
पुणे : महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनकल्याण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गृहराज्यमंत्री (शहरी) योगेश कदम आणि गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरज नंदकुमार ढवळे आणि मिलिंद सोनवणे यांनी होमगार्ड सैनिकांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्न मंत्र्यांसमोर मांडले.

होमगार्ड सैनिकांना चार-पाच दिवसांच्या बंदोबस्ताचे मानधन मिळण्यासाठी अनेकदा चार ते पाच महिने प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे सैनिकांना दरमहा मानधन वेळेत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्ड सैनिकांना १८० दिवस काम देण्याबाबत शासन निर्णय काढला होता. मात्र, पाच महिन्यांतच या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती उठवून १८० दिवसांचे काम तातडीने पूर्ववत करावे, तसेच महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिकांना जास्तीत जास्त ११ महिने काम उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणीही करण्यात आली.

गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पंकज भोयर यांच्यासोबत झालेली चर्चा सकारात्मक झाली असल्याचे सुरज ढवळे यांनी सांगितले. दोन्ही मंत्र्यांनी होमगार्ड सैनिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच’
होमगार्ड सैनिकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा थांबविण्यात येणार नाही. गृह खात्याकडून लवकरच महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिकांसाठी सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा मिलिंद सोनवणे यांनी व्यक्त केली. दोन्ही गृहराज्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घातले असून शासन दरबारी प्रलंबित मागण्या निश्चितपणे मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


