
पंचनामा प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत आयोजित विविध जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. फुलगाव-पुणे येथील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा, शिरूर येथील रायफल शूटिंग स्पर्धा आणि लोणी देवकर, ता. इंदापूर येथील कुस्ती स्पर्धा, नारायणगाव येथील मैदानी स्पर्धेत,समर्थच्या खेळाडूंनी पदकांची कमाई केली.
फुलगाव, पुणे येथे पार पडलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेज, बांगरवाडी-बेल्हे संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर समर्थच्या तीन खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.यामध्ये विघ्नेश पवार, ओम रोकडे आणि चिराग झिंजाड यांचा समावेश आहे.
सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेजची खेळाडू कुमारी इशिता काकडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, पुढील स्पर्धेसाठी तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
लोणी देवकर, ता. इंदापूर, येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत समर्थच्या तीन महिला कुस्तीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. समृद्धी जाधव हिने ६५ किलो वजनी गटात द्वितीय, तन्वी जाधव हिने ७२ किलो वजनी गटात द्वितीय, तर समीक्षा माळी हिने ७६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला.
नारायणगाव येथे पार पडलेल्या मैदानी स्पर्धेत समर्थच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध प्रकारांत प्राविण्य मिळविले. तिहेरी उडीमध्ये स्वरा लेंडे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ईश्वरी घोलप हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
४×४०० मीटर रिले स्पर्धेत स्वरा लेंडे, प्रांजल येवले, श्रावणी चौधरी आणि समृद्धी शेळके यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच ४०० मीटर हार्डल्समध्ये श्रावणी चौधरी हिने द्वितीय, तर समृद्धी शेळके हिने तृतीय क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संबंधित खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
समर्थच्या विद्यार्थ्यांनी मैदानी क्रीडा, क्रिकेट, रायफल शूटिंग आणि कुस्ती अशा विविध क्रीडा प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी करत संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर घातली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जि.प. सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
क्रीडा संचालक एच.पी. नरसुडे क्रीडा शिक्षक सुरेश काकडे,विनायक वऱ्हाडी व अश्विनी जगदाळे यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळाले.


