सामाजिक

समर्थ फार्मसी मध्ये वन्यजीव सप्ताहाचे आयोजन ; सर्पदंशाबाबत अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक उपचारपद्धतीचा स्वीकार करा – डॉ.सदानंद राऊत

1011176672
1011176672

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव हे पर्यावरणीय समतोलाचे महत्त्वाचे घटक असून, त्यांचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वन्यजीवांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन, संवर्धनाची जाणीव आणि पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित करण्याचा संदेश या सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत ‘सर्पविषापासून औषधनिर्मितीपर्यंत’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. नारायणगाव येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी विद्यार्थ्यांना सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार, प्रतिविष उपचार तसेच सर्पविषाचा औषधनिर्मितीतील उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. राऊत यांनी सर्पविष व इतर विषारी पदार्थ यांतील शास्त्रीय फरक, सर्पविषाची रचना, त्यातील विविध घटक आणि त्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम यांची माहिती दिली. सर्पविषापासून प्रतिविष तयार करण्याची प्रक्रिया, त्यामागील वैज्ञानिक संकल्पना आणि सर्पदंशाच्या उपचारातील प्रतिविषाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

सर्पदंशाबाबत समाजात असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता योग्य प्रथमोपचार करून रुग्णाला तातडीने वैद्यकीय केंद्रात दाखल करावे. चुकीच्या पारंपरिक उपचारपद्धती, अंधश्रद्धा आणि उपचारास होणारा विलंब टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
सर्प हा पर्यावरणीय परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत डॉ.राऊत यांनी विषारी व बिनविषारी सापांची ओळख, सर्पदंशापासून बचावाचे उपाय आणि साप आढळल्यास घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. रात्री बाहेर पडताना प्रकाशाचा वापर करणे, योग्य पादत्राणे वापरणे, झुडपे व गवताळ भागात काळजी घेणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि सापाशी छेडछाड न करणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती त्यांनी दिली.

‘सर्पदंशामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे’ या उद्देशाने सुरू असलेल्या अभियानाच्या माध्यमातून गावोगावी तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये सर्पदंशाबाबत जनजागृती व प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली.

कार्यक्रमास संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.शुभम गडगे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा.वैशाली भुतांबरे यांनी आभार मानले.

1011111248

Related posts

शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे : प्रा.मोबीन तांबोळी

Chief Editor

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे येथे जागतिक योग दिवस साजरा

Chief Editor

मिडगुलवाडी गावाला जिल्हा परिषदेकडून घंटागाडी !!

Chief Editor

Leave a Comment