आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथील चौधरी परिवाराकडून राजा बैलाची दशक्रिया संपन्न!!

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथील चौधरी परिवाराकडून राजा बैलाची दशक्रिया संपन्न!!

भूतदया गाईपशूंचे पालन।
तान्हेल्या जीवन वनामाजी।।

आंबेगाव तालुक्यातील शेवटचे टोक आणि कोरडवाहू गाव म्हणून आमच्या गावची ओळख. परंतु या कोरडवाहू शेतीमध्ये जर नियोजनबद्ध शेती केली तर चांगलं उत्पन्न मिळू शकते हे दाखवून देणारी काही मोजकी कुटुंब आहेत त्यातील एक सर्वगुणसंपन्न कुटुंब म्हणजे हे चौधरी कुटुंब. आजही हे कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीने एकत्र आणि गुण्यागोविंदाने नांदत आहे.विशेष म्हणजे या कुटुंबातील दोन महिलांना गावचे सरपंच म्हणून नेतृत्व करण्याची संधी देखील गावाने दिली आहे. सौ.विजया बाबाजी चौधरी,सौ.सुनीता राजेंद्र चौधरी यांनी गावचे सरपंच म्हणून उत्तम काम केले आहे.

याच कुटुंबात दहा दिवसांपूर्वी एक दुःखात घटना घडली आणि ती म्हणजे या कुटुंबाची तब्बल अठरा वर्ष सेवा केलेल्या “राजा” बैलाचे निधन दि.२७/०४/२०२४ रोजी झाले. तसं एखाद्या पशुचा मृत्यू म्हणजे जास्त काही विशेष गोष्ट नसते परंतु ज्या बैलाने आपली अठरा वर्ष सेवा केली त्याच्या प्रति काहीतरी स्मृती जपायच्या म्हणून चौधरी कुटुंबाने या बैलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.०६/०५/२०२४ रोजी केले होते. सकाळी ह.भ.प.किसन महाराज तांबे व ह.भ.प.तान्हाजी महाराज तांबे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तर त्यानंतर हनुमान भजनी मंडळ शिरदाळे यांचे सुश्राव्य असे भजन संपन्न झाले.यावेळी मा.उपसरपंच मयुर सरडे, ह.भ.प.तान्हाजी महाराज तांबे यांनी शब्दरूपी श्रद्धांजली या राजा बैलाला वाहिली. तर या कुटुंबाचे घटक या नात्याने राजू चौधरी यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले.यावेळी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी याच परिवारातील श्री.शांताराम चौधरी,बाबाजी चौधरी,राजू चौधरी,शंकर चौधरी त्यांचे सर्व नातेवाईक आणि घरातील इतर सदस्य उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.