सामाजिक

लावणी सम्राज्ञीच्या घुंगरांचा नाद पुन्हा घुमला… कलावंत शांताबाई च्या पुनर्वसनाला व अरुण खरात यांच्या पाठपुराव्याला जून 2026 ला तीन वर्ष पूर्ण

1009954585

पंचनामा विशेष -केकाळी आपल्या पहाडी आवाजाने आणि मनमोहक नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या लावणी जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर (शांताबाई लोंढे) यांना अखेर तीन वर्षांच्या कायदेशीर आणि सामाजिक संघर्षानंतर हक्काचा सन्मान, निवारा आणि आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. कोपरगाव बसस्थानकावर भीक मागण्याची वेळ आलेल्या या लावणी सम्राज्ञीचे शासकीय संवेदनशीलतेमुळे आणि स्थानिक देवदूतांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे सन्मानाने पुनर्वसन झाले असून, हा प्रवास उपेक्षित लोककलावंतांच्या हक्कांची एक मोठी लढाई ठरला आहे.

व्हायरल व्हिडिओ आणि ‘या’ सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका
जून २०२३ मध्ये शांताबाईंचा कोपरगाव बसस्थानकावरील एक केविलवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. खान्देशातील तमाशा फड मालक शेषराव नाना यांनी हा व्हिडिओ कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते कलाप्रेमी अरुण खरात यांच्याकडे पाठवला व अधिक माहिती दिली.लगेचच अरुण खरात यांनी दोन दिवस कोपरगावात फिरुन शांताबाईंचा शोध घेतला. भेट झाल्यानंतर शांताबाई शी प्रदीर्घ चर्चा केली त्यावेळी शांताबाईंना लावणी गाण्याचा आग्रह धरून तिचे व्हिडिओ काढले त्यातला “या रावजी बसा भावजी” हा लावणीचा व्हिडिओ व शांताबाई ची संपूर्ण हकीगत अरुण खरात यांनी फेसबुक वर टाकली. ती फेसबुक पोस्ट व तो व्हिडिओ खूपच व्हायरल झाला. हा क्षणच शांताबाई च्या जीवनातील अंधार दूर करून आशेची नवी पहाट उगवणारा ठरला.

प्रथम उपचार,नंतर आधार
शांताबाईची गंभीर शारीरिक व मानसिक स्थिती पाहून अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉ. अशोक गावित्रे यांनी तातडीने त्यांना प्रथमोपचार व वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी शिर्डी येथील दवाखान्यात घेऊन गेले.त्यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शांताबाईंची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून साडी चोळी देऊन सन्मान केला.

हनुमान थिएटर गाजवणारा ‘तो’ सुवर्णकाळ
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मुंबईच्या लालबाग-परळ येथील प्रसिद्ध ‘हनुमान थिएटर’मध्ये शांताबाई कोपरगावकर यांच्या लावणीला रसिकांकडून मिळणारा ‘वन्स मोअर’ आणि टाळ्यांचा कडकडाट इतिहास जमा होता. भिका-भीमा सांगवीकर, शंकरराव कोचुरे, रसूल पिंजारी वडतीकर, धोंडू कोंडू सिंधीकर , हरिभाऊ अन्वीकर यांसारख्या दिग्गज तमाशा फडांमध्ये त्यांनी मुख्य लावणी नृत्यांगना व गायिका म्हणून नाव कमावले. हे सर्व तमाशा फड खान्देश भागातील असल्यामुळे शांताबाईचे खान्देश भागात नाव गाजले. पुढे त्यांनी त्यांच्या नावाचा “शांताबाई कोपरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ” असा स्वतंत्र तमाशा फड उभा केला. नृत्यांगना गायिका याबरोबरच त्या आता एका तमाशा फडाच्या मालकीण ही झाल्या होत्या. त्या काळी त्यांच्या फडावर ५० ते ६० कलाकार आणि कामगारांचा उदरनिर्वाह चालत होता. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यात शांताबाईचा चाहता वर्ग जास्त असल्याने त्या भागात शांताबाई च्या तमाशा फडाला जास्त मागणी होती.

अशिक्षितपणा नडला, गरिबीने रस्त्यावर आणले
शांताबाई अत्यंत गुणी कलावंत असल्या, तरी त्या अल्पशिक्षित होत्या. आर्थिक व्यवहारांची पुरेशी समज नसल्याचा फायदा घेत काही व्यावसायिक निर्मात्यांनी आणि जवळच्या लोकांनी त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली. वयोमानानुसार घुंगरू सुटले, हक्काचे घर गेले आणि नियतीने त्यांच्यावर थेट कोपरगाव बसस्थानकावर भीक मागून पोट भरण्याची अत्यंत दयनीय वेळ आणली. ज्या हातांवर कधीकाळी रसिकांनी नोटांची उधळण केली, त्याच हातांना नंतर दानासाठी पुढे करावे लागणे ही नियतीची क्रूर थट्टा होती, याची जाणीव या घटनेतून होते.

