सामाजिक

गणपती बाप्पाच्या आगमनाआधी लोणी (धामणी) गावावर कोसळला दुःखाचा डोंगर ; शकील सय्यद यांचा अपघाती मृत्यू ; बेल्हा-जेजुरी महामार्गावरील अपघाताने लोणी गाव हादरले

1010942064
1010942064

पंचनामा प्रतिनिधी – गणपती बाप्पाच्या आगमनाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण होत असतानाच लोणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बेल्हा-जेजुरी महामार्गावर पाबळजवळ गाडी घसरून झालेल्या अपघातात लोणी येथील तरुण उद्योजक शकील रशीद सय्यद (वय अंदाजे ३२ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन गणपती उत्सवाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण लोणी गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
शकील सय्यद हे मेहनती, मनमिळावू आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. आपल्या कष्टाने त्यांनी व्यवसायात ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबाचा आधार – शकील सय्यद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, भाऊ-बहिणी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेला कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. लहान मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याने ही घटना अधिकच वेदनादायी ठरली आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी घराघरांत तयारी सुरू असताना सय्यद कुटुंबावर आलेले हे दुःख मन हेलावून टाकणारे आहे. ज्या घरात सणाचा आनंद असायला हवा होता, त्या घरात आज अश्रू आणि आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणपती आगमन मिरवणूक शांततेत काढण्याचे आवाहन -शकील सय्यद यांच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर लोणी ग्रामपंचायतीने गावातील सर्व गणपती मंडळांना गणपती आगमन मिरवणूक शांतता, संयम आणि सामाजिक बांधिलकी जपत काढण्याचे आवाहन केले आहे.
गणपती उत्सव हा भक्ती, आनंद आणि एकोप्याचा सण आहे. मात्र, गावातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना आगमन मिरवणुकीत अनावश्यक गोंगाट, जल्लोष किंवा अनुचित प्रकार टाळून शिस्त आणि शांतता राखावी, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
सय्यद कुटुंबीयांच्या दुःखाचा विचार करून सर्व गणपती मंडळांनी सामाजिक संवेदनशीलता दाखवावी. गणपती बाप्पाचे आगमन शांततेत पार पाडून दिवंगत शकील यांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
संपूर्ण लोणी गाव शोकसागरात:- गणपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहावर शकील सय्यद यांच्या निधनाने दुःखाची छाया पसरली आहे. एका तरुणाचा अकाली मृत्यू ही केवळ एका कुटुंबाची हानी नसून संपूर्ण गावासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी घटना आहे.
आज लोणी गावातील प्रत्येकाच्या मनात शकील यांच्या आठवणी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत ग्रामस्थांनी एकजूट दाखवली आहे.

Related posts

संत निरंकारी मिशन-राजेवाडी शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३७४ जणांनी केले मानवतेप्रती रक्तदान…

Chief Editor

लावणी सम्राज्ञीच्या घुंगरांचा नाद पुन्हा घुमला… कलावंत शांताबाई च्या पुनर्वसनाला व अरुण खरात यांच्या पाठपुराव्याला जून 2026 ला तीन वर्ष पूर्ण

Chief Editor

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे संपन्न होणार भैरवनाथ यात्रा महोत्सव !!

Chief Editor

Leave a Comment