विहिरीत पडलेल्या बिबट प्राण्याची जगण्याची धडपड!!
मा. सैनिक श्री.रमेश खरमाळे यांच्या लेखणीतून साभार...

विहिरीत पडलेल्या बिबट प्राण्याची जगण्याची धडपड!!
मेंढ्यांचा वाडा तळ ऊसाशेती लगत असल्याने तो तेथेच दबा धरून बसला होता. पोट भरण्यासाठी त्याची ती धडपड होती. दिवसा बाहेर पडावं तर माणसाची भिती त्यामुळे पोटात भुकेची पडलेली आग शांत करायची म्हटले तर रात्री शिवाय पर्यायच नाही. तसा तो रात्रीच संचार करणारा प्राणी असल्याने दिवसभर आराम व रात्री संचार हा त्यांचा नियमच. तो दबा धरून बसलेल्या ठिकाणी पुढे विहीर आहे हे त्याच्या बहुतेक लक्षात आलेच नसावे. तसं त्याचं वय जेमतेम दिड वर्षच. आईच्या कुशीतून बाहेर पडून कुठेतरी शिकारीच शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे शिकार किती लांबून करावी व शिकारीला किती जवळ येऊन झडप घालावी किंवा किती जवळ जाऊन हल्ला करावा याचं फारसं ज्ञान त्याला अवगत नसावं. मेंढ्यांसोबत फिरणारा कुत्रा फिरत फिरत त्याच्या समोर येताच क्षणी या बाहादरान त्यावर झडप घातली खरी परंतु भक्षापर्यंत उडी न जाता तो विहीरीतच पडला असावा. मग काय एक जीव वाचला खरा परंतु स्वतःचाच जीव धोक्यात सापडला व येथून त्याच्या जगण्याची धडपड सुरू झाली.
रात्री पडला की पहाटे माहीत नाही परंतु तेव्हापासून मात्र तो त्या पाण्यात आधार नसल्यामुळे पोहतच राहीला. दुपारी २ वाजता शेतकरी विहिरीचा चालू असलेला विजपंप बंद करून विहीरीत डोकावून पाहिले की पाणी पातळी कितपत खोल गेली आहे तेव्हा हे महाशय पोहताना निदर्शनास पडले. मग काय गावाला कळायला वेळ थोडाच लागणार होता. लहान मुलांना घेऊन गाव गोळा होऊ लागला. काठी टेकवत टेकवत तर काही वृद्ध शेवटचं एकदाच तरी पाहु बिबट्या म्हणून विहिरीकडे येऊ लागले. बाहेरच्यांना बिबट्या पहायला मिळणार म्हणून आनंद झाला होता तर पाण्यात पोहणा-या बिबट्याला मात्र आता आपला जीव जाणार याची भिती वाटू लागली होती. जमा झालेल्या गर्दीत पण काही दर्दी लोक होती की ज्यांना आपल्या जीवा प्रमाणेच त्याच्या जीवाची काळजी वाटत होती व तो वाचावा म्हणून ते प्रयत्न करु लागले होते. मात्र इतरांना मात्र एवढंच माहीत होतं की हा प्राणी म्हणजे फार भयंकर आहे. यापासून मनुष्याला फार मोठा धोका आहे. हे प्राणी संपले म्हणजे आपला धोका टळेल व आपणास अधिक सुरक्षित जीवन जगता येईल. त्यांना हे माहीतच नव्हतं की हे प्राणी टिकलेत/ जगलेत म्हणून दोन पायाचा माणूस नावाचा प्राणी जीवंत आहे. बिबट्या मुळे आम्ही सुरक्षित आहोत म्हणून. बिबट्या मुळे आमची शेती सुरक्षित आहे म्हणून. चो-यांपासुन रात्री सुरक्षित आहे म्हणून. कारण जीव चक्रात हा महत्त्वाचा एकमेव प्राणी उरलाय म्हणून. तो जर संपला तर उंदीर, घुस, ससे, माकडे, रानडुकरे, मोकाट कुत्री, डुकरे आम्हाला शेती करून देणार नाही हे थोडच माहीत आहे त्यांना? कारण या प्राण्यांची संख्या एवढी वाढेल की शेती करण फार अवघड होऊन बसेल. आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे व या शेतीचे रक्षण करणारा हा बिबट एकमेव जीव सध्या मोठ्या प्रमाणात असल्याने तो त्या प्राण्यांची जास्त प्रमाणात उत्पत्ती होऊ देत नाही त्यांना मारून खातो. शासन यास जगविण्यासाठी विविध योजना देत आहे. शेळ्या, मेंढ्या, वासरे, गाया बैले व मनुष्य यांची शिकार झाली तर नुकसान भरपाई देते याच्या पाठीमागे काहीतरी मोठे कारण असु शकते हा पण कुणी विचार केला पाहिजेच की? हा विचार करणारी माणसं फार थोडी असतात व आज जमलेल्या गर्दीत अशाच विचारांची जबाबदार माणसं होती की त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
पोहुन पोहुन दमलेला बिबट तोंडांत इलेक्ट्रॉक कॅबल धरून जगण्यासाठी धडपड होता. तोंड दुखु लागले की पुन्हा पोहत होता. अशा वेळी मदतीला धावून आलेल्या माणसांनी त्याला टॉमेटोचे कॅरेट विहीरीत सोडून त्याला आधार दिला. तो लहान बाळा सारखा त्यात बसून आरामशीर थोडावेळ झोपी गेला. काही वेळातच वनविभाग रेस्कु टीम पोहचली व पिंजरा खाली सोडताच विना विलंब तो त्यात बसून गावकऱ्यांनी केलेल्या मदतीच्या आधारे ओढण्यात आलेल्या पिंजऱ्यात बसून तो वर आला.
जुन्नर तालुक्यातील विविध गावांत बिबट मानव संघर्ष जरी पहायला मिळत असला तरी बिबट्यावर प्रेम पण ते तेवढेच करताना पहायला मिळतात. रोज कुठे कुठेतरी त्यांना बिबट्याचे दर्शन घडतं असतेच. त्यामुळे बिबट्या सोबत आता ते आनंदाने सहजीवन जातानाचा अनुभव पहायला मिळत आहे. बिबट्याचे महत्त्व समजू लागल्यामुळे भिती जरी वाटत असली तरी त्यास जगविण्यासाठी ते निस्वार्थीपणे मदतीचा हात पुढे करतात याचा मात्र सार्थ अभिमान वाटतो.
हे पक्षी प्राणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे खरे आज गरजेचे आहे. अन्यथा येणारा काळ हा फार भयंकर असणार आहे. आज आपणात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची थोडीफार ताकद आपल्यात आहे ती या निसर्ग वैभव थोडेफार शिल्लक आहे म्हणूनच ते निसर्ग वैभव जर संपलेच तर भविष्यात जगणं फार कठीण होऊन बसेल. त्यामुळे निसर्ग वैभव जतन आणि संवर्धन करण्यासाठी योगदान द्या.🌳🌳
✍️ रमेश खरमाळे, माजी सैनिक
८३९०००८३७०