धामणी (ता.आंबेगाव) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा!!

बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनात ‘अंतरिक्ष योद्धा सुनीता विलियम्स’ पुस्तकाचे प्रेरणादायी प्रकाशन !!

बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनात ‘अंतरिक्ष योद्धा सुनीता विलियम्स’ पुस्तकाचे प्रेरणादायी प्रकाशन !!
गोवा हिंदी अकादमीच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलन व हिंदी अध्ययन यात्रा या उपक्रमांतर्गत थायलंडच्या बँकॉक शहरात एक भव्य व प्रेरणादायी संमेलन संपन्न झाले. या वेळी (मएसो ) च्या सौ . विमलाबाई गरवारे प्रशालेच्या शिक्षिका लेखिका केशर जाधव लिखित ‘अंतरिक्ष योद्धा सुनीता विलियम्स’ या हिंदी भाषेतील प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
हे प्रकाशन बँकॉक येथील हॉटेल प्रिन्स्टनच्या सभागृहात पार पडले. थायलंड मधील भारताच्या दूतावासातील हिंदी विभाग प्रमुख व ग्लोबल इंडिया इंटरनॅशनलच्या शिखा रस्तोगी यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झाले. या वेळी अजय रस्तोगी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष उस्मान मुलानी, संमेलनाध्यक्ष कैलास जाधव, प्रमुख अतिथी अॅड. प्रभाकर औटी, अॅड. विजय गोरडे, श्री. राजेंद्र सातपुते, हे मान्यवर उपस्थित होते.
या संमेलनात अनेक हिंदी अध्यापकांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना शिखा रस्तोगी म्हणाल्या, “अंतरिक्ष योद्धा सुनीता विलियम्स हे पुस्तक प्रत्येक वाचकासाठी विशेषतः विद्यार्थी, युवक व युवतींसाठी प्रेरणादायी ठरेल. यामध्ये भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते. थायलंडमध्ये गुरूजनांप्रती असलेली नम्रतेची परंपरा अत्यंत प्रशंसनीय आहे. ‘हसते शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात असे संमेलन होणे हे अभिमानास्पद आहे.”
संमेलनाध्यक्ष कैलास जाधव म्हणाले, “बँकॉकमधील या संमेलनामुळे हिंदी भाषा जागतिक स्तरावर गाजत आहे. पुस्तक प्रकाशन व पुरस्कार समारंभामुळे संमेलनाला एक वेगळे व प्रतिष्ठित स्वरूप लाभले आहे.”
लेखिका केशर जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “अंतरिक्ष योद्धा सुनीता विलियम्स या पुस्तकात सुनीता विलियम्स यांची जिद्द, आत्मविश्वास, कठोर प्रशिक्षण, स्पेस वॉक, स्पेस शूट, अंतराळ प्रवास व यशस्वी पुनरागमन यांचे अत्यंत प्रेरक चित्रण करण्यात आले आहे. तसेच नासा, इस्रो आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थांमधील नारीशक्तीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवकुमार पांढरे यांनी तर आभार प्रदर्शन किसन भोंग यांनी केले.
हे संमेलन व प्रकाशन सोहळा हिंदी भाषा व साहित्याच्या जागतिक प्रसारासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.

