आरोग्य व शिक्षण

पंचनामा स्पेशल रिपोर्ट – लग्नातील पंगत!!एक आठवण…..पुसून गेलेली पण मानत साठवलेली!!

पंगत ……………!

सामुदायिक लग्नसोहळ्यांच्या पूर्वी वधू किंवा वर पक्षाच्या घराजवळ वा तेथील वावरात मंडप टाकून लग्न सोहळा पार पडत असे…. त्यातही वधू पक्षाकडेच बहुतकरून लग्नसमारंभ पार पाडण्याची प्रथा होती. म्हणजे त्याकाळी त्या लग्नप्रक्रियेला नवरा किंवा नवरी उचलून जाणार असंही म्हटलं जायचं…!!जुन्या काळात वऱ्हाडही बैलगाडीतूनच जायचं.पुढे त्यात काळाप्रमाणे बदल होत गेला..!

त्यावेळी बहुतांश लग्न ही वैशाखातचं व्हायची.कोरडवाहू आणि जिरायती शेती असल्याने उन्हाळ्यात लोकांकडे भरपूर वेळ असायचा. लग्न जमवायची सुरुवात ही चार पाच महिने आधीपासून चालायची.वधू-वर सूचक मंडळ निर्माण होण्यापूर्वी एखाद्या मध्यस्थामार्फत दोन्ही कुटुंबातील वडीलधारी आणि भावकीतील जाणकार मंडळी या कामासाठी पुढाकार घ्यायची..!

उन्हाळ्यात वावरं नांगरून टाकलेली असायची…अशाच घराजवळच्या मोकळ्या वावरात मंडप घातला जायचा…..बस्ता बांधायला,आचारी ठरवायला,बाजार करायला बरीच अनुभवी लोकं होती….सगळे एकत्रच जायचे… सुरुवातीच्या काळात पुऱ्या-गुळवणी,कांद्याचं शाक,तेलच्या असा बेत असायचा. पुढे त्यात आमटी भात, गुळाची लापशी किंवा शिरा असा बदल झाला….नंतरच्या काळात डाळ-भात, शाक आणि बुंदी इथपर्यंत त्याचा प्रवास पाहिला मिळाला.. ..!

साखरपुडा आणि टिळा झाला की स्टेजवरूनच ‘पंगत’ धरायला सूचना यायची.बसल्याजागीच लोकं आडवं फिरायचे. वाढपीही भावकीतीलच तरुण पोरं असायची.. . पळसाच्या पानाच्या सपाट पत्रावळ्या होत्या…पाणी प्यायला ग्लासही नसायची..जेवण उरकल्यावरच पाणी मिळायचं…. खटारगाडी शिपाई लावून उभी केलेली असायची… त्यात दोन टिपाडं असायची पाण्याने भरून ठेवलेली…धूळ, कचरा पडू नये म्हणून उपरण्याने झाकून ठेवलेली… वर पाणी द्यायला एक जण असायचा…! वाढतानाही एका पंगतीत चार जण असायचे बादल्या घेऊन…पहिला भात, डाळ,शाक नंतर बुंदी असा क्रम असायचा…वाढून झाल्यावर पंगत सुरू होण्यापूर्वी कोणी जेष्ठ व्यक्ती माईकवर ‘अलंकापुरी’श्लोक म्हणायचा.नंतरही जेवण संपेपर्यंत काही जण अभंग म्हणत राहायचे….!! जेवायला बसल्यावर पत्रावळ उडू नये म्हणून त्यावर ढेकूळ ठेवायचं मग पत्रावळीवर भाताचं आळं करून त्यात डाळ घ्यायची… कधी कधी ते आळं फुटून डाळीचा वगळं पार बाहेर जायचा…! तेव्हा लोकं दणकून जेवायची एकही वाढी सोडत नव्हते… शेवटच्या फेरीतही भात चालला….बुंदी चालली असं म्हणायची पद्धत होती….वाढपेही लोकांना प्रेमाने भरभरून आणि पोटभर जेवायला घालायचे..!

नंतरच्या काळात सामुदायिक विवाहसोहळे सुरू झाले तरी त्यातही ‘पंगत’होती.
पण तिची लज्जत आता कमी झाली होती….! होणाऱ्या गर्दीमुळे किंवा अन्य काही कारणांनी बरेच जण पंगतीत जेवण करण्याचं टाळू लागली….! आतातर टेबल संस्कृती उदयाला आल्यामुळे जेवणाची पूर्ण पद्धत बदलली. एसी हॉल,मंगलकार्यालये आणि त्यातही पॅकेज पद्धत रूढ झाली…..नवनवीन पदार्थ दिसू लागले…. नेमकं काय खावं याची पंचाईत झाली… आता अशा सोहळ्यांमध्ये अनेक पदार्थ ताटात दिसतात पण त्याला वावरामधील ढेकळातल्या पंगतीतील बुंदीची चव नाही हेही तितकंच खरं आहे…!

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.