आंबेगाव तालुक्याचे कोहिनूर आय.पी.एस. सुरेशरावजी सावळेराम मेंगडे यांची पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून नियुक्ती!! मुख्य दक्षता अधिकारी, सिडको नवी मुंबई पदाचा कार्यभार !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावचे सुपुत्र आय.पी.एस.सुरेशरावजी सावळेराम मेंगडे यांची पोलीस उप महानिरीक्षक (DIG) पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे सिडको नवी मुंबईचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित अधिकारी !!
आय.पी.एस.सुरेशरावजी मेंगडे यांनी आपल्या कार्यकाळात नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल २०२० साली त्यांना “राष्ट्रपती पोलिस पदक” हा देशातील सर्वोच्च पोलिस सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांनी विविध गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला असून करोडो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास यश मिळवले आहे. त्यांच्या अतिउत्कृष्ट तपास व कार्यक्षमतेची दखल घेत, हा सन्मान त्यांना देण्यात आला.
पर्यावरण संवर्धनात विशेष योगदान –
तुरची (ता. तासगाव, जि. सांगली) येथील दुष्काळी पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असताना सुरेशरावजी मेंगडे यांनी पाण्याची कमतरता असतानाही आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने २,५०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली. त्यांचे हे श्रम वृक्षसंवर्धनासाठी आदर्श ठरले असून, या केंद्राला २०१३ साली “वनश्री पुरस्कार” मिळाला. आज या परिसरातील वृक्ष २५ फूट उंच वाढले असून पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे आदर्श उदाहरण ठरले आहे.
सिडको नवी मुंबईमध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती
आता त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांची पोलीस उप महानिरीक्षक (DIG) म्हणून पदोन्नती करण्यात आली असून, सिडको नवी मुंबईमध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या व्यापक अनुभवाचा लाभ सिडकोच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी निश्चितच होईल.