ.सोनाली भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्षे याची निगा राखली जात होती.त्या झाडांना पाणी देण्याचे काम देखील केले जात होते.परंतु आज अचानक लागलेल्या आगीत ही तब्बल अठराशे झाडांची वनराई तर नष्ट झालीच शिवाय शेकडो हेक्टर परिसर यात बाधित झाला आहे.मग त्यात अनेक वन्यजीव होरपळून मृत पावले आहेत.अनेक छोटे मोठे पशु पक्षी यात अक्षरशः नष्ट झाले आहेत.हा वणवा देखील शेतीच्या बांध पेटवण्याच्या नादात लागला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.वनविभाग दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर पट्टे पाडून ठेवतात यंदा देखील त्यांनी पट्टे पडून ठेवले होते परंतु आग एवढी भयानक होती की हवेच्या दाबाने ती सहज पट्टा पार करत होती.त्यात गेली तीन वर्षे वनराई अजून जोमात होती परंतु यावर्षी लागलेल्या आगीमुळे तीन वर्षांच्या कष्टावर पाणी गेल्याची भावना वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्या चेहऱ्यावर होती.
उन्हाळा संपत आलेला आहे.बरेच क्षेत्र आधीच जळून खाक झाले आहे.हाच परिसर बाकी होता,त्यात जनावरे देखील चरण्यासाठी जात होती.परंतु आज संपूर्ण परिसर जळून खाक झाला आहे.यात अनेक वन्यजीव,प्राणी यांचा अंत झाला आहे.शिवाय वनविभागाने केलेली वनराई देखील यात नष्ट झाली आहे.तब्बल अठराशे झाडे यात जळाली आहेत.वणवे लावताना मानवाने जरा तरी विचार करायला हवा.हे अघुरे कृत्य करताना त्यांनी सारासार विचार करणे गरजेचे आहे.असल्या विकृती जर आपल्याला पाहायला मिळाल्या तर त्यांच्यावर सरळ कायदेशीर कारवाई करायला हवी.भविष्यात तरी असे वणवे कोणी लावू नका आणि कुठं वणवा लागलेला दिसला तर तो विझवण्याचा प्रयत्न नक्की करा आणि वनविभागाला सहकार्य करा.
श्री.मयुर संभाजी सरडे
(मा.उपसरपंच शिरदाळे)