सामाजिक कार्यकर्त्याचा पाठपुरावा, माध्यमांचा रेटा आणि प्रशासनाची संवेदनशीलता
वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर ही बातमी चव्हाट्यावर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने दखल घेतली. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी स्वतः वृद्धाश्रमात जाऊन शांताबाईंची भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासकीय पुनर्वसन प्रक्रिया वेगाने राबवली गेली.

शासकीय योजनांचा लाभ
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने केंद्र पुरस्कृत कलाकार मानधन योजनेचा लाभ देऊन मानधनात वाढ करण्यात आली. दुबार रेशन कार्ड जीवित व ऑनलाइन करून शासनाच्या नियमाप्रमाणे अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात आला. तहसीलदारांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मंजूर केला. या शासकीय योजना अगदी वेगाने मंजूर करण्यात आल्या तर घरकुल जुलै 2024 मध्ये मंजूर करण्यात आले.

राजकीय नेते,पक्ष व सामाजिक संस्थांकडून मिळालेली मदत
त्यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी महिनाभराचे किराणा किट शांताबाई साठी आणून दिले. कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली तसेच त्यांच्या मातोश्री प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी वृद्धाश्रमात जाऊन शांताबाई ची भेट घेतली व साडी चोळी देऊन शांताबाई चा गौरव केला. माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी शांताबाईंना वृद्ध आश्रमात भरती करण्यासाठी खूपच मोलाची मदत केली. टीव्ही नाईन वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. अनेक दानशूर व्यक्तींनी शांताबाई च्या मदतीसाठी जाहीर केलेल्या बँक खात्यावरती आर्थिक मदत पाठवली. द्वारकामाई वृद्ध आश्रमाचे संचालक श्रीनिवास व सुधाभाभी यांनी शांताबाईला वृद्धाश्रमात प्रवेश देऊन हक्काचा निवारा दिला.

वैद्यकीय उपचारांची विशेष काळजी
शांताबाईच्या मानसिक आजारावरती शिर्डी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. ओंकार जोशी यांच्याकडे उपचार घेण्यात आले. शांताबाईंच्या डोळ्यांना वेदना होऊन अस्पष्ट दिसत असल्याने त्यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने स्थानिक ठिकाणी न करता नाशिक येथील तुलसी नेत्ररोग हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यावेळी कागदपत्र व इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी अरुण खरात व डॉ. अशोक गावित्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्यमंत्री निधीतून ५ लाखांची तातडीची मदत
ऑगस्ट २०२३ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत शांताबाईंना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचा तातडीचा धनादेश स्टेजवर बोलावून येथोचित सन्मान करून सुपूर्द केला या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या वृद्धापकाळातील औषधोपचाराचा मोठा प्रश्न सुटला तसेच शासकीय घरकुल योजनेच्या माध्यमातून त्यांना हक्काचे घर देण्याची प्रक्रियाही प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली. त्या करीता अरुण खरात यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला त्यानंतर नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी व बांधकाम अभियंता हर्षवर्धन सुराळकर यांचे हस्ते घरकुल मंजुरीचे पत्र अरुण खरात यांना देण्यात आले.

लोककलेचा सन्मान राखणे गरजेचे
अरुण खरात यांनी तात्काळ संवेदनशीलता दाखवली नसती आणि दोन दिवस शोध घेतला नसता, तर कदाचित महाराष्ट्राची एक महान लावणी सम्राज्ञी बस स्थानकाच्या कट्ट्यावरच विस्मरणात गेली असती. त्यांच्या या कार्याने माणुसकीचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
शांताबाई कोपरगावकर यांना मिळालेला न्याय ही महाराष्ट्राच्या मातीतील कलावंतांसाठी दिलासादायक बाब आहे. कलेचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या या ज्येष्ठ कलाकाराला उतारवयात सन्मान राखणे हे सुजाण समाजाचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि शासनाचे कर्तव्य आहे, हेच या हृदयस्पर्शी घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
घुंगरांचा नाद कधीच थांबत नाही तो काळाच्या ओघात मंदावतो मात्र समाजाने जर संवेदनशीलतेने साथ दिली तर विस्मृतीत गेलेल्या कलाकाराच्या आयुष्यातही सन्मानाची नवी पहाट उगवू शकते शांताबाई कोपरगावकर यांची ही कहाणी त्याच नव्या पहाटेची साक्ष देणारी आहे.

1009948090
1009850407

Related posts

लोणी (धामणी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला बाल आनंद मेळावा !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत झाली डिजिटल !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे उत्साहात संपन्न झाला प्रभू रामजन्म सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment