ताज्या घडामोडीसामाजिक

पंचनामा स्पेशल रिपोर्ट – ज्येष्ठ तमाशा कलावंत कमळाबाई चव्हाण सविंदणेकर

साभार लेख - श्री. बाबाजी कोरडे लोककलावंत व तमाशा अभ्यासक) मा.सदस्य, राज्य सांस्कृतिक धोरण समिती (लोककला उपसमिति) महाराष्ट्र शासन

कमळाबाई चव्हाण सविंदनेकर
————————–
✍🏻 बाबाजी कोरडे
9730730146
—————————-
स्वातंत्र्य मिळून काही काळ लोटला होता. जिनांच्या मुस्लिम लीगच्या अडेलतट्टूपणातून द्विराष्ट्रवादाची मांडणी करीत स्वतंत्र भारताची फाळणी होऊन पाकिस्तान ची निर्मिती झाली, आणि तिन तुकड्यांमध्ये भारताची विभागणी झाली.
त्यापैकी एक पुर्व पाकिस्तान (सध्याचा बांग्लादेश), दुसरा पश्चिम पाकिस्तान, आणि तिसरा आपला सध्याचा भारत…
परंतू फाळणी झाली तरी पाकिस्तान हा काश्मीरचे विकृत स्वप्न पहातच होता आणि आजही आहे.त्याच असुरी खुमखुमीतुन पाकिस्तानने आपल्यावर युद्ध लादलेले होते.

सन 1965 सालचे भारत पाकिस्तान युद्ध चालू होते.भारतीय जवान पराक्रमाची शर्थ करत होते.
अनेक जण राष्ट्रासाठी आपले रक्तही सांडत होते.
भारताने पाकिस्तानबरोबरचे युद्ध जिंकले, पण अनेक स्त्रियांच्या कपाळावरील कुंकवाची त्यासाठी आहुती द्यावी लागली ही गोष्टही तितकीच सुर्यप्रकाशाएवढीच सत्य आहे….

याच युद्धात पुणे जिल्ह्यातील जेजूरीजवळच्या एका खेड्यातील जवानाने आपल्या प्राणाची आहुती दिली !
आणि घरी जेव्हा ही घणाघाती बातमी समजली तेव्हा त्याक्षणी त्या सैनिक पत्नीला धक्का सहन न होऊन तिनेही आपला प्राण सोडला…!
….आणि मागे राहीली दोन कोवळ्या वयाची अनाथ दोन बालके !

त्यापैकीच एक म्हणजे जेष्ठ तमाशा कलावंतीन कमळाबाई चव्हाण सविंदनेकर या होत…

कमळाबाईंचे त्यावेळी वय केवळ आठ-न‌ऊ वर्षांचे,तर त्यांचा भाऊ दहा-आकरा वर्षांचा…
घरी उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, कोणीही जवळचे नातेवाईक नाहीत.अशा अवस्थेत या दोन्ही भावंडांनी गावातच अक्षरशः भिक्षा मागुन कसेबसे काही दिवस काढले.
आणि दुरच्या एका नातलगांकडे पोटापाण्यासाठी मुंबई गाठली…
परंतू थोड्याच दिवसात तेथे पारतंत्र्याची जाणिव झाली,त्यामुळे आपल्या काहीशा अल्लड पण बंडखोर स्वभावामुळे कमळाबाईंनी वर्षभरातच तेथून पळ काढला.त्यावेळी त्यांचे वय केवळ आकरा वर्षे होते.
फिरत फिरत त्या बोरीबंदर रेल्वे स्टेशनला आल्या.
जवळ एक पैसा नाही. तो नसणारच… पोटात भुकेने व्याकूळ झालेल्या अवस्थेत त्या एका रेल्वेत चढल्या.
गाडी सुटली,ती कुठे घेऊन जाणार माहीत नाही. पुढे काय करायचं या गोष्टीची उमज नाही.
थोडक्यात स्वतःच्या जीवनाचा तीर अंधारात मारून तो कुठं जाईल याचा थांगपत्ताच नाही !

अशा अवस्थेत गाडी पुण्यात येऊन थांबली.तहानभुक लागली म्हणून कमळाबाई खाली उतरली.तिथंच नळ शोधत व त्यावर ढसाढसा पाणी पिऊन होईपर्यंत गाडीपण निघून गेली…
…आता पुढे काय ?

अंगावर फाटके व तितकेच मळलेले पोलके-परकर घातलेली केवळ आकरा वर्षांच्या ह्या बालिकेकडे पाहून तिकीट तपासणीसाने तिकीट ही मागितले नाही…
असेल एखादी भिक्षूक बिचारी !

पुणे रेल्वे स्टेशन वर अक्षरशः दोन दिवस उपाशी पोटी काढल्यानंतर कमळाबाई स्टेशनच्या बाहेर आली. दिशाहीन अवस्थेत भटकत असताना ती स्टेशनपासून एक दिड किलोमिटर परीसरात गणेश पेठेत पोहोचली.
तिथेच ‘आर्यभुषन थिएटर’ आहे. तिथे बाहेरच दोन-तिन खटारगाड्या दिसल्या. तिथेच काही स्त्रिया तिन दगडांच्या चुलीवर भाकरी थापत होत्या.
कमळाबाईच्या पोटात भुकेने आग लागली होती. तीनचार दिवस पोटात अन्नाचा तुकडाही गेला नव्हता.
फाटके व तितकेच मळलेले पोलके-परकर आणि तशाच अवस्थेतील चेहऱ्यावर पसरलेले दैन्य पाहून तेथील स्त्रियांना ह्या मुलीची किव आली. त्यांनी तिला जेवायला घातले.आणि स्वतःजवळच ठेऊन घेतले.

