
पंचनामा प्रतिनिधी लोणी : वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने लोणी (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून ध्वनीचित्रफित दाखवून विद्यार्थ्यांना वन्यजीव, पशुपक्षी, निसर्ग व पर्यावरण संवर्धनाबाबत माहिती देण्यात आली.

वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांचे संवर्धन का आवश्यक आहे, तसेच वन्यजीव व मानव यांच्यातील सहअस्तित्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

वन विभाग पुणे, वनक्षेत्र कार्यालय मंचर अंतर्गत उपविभाग धामणी कार्यक्षेत्राच्या वनपाल नीलम चव्हाण, वनरक्षक अस्मिता शिंदे, तसेच पूजा कांबळे व योगेश निघोट उपस्थित होते. रेस्क्यू टीमचे आदेश देसाई व रोहिदास म्हसणे यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव बचावकार्याबाबत विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत अशोक जाधव, दिलीप वाघ व ओंकार कारे उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य सुनील थोरात यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. प्रोजेक्टरवरील ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून वन्यजीव आणि पर्यावरणाची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निसर्ग, पशुपक्षी, प्राणी व वन्यजीव यांच्याविषयी वेगळ्या पद्धतीने माहिती मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.



