मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने आंबेगाव तालुक्यात हाहाकार; तरकारी पिके, भुईमूग, जनावरांच्या चारापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान !!


पंचनामा पिंपळगाव (खडकी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव (खडकी) आणि परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून शेतजमिनींवरील बांध फुटले आहेत, परिणामी तरकारी पिके, भुईमूग, बाजरी आणि जनावरांचे चारा पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे गावातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

उन्हाळ्यात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिके घेत असल्याने या अवकाळी पावसामुळे त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक वाया गेली आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनींचे सपाटीकरण झाले असून, माती वाहून गेल्याने सुपीकता कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी थेट घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील वस्तूंचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.

शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेऊन युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. सचिन बांगर यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी, घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक सहाय्य दिले जावे, रस्ते आणि सार्वजनिक सुविधांचे पुनर्बांधणी कार्य त्वरीत हाती घ्यावे आणि शेतकऱ्यांना बियाणे व खते यासाठी विशेष आर्थिक साहाय्य मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