त्या तमाशातीलच कलावंतीणी होत्या !

आईवडिलांविना पोरकेपण वाट्याला आलेल्या, पोटात भुक घेऊन दिशाहिन भटकणाऱ्या,कोणताही निवारा नसलेल्या,अंगावर निट कपडे नसलेल्या एका मानवी जीवाला इथंच स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला नसेल तर नवलच !!

आर्यभुषनला त्यावेळी अनेक तमाशा पार्ट्या येत असत. त्यापैकीच एक निवृत्ती पिरंगूटकर यांचा छोटासा तमाशा फड होता.कमळाबाई यांच्यासोबतच राहू लागली.
त्या फडात पवळाबाई (पठ्ठे बापुरावांची नव्हे)नावाची एक कलावंतीण होती.त्यांनी कमळाबाईला नृत्य व गायण शिकवले.

परंपरेप्रमाणे दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने निवृत्तीबुवांचा तमाशा खटारगाडीतून आळंदीला आला.त्यामध्ये कमळाबाईपण आली.
आळंदीत अनेक मोठमोठे तमाशा फड आपल्या राहूट्या व कनाती लावून तिकीटावर कार्यक्रम सादर करत असतात.
तिथेच वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा पाहायला सर्व मंडळींबरोबर कमळाबाईपण गेली.पवळाबाईंना सर्व ओळखत होते. त्यांनी कमळाबाई यांना पुढे करून गवळण म्हणायला लावली…

सप्तसुरांच्या मुरलीतून तुझा नाद घुमला,”
श्रीहरी काही सुचेना मला…”

हि गौळण ऐकून स्वतः महाडिक साहेबांनी कमळाबाईंच्या पाठीवर थाप मारून शाबासकी दिली व स्वतःच्या फडात ठेवून घेतले.तिथे उषा कोल्हापूरकर,कौसल्या पुणेकर यांच्यासारख्या जेष्ठ व दिग्गज मंडळींच्या सान्निध्यात राहून कमळाबाई तमाशा कलेत पारंगत झाल्या.ढवळपुरीकर-महाडीक यांच्या तमाशा फडात त्यांचे गुरू गणपतराव सविंदनेकर यांचे धाकटे बंधू दत्तोबा चव्हाण सविंदनेकर हे काम करत असत.

दत्तोबा चव्हाण यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला. त्यांना नंदा नावाची मुलगी झाली.तब्बल आठ वर्षे या फडात गणगवळण तसेच वगनाट्यांमध्ये कमळाबाईंनी काम केले.त्यानंतर त्यांनी काही काळ दादू इंदूरीकर यांच्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यात प्रभा शिवनेकर,सुलोचना नलावडे धोलवडकर यांच्याबरोबर काम केले.शेवटी त्या रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर या तमाशा फडात स्थिरावल्या.कांताबाई यांनी त्यांना आपल्या धाकट्या बहिणीप्रमाने वागवले. खेडकरांच्या घरातीलच एक सदस्य म्हणून त्यांना सगळ्यांनीच जपले. याच फडात तब्बल विस वर्षे काम करून कमळाबाई यांनी वयोमानपरत्वे निवृत्ती घेतली….

मधल्या काळात त्यांनी आपली मुलगी नंदा हिचे लग्न लावून दिले. तिदेखिल कमळाबाई यांच्याबरोबर तमाशा फडात काम करत असे.नंदाला दोन मुलगे व दोन मुली झाल्या. नंतर नंदाचे आजारपणात अकाली निधन झाले.
आता चारही नातवंडांची जबाबदारी कमळाबाई यांनी फक्त स्विकारलीच नाही, तर त्यांचीही लग्ने लावून दिली.
दोन्ही नाती आपापल्या संसारात रममाण झाल्या आहेत. तर एक नातू खाजगी नोकरी करतोय,
आणि एक नातू अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस खात्यात पि.एस.आय.पदावर मोठ्या जबाबदारीने काम करत आहे.आता कमळाबाईंचे वय ऐंशीच्या वर आहे. सविंदने,ता.शिरूर जि.पुणे येथेच त्या स्थिरावल़्या आहेत. सर्व नातवंडे त्यांना हवे नको ते मनापासून पाहात असतात.

याशिवाय महाराष्ट्र शासनाचे त्यांना जेष्ठ कलावंताचे मासिक मानधन चालू आहे.
एकूणच सर्व काही आलबेल आहे !!

नकळत्या वयात आईवडिलांचे छत्र हरपल्यानंतर,पोटात आग घेऊन दिशाहीन अवस्थेत भटकणाऱ्या एका अनाथ मुलीला तमाशाने आश्रय दिला,तिला जगणे शिकवले.तिची पोटाची खळगी तर भरलीच,याशिवाय जीवनात स्थिरता व तिला सामाजिक ओळखदेखील दिली.
…आणि हेच तमाशाचं मोठेपण आहे !!

जेष्ठ तमाशा अभिनेत्री कमळाबाई चव्हाण सविंदनेकर यांना उत्तम आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…
🙏🙏🙏
✍🏻 -बाबाजी कोरडे
(लोककलावंत व तमाशा अभ्यासक)
मा.सदस्य, राज्य सांस्कृतिक धोरण समिती. (लोककला उपसमिति) महाराष्ट्र शासन

संपर्क- 9730730146

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.