आरोग्य व शिक्षणराजकीय

कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद- काँग्रेसचे थंडा थंडा कूल कूल!!

कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद- काँग्रेसचे थंडा थंडा कूल कूल!!

कर्नाटकात काँग्रेसला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याने ‘थंडा थंडा कूल कूल’ असंच काहीसं धोरण पक्षश्रेष्ठींकडून अवलंबलं जात आहे. त्यामुळे निवडणूक निकाल लागून तीन दिवस उलटल्यावरही कॉँग्रेसकडून ना मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली किंवा सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दोघे प्रमुख दावेदार आहेत. पण या दोन नेत्यांच्या पाठीशी असणाऱया आमदारांची संख्या आणि मुख्यमंत्री निवडीबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी सायंकाळी शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केली. या दोघांशी झालेल्या चर्चेचा तपशील खरगे सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना देणार आहेत. त्यानंतरच मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी सिद्धरामैय्या यांना पाठिंबा दिला आहे, तर सोनिया गांधी डीके शिवकुमार यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अद्याप निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. सर्व नेत्यांशी चर्चा करूनच ते एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

शिवकुमार पत्रकारांवर भडकले
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात शिवकुमार वेगळी वाट धरण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना जर कुठल्याही चॅनेलनं मी राजीनामा दिल्याच्या बातम्या चालवल्या तर त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन असा इशारा दिला. माझा पक्ष म्हणजे माझी आई आहे. माझे हायकमांड, माझे आमदार, माझा पक्ष तिथं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

बंगळुरूमध्ये विधिमंडळ पक्षाची आज बैठक
बुधवारी बंगळुरू येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाचे दावेदार डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना 50-50 फॉर्म्युला देण्यात आला आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.