
पंचनामा लांडेवाडी प्रतिनिधी – भैरवनाथ पतसंस्थेच्या व्हिजन २०३२ अंतर्गत संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष श्री.शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्ग व संचालक मंडळाची दोन दिवसीय विशेष कार्यशाळा शिवसंकुल, लांडेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

ही कार्यशाळा स्कूल ऑफ इन्स्पायरेशनल लीडरशिप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेदरम्यान संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात सखोल विचारमंथन करण्यात आले. व्हिजन २०३२ अंतर्गत संस्थेचा विस्तार, सभासदकेंद्री सेवा, ठेवी व कर्ज व्यवसायाची वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कर्मचारी कौशल्यविकास, नेतृत्वगुणांचा विकास आणि संस्थेला अधिक सक्षम व आधुनिक वित्तीय संस्था बनविण्याच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेच्या पुढील दशकातील उद्दिष्टांची स्पष्ट दिशा निश्चित करताना “संस्थेची प्रगती ही प्रत्येक कर्मचारी, अधिकारी, संचालक आणि सभासदाच्या सहभागातूनच शक्य आहे”, हा विचार कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आला.


कार्यशाळेत कर्मचारी व संचालक मंडळामध्ये टीमवर्क, नेतृत्व, सकारात्मक दृष्टिकोन, जबाबदारीची जाणीव, ग्राहकसेवा आणि परिणामाभिमुख कार्यपद्धती याबाबत विविध उपक्रम व मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली.

संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करताना, बदलत्या आर्थिक व तंत्रज्ञानाच्या युगात संस्थेने नव्या संधींचा स्वीकार करून अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून पुढे जाण्याची गरज व्यक्त केली. नजीकच्या भविष्यकाळात संस्थेची उलाढाल तीन,साडेतीन हजार कोटींच्या पुढे नेण्याचा मानस केला.

संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन भविष्यकालीन संस्थेच्या वाटचालीची भूमिका विषद केली तसेच कर्मचारी वर्गाने आपली क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले.

व्हिजन २०३२ हे केवळ एक उद्दिष्ट नसून संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दोन दिवसीय कार्यशाळेमुळे कर्मचारी वर्ग व संचालक मंडळामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी नवीन ऊर्जा, स्पष्ट दिशा आणि एकजुटीची भावना निर्माण झाली आहे.

समारोप प्रसंगी एस आय एल संस्थेकडून भैरवनाथ पतसंस्थेच्या आगामी काळातील स्टॅटजी डॉक्युमेंट चे सादरीकरण करण्यात आले.



याप्रसंगी डायनालॉग इंडियाचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील, एस आय एल संस्थेचे संचालक डॉ. योगेश पवार, सतिश नायर, मानसी प्रभुदेसाई, काजल मालापुडी, उत्कर्ष जुनेजा व सहकारी, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सौ. कल्पना आढळराव पाटील, महेश ढमढेरे, हनुमंत तागड, अभिमन्यू लांडगे, सौ. शोभा आवटे, सौ.अंजली थोरात,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे, सर्व शाखाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
