
सकाळी महाविद्यालय, दुपारी शेतात काम; विशाल कुऱ्हाडे, आर्यन बुळे, यश रोडे आणि साहिल वायकर यांची स्वावलंबनाची प्रेरणादायी वाटचाल
पंचनामा प्रतिनिधी – लाखनगाव : शिक्षण घेऊन आयुष्यात मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगतानाच आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत स्वतःच्या मेहनतीतून शिक्षणाचा खर्च भागवणाऱ्या लाखनगाव येथील चार मित्रांचा प्रेरणादायी आदर्श समोर आला आहे. विशाल कुऱ्हाडे, आर्यन बुळे, यश रोडे आणि साहिल वायकर या चार मित्रांनी शिक्षणासोबतच शेतीच्या कामात स्वतःला झोकून देत स्वावलंबनाचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
या चार मित्रांपैकी तिघे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, तर एकजण अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी कोणावर अवलंबून न राहता कष्टाचा मार्ग स्वीकारला आहे. शेतात खत पांगवणे, वावर बांधणे, ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवणे तसेच शेतीतील विविध छोटी-मोठी कामे ते स्वतः करतात. विशेष म्हणजे, या कामातून मिळणाऱ्या पैशांतून शाळा-महाविद्यालयाची फी भरण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहेत.
सकाळी ज्ञानार्जन, दुपारी कष्टाची मशागत!
या चार मित्रांचा दिनक्रम तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. सकाळी महाविद्यालयात जाऊन शिक्षण घ्यायचे आणि दुपारी घरी परतल्यानंतर थेट शेताची वाट धरायची, असा त्यांचा नित्यक्रम आहे. महाविद्यालयाला सुट्टी असेल तर संपूर्ण दिवस शेतात काम करून ते कुटुंबाला हातभार लावतात. शिक्षण आणि शेती या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी मेहनतीची कास सोडलेली नाही.
मजुरांची कमतरता; तरुणांच्या कष्टांचा शेतकऱ्यांना आधार!
यंदा कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने लाखनगाव, देवगाव, पोंदेवाडी, काठापुर, लोणी आणि धामणी परिसरात कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. मात्र, शेतीकामासाठी मजुरांची कमतरता जाणवत असून एका मजुराला दररोज ६०० ते ७०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. अशा परिस्थितीत हे चार मित्र स्वतः शेतीकामात सहभागी होत असल्याने शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळत आहे.
कष्टातून शिक्षण, जिद्दीतून यशाचा मार्ग!
शिक्षणासाठी दुसऱ्यापुढे हात न पसरता स्वतःच्या कष्टातून फी भरण्याची जिद्द, आई-वडिलांच्या घामाची जाणीव आणि शेतीविषयी असलेली आपुलकी या चार मित्रांच्या कृतीतून स्पष्टपणे दिसून येते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नांना गवसणी घालता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
आजच्या तरुण पिढीसमोर केवळ शिक्षणाचेच नव्हे, तर श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, कुटुंबाप्रती जबाबदारी आणि शेतीविषयी आदर यांचेही सुंदर उदाहरण विशाल कुऱ्हाडे, आर्यन बुळे, यश रोडे आणि साहिल वायकर यांनी ठेवले आहे. त्यांच्या या जिद्दीचे आणि कष्टाचे लाखनगाव परिसरातून कौतुक होत आहे.



