
पंचनामा प्रतिनिधी – राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे चटके आता ग्रामीण भागातील लोककलेलाही बसू लागले आहेत. यात्रा-जत्रांच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन आणि समाजप्रबोधन करणाऱ्या तमाशा फडांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वाढता खर्च, अपुरी बिदागी आणि रसिकांच्या बदलत्या प्रतिसादामुळे तमाशा फड चालविणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत असल्याची खंत अभिनयसम्राट मा. वसंतराव नांदवळकर यांनी व्यक्त केली.
दि. २४ नोव्हेंबर रोजी शेटफळगढे (जि. पुणे) येथे नांदवळकर तमाशा फडाला सदिच्छा भेट दिली असता त्यांनी तमाशा कलेच्या सद्यस्थितीवर मनमोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले, “दुष्काळाच्या झळा आता तमाशा फडालाही बसू लागल्या आहेत. पुढील काळ कसा असेल, हे आज सांगता येत नाही. यात्रा कमिट्या दुष्काळाची कारणे सांगून सुपारीची बिदागी वाढविण्यास तयार होत नाहीत. मात्र, तमाशा फडाचा दैनंदिन खर्च काही थांबत नाही. आजच्या काळात कोणतीही वस्तू स्वस्त राहिलेली नाही. अशा परिस्थितीत फड चालवायचा तरी कसा, हा मोठा प्रश्न आहे.”
वगनाट्य हीच तमाशाची खरी ओळख!
तमाशा कार्यक्रमाच्या सादरीकरणाबाबत बोलताना नांदवळकर म्हणाले की, यात्रा कमिट्यांनी गावात आलेल्या तमाशा फडाचा कार्यक्रम कशा पद्धतीने सादर व्हावा, याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने गाण्यांच्या कार्यक्रमानंतर वगनाट्य सादर होणे गरजेचे आहे. केवळ गाण्यांवर कार्यक्रम संपविण्याची अट घालू नये. वगनाट्य ही तमाशाची प्रमुख ओळख असून, त्यातून समाजप्रबोधन आणि समाजघडणीचे महत्त्वपूर्ण कार्य घडत असते.
“शेवटपर्यंत रसिकांनी थांबून वगनाट्यांचा आनंद घ्यावा, अशी मनापासून इच्छा आहे. समोर रसिकच नसतील तर वगनाट्य सादर करायचे कुणासाठी? नांदवळकर तमाशा फडाकडे अनेक दर्जेदार वगनाट्ये आहेत. हजेरीच्या कार्यक्रमातही संपूर्ण वगनाट्ये सादर केली जातात,” असे त्यांनी सांगितले.
जुन्या-नव्या कलावंतांचा दमदार संच
नांदवळकर तमाशा फडामध्ये जुन्या आणि नव्या पिढीतील अनुभवी, कसलेले व गुणवत्ताधारक कलावंत कार्यरत आहेत. सर्व कलाकार एकजुटीने आणि मनापासून रंगमंचावर आपली कला सादर करतात. रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आवश्यक असलेली कलात्मक तळमळ या फडातील प्रत्येक कलाकारामध्ये दिसून येते.
विनोदसम्राट मा. रवींद्र पिंपळे हे आजारी असतानाही रसिकांसाठी आपले योगदान देत आहेत. संगीतकार व गायक मा. वैभव पिंपळे हेही कलेच्या क्षेत्रातील विविध उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत असतात. काजल नांदवळकर, राजेंद्र नांदवळकर, जितेंद्र नांदवळकर, दीपक नांदवळकर, जयवंत नांदवळकर, वैभव पिंपळे व अन्य कलाकार नांदवळकर तमाशा फडाची परंपरा जपण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. फडाचे व्यवस्थापक गुरुवर्य बोडरे गुरुजी यांचे योगदानही मोलाचे आहे.
लोकाश्रय आणि राजाश्रयाची गरज
तमाशा ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. यात्रा-जत्रांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या या लोककलेला टिकविण्यासाठी यात्रा कमिट्या, रसिक प्रेक्षक आणि शासनाचा राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवतानाच तमाशा फड आर्थिक संकटात सापडणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे.
यात्रा कमिट्यांनी योग्य बिदागी द्यावी, तर रसिकांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहून कलाकारांना प्रतिसाद द्यावा. लोकाश्रय आणि राजाश्रयाच्या बळावरच ही समृद्ध लोककला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचू शकते. दुष्काळाच्या झळा तमाशा कलेला बसू नयेत, हीच अपेक्षा व्यक्त करीत नांदवळकर तमाशा फडाला चालू हंगामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
– राजेंद्र डी. मोरे, बारामती


