ताज्या घडामोडीसामाजिक

धामणी(ता.आंबेगाव) येथे खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीला दर्शनासाठी व पाच नामाच्या जागरणासाठी भाविकांची अलोट गर्दी !!

धामणी(ता.आंबेगाव) येथे खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीला दर्शनासाठी व पाच नामाच्या जागरणासाठी भाविकांची अलोट गर्दी !!

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरीसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी…चंपाषष्ठीचा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण देवधर्म!!!

चंपाषष्ठी श्री.म्हाळसाकांत खंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव!!श्रीमल्हारी मार्तंडाचे षड:रात्रोत्सावाचा सांगता दिवस… या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासूर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ट टाळले.विजयोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंडभैरवावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशिर्ष शुध्द षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.

पुणे व नगर जिल्हयातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी (ता.आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदीरात सोमवारी पहाटे(१८ डिंसेबर ) चंपाषष्ठीच्या मूहर्तावर देवाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती झाल्यानंतर खंडोबाचे दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केलेली होती.

भाविकांच्या गर्दीने मंदीर परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.दर्शनासाठी महिला भाविकांची लक्षणीय गर्दी होती. लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या धामणी (ता.आंबेगांव)येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाचे मंदिरात दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे चंपाषष्ठीला सोमवारी भल्या पहाटे चार वाजता श्री कुलस्वामी खंडोबाच्या मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक चंपाषष्ठी उत्सव मंडळाचे मच्छिद्र वाघ आणि देवाचे परंपरागत मानकरी व सेवेकरी तांबे,भगत,वाघे मंडळी यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर सप्तलिंगावर साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाच्या पंचधातूच्या आकर्षक मुखवट्याची प्रतिष्ठापना तांबे,भगत या सेवेकरी मंडळीनी केली. त्यानंतर या पंचधातूच्या मुखवट्याला व देवाच्या पूर्वमुखी श्री म्हाळसाकांत खंडोबा,म्हाळसाई,बाणाई व उत्तरमुखी खंडोबाची मानलेली बहीण जोगेश्वरी यांच्या विलोभनीय भव्य मूर्तीना वस्रालंकार चढविण्यात आले.पहाटे पाचच्या सुमारास सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,धोंडीबा भगत,प्रभाकर भगत,शांताराम भगत ,राजेश भगत,राहूल भगत,दिनेश जाधव,ज्ञानेश्वर जाधव,सिताराम जाधव,देवानंद जाधव,नामदेव वीर,सुरेश वीर या सेवेकरी भगत वाघे व वीर मंडळीच्या उपस्थितीत विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली.

त्यानंतर देवाचे पूजारी भगत व वाघे मंडळीनी गाभार्‍यात सप्तशिवलिंगावर सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा उधळला.भगत मंडळीनी पुरणपोळी,साजुक तूप,दूध खसखसीची गोड खिर, सारभात,कुरडई पापडी,असा पंचपक्वानांचा आणि वांग्याचे भरित रोडग्याचा नैवेद्य देवाला अर्पण केला.

त्यानंतर दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले यावेळी धामणी,लोणी,खडकवाडी,गावडेवाडी,
महाळूंगे पडवळ,तळेगांव ढमढेरे,अवसरी खुर्द,संविदणे येथील मानकरी,वाघे व वीर मंडळी, व सेवेकरी,ग्रामस्थ,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवाचे दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या.मंदीरात सकाळी नऊ वाजता ह.भ. प.नामदेव महाराज माशेरे आमदाबादकर (शिरूर) यांचे काल्याचे किर्तन झाले.या किर्तन सोहळ्याला लोणी,पहाडदरा,आळंदी,जारकरवाडी,खडकवाडी येथीलभजनी मंडळीनी पखवाज वीणा व टाळमृदुंगाची साथ दिली.किर्तनाची व्यवस्था सुभाष तांबे,अविनाश बढेकर व सेवेकरी मंडळीनी केली.

चंपाषष्ठीला देवकार्याची पाच नामाची जागरणे करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केलेली होती,वाघे व वीर मंडळीची प्रत्येक घटासमोर पाच नामाचा येळकोट करण्यासाठी धावपळ होत असताना दिसत होती. मंदिरात पांचनामाची जागरणे सुरु असताना खंजिरी तुणतुणे व टाळाचा तसेच कासवाजवळील इतिहासकालीन घंटेचा सुमधूर आवाज मंदिराच्या आवारात घुमत होता.दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठी भंडारा उत्सव समितीच्या वतीने कवड्या गव्हाच्या भरड्याचा व सेद्रीय गुळाचा गावठी तूपाचा वापर करून तयार केलेल्या लापशी व वांग्याची भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केलेले होते. दुपारी एक वाजेपर्यत चार हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.भाविकांच्या जेवणाची व्यवस्था कुलस्वामी हाँल व मंदिरासमोरील फरशीच्या ओट्यावर करण्यात आलेली होती महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था मच्छिद्रनाथ वाघ,किसनराव रोडे,आण्णा पाटील जाधव,डाँ पाटीलबुवा जाधव,नामदेवराव जाधव,सुभाषराव काचोळे,सुभाष सोनवणे,प्रकाशनाना विष्णू जाधव,प्रकाशराव वरे,पंढरीनाथ खुडे यांनी आणि ग्रामस्थांनी पाहीली.

मंदिराच्या बाहेर तळी भंडाराचे फुले व हाराचे व पेढ्याचे विक्रेते बसलेले दिसत होते. खाद्यपदार्थाच्या व कटलरी विक्रेत्याच्या हातगाड्या दिसत होत्या. चारचाकी व दुचाकी वाहनाने भाविक मोठ्या प्रमाणावर येताना दिसत होते. चंपाषष्ठीला देवकार्याची पांचनामाची जागरणे झाल्यानंतर महीला भाविकांनी आनंद व्यक्त केला.
॥ असे निर्मळ श्रध्दा ज्याचे उरी॥ ॥त्यासी दिसे हा म्हाळसाकांत मल्हारी ..

सप्तशिवलिंगे म्हणजेच खंडोबाचा परिवार समजला जातो. या परिवारात सप्तंलिंगे म्हणजेच म्हाळसाई,बाणाई,हेगडे प्रधान, जोगेश्वरी,काळभैरवनाथ,घोडा व कुत्रा असे मानले जाते.खंडोबाच्या कुलधर्माच्यावेळी घरातील देवघरात बसविलेल्या घटाला पुरणपोळीचा नैवेद्याबरोबर ठोंबरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालून करण्यात येतो) कणकेचा रोडगा,वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसून यांचाही नैवेद्य खंडोबाला अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो त्याला तळीभंडार असेही म्हणतात. एका ताम्हणात विड्यांची पांच पाने,त्यावर पांच नाणी व पाच सुपार्‍या ठेवतात त्याचप्रमाणे खोबर्‍याच्या वाट्या व भंडार ठेवतात मग घरातील पाच,सात, किंवा अकरा अशा संख्येमध्ये घरातील मंडळी ताम्हण वर उचलून “सदानंदाचा येळकोट.भैरवनाथाचे चांगभलं व अंबाबाईचा उदे उदे असा पुकारा करीत ते ताम्हण तीनवेळा मग ताम्हण खाली ठेवून घरातील सर्वाना भंडार लावतात व तो देवाचा भंडार जयघोष करुन घरात व घराच्या परिसरात श्रध्देने उधळण्यात येतो.सर्वाना पानसुपारी खोबरे दक्षिणा देऊन त्यानंतर दिवटी बुधली घेऊन खंडोबाची आरती करतात यालाच “तळी भरणे” असे म्हणतात असे यावेळी भगत वाघे मंडळीनी सांगितले.

देवाच्या कुत्र्याची आख्यायिका
भगवान श्रीकृष्ण गोकुळात नंदाच्या घरी असताना त्यांच्या घरी चंपाषष्ठीचे नवरात्र सुरु होते खंडोबाला रोडग्याचा व वांग्याच्या भरीताचा नैवेद्य दाखवायचा होता.परंतु कान्हा कृष्णाने खंडोबा देवाची थट्टा करण्यासाठी घरातील लोकांचा डोळा चुकवून तो नैवेद्य खाऊन टाकला. त्यामुळे रागावलेल्या खंडोबाने श्रीकृष्णाला कुत्रे बनविले त्यानंतर नंदराजा यशोदामाई व सगळे देवघरात जमले. श्रीकृष्ण कुठेच दिसत नव्हता त्यावेळी ते कुत्रे तिथेच घुटमळत होते सर्वजण चिंतेत पडल्यावर त्या ठिकाणी येऊन नारदमुनींनी येऊन खरा प्रकार सांगितल्यानंतर मग नंदराजा त्या कुत्र्याला घेऊन जेजूरीला आले. त्यांनी खंडोबाचे दर्शन घेतले त्यामुळे प्रसन्न झालेल्या खंडोबाने प्रत्यक्ष दर्शन देऊन त्या “कुत्र्यांचा ” पुन्हा श्रीकृष्ण केला त्यावेळी श्रीकृष्णाने खंडोबाला प्रार्थना केली ज्याप्रमाणे तू मला कुत्रा बनवून तुझ्या सामर्थ्याची आठवण करुन दिलीस त्याप्रमाणे तुमच्या इतर भक्तांना जागृत करण्याचे काम माझ्याकडून व्हावे त्यावर खंडोबा तथास्तू म्हणाले. श्रीकृष्णाने खंडेरायाचे गुणगान करीत पहिले पाचनामाचे जागरण घातले.

त्याचप्रमाणे आदिमा या म्हाळसाईसाठी गोंधळही घातला. आजही खंडोबाचे भाविक वाघे गोंधळी व कुंभार मंडळीना बोलावून जागरण गोंधळ घालतात घरात लग्न व धार्मिक शुभकार्ये झाल्यानंतर परंपरेनुसार आपल्या घरी अथवा खंडोबाचे मंदिरात जागरण गोंधळ घालतात. त्यामुळे तेव्हापासूनच चंपाषष्ठीला पांच नामाची जागरणे घालण्याची परंपरा असल्याचे वाघे व भगत तांबे मंडळीनी यावेळी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.