
मरणाशी का “खेळ” फुकाचा -जगावयाची “जिद्द” हवी…!विरुद्ध वाहती “वारे” जरी – उडावया का “सरहद्द” हवी..! संधीची आहे “मंदी” तरी -प्रयत्नांची “मुसंडी” हवी…!
पाखंडी असतील भले कांही- मनास आपुल्या रुंदी हवी…!
समर्थ रामदास स्वामीनी सांगीतल्या प्रमाणे “केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे..! यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे..!!
आयुष्यातील नागमोडी प्रवासात मानवाला भगवंताने ऊंच ऊंच उडण्यासाठी “पंख” नाही दिले.. परंतू दोन दोन पाय दिलेले आहेत. त्यामुळे त्या पायाने आपण पळण्याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा..जर आपल्याला पळता येत नसेल तर चालायला लागूया.. आणि जर चालताही येत नसेल तर रांगायला लागूया..परंतू नेहमी पुढे पुढेच जात राहू.. आपले विचार आणि दिशा बदलले.. तर सफलता आपलं स्वागत करण्यासाठी तयार आहे.. रस्त्यावर जर काटे, कंकर असतील तर एक चांगल बुट घालून आपण त्या रस्त्यावरून चालू शकतो पण जर त्या चांगल्या बुटातच जर एखादा खडा असेल तर कीतीही चांगला रस्ता असेल तर त्यावरून चालणे देखील मुश्किल होऊन जातं.. म्हणजेच आपली हार ही बाहेरील चुनौती मुळे नाहीतर आपल्या आतील कमजोरीमुळे होत असते.. आपले विचारच आपलं भविष्य ठरवत असतात.. म्हणूनच विचार बदलले तर आपले स्टार नक्कीच बदलतील…!
आयुष्यातील प्रवासात प्रत्येक जण रडत रडत जन्माला येत असतो..तरीपण हसत हसत जगायला काय हरकत आहे..!!
आनंदाचे क्षण कमी असले तरी दुःखाचा डोंगर विसरायला काय हरकत आहे..वादळात घरटे मोडणारच आहे..तरीपण परत काटया जुळवून बांधायला काय हरकत आहे..!! नशिबाला दोष देत जगण्यापेक्षा स्वत: नशीब घडवायला काय हरकत आहे..! जन्माला आलोय म्हणून जगण्यापेक्षा..जगण्याचा मनमुराद आनंद घ्यायला काय हरकत आहे..!!
झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच तो पुढे देखील येतो. आयुष्यातील प्रवासात सुख आणि दुःख दोन्ही सारखेच येतात आणि जातात. जीवनाचा झोपाळा मागे गेला म्हणून घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही..तो जितक्या वेगात मागे जातो तितक्याच वेगात पुढे पण येतो..
कुणीतरी त्या बर्फाला विचारले की आपण इतके थंड कसे..? तेंव्हा त्या बर्फाने अतिशय सुंदर उत्तर दिले.. “माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण पाणी मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ..?” आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांचा आदर करू आणि समजून घेऊ..!!
कुंडलीत असलेला भ्रामक “शनी” मनात फीट बसलेला मनाचा राजा “मनी” आणि आपल्या जीवनप्रवासातील “दुश्मनी” या तीनही गोष्टी आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी खूपच हानिकारक असतात.. खरंतर बदला घेण्यात काय मजा आहे खरी मजा तर यात आहे की तुमच्या विचार सामर्थ्याने तुम्ही समोरच्या व्यक्तीचं मतपरिवर्तन /मनपरिवर्तन करून दाखवाल.. आपली ईच्छा अशी असते की उडण्यासाठी पंख हवेत.. आणि पाखरांची ईच्छा असते की राहण्यासाठी घर हवे.. माणसाची खरी ओळख ही त्याच्या कर्मानुसारच होत असते. कारण महागडे कपडे तर शोरूम्स मधील निर्जीव अश्या पुतळ्यांना पण घालायला मिळतात…म्हणूनच कवी विंदा करंदीकर म्हणतात की “करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवटचा देताना ..” निरोप शेवटचा देताना..!!
शर्यतीत जिंकणाऱ्या त्या घोड्याला हे पण माहित नसते की “जिंकण” म्हणजे नेमक काय असतं? तो तर मालकाने दिलेल्या चाबकाच्या फटक्या मुळे तो धावतो आणि ती शर्यत जिंकतो. म्हणूनच जीवनात आपल्याला जेंव्हा एखादी समस्या आली आणि समोर कोणताच मार्ग दिसत नसेल तर समजून जायचं की या जगाचा (बादशाह) मालक आपल्याला जिंकवण्यासाठीच तयार करतोय..!!
खरंच आयुष्यात आपल्याला जे जे मिळालेले आहे ते जर भगवंताचा प्रसाद म्हणुन स्विकार केला आणि ग्रहण केला तर आयुष्य सुंदर व सुगंधित बनून राहील.कोणतीही चिरफाड नाही, चिडचिड नाही.. प्रसाद हातात आला की तो पटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही, ताजे, शिळे याचा विचार नाही. त्याला पेढा आणि मलाच गुळ का? असे म्हणत नाही..तो घेतो..खातो आणि धन्य होतो..प्रसाद हा जर देवाचा प्रतिसाद मानला तर त्यात अजुन मधुरता येते. मंदिरात मिळालेल्या प्रसादाची आपण चिकित्सा तर राहोच, चर्चा पण करत नाही..कुणाला शेंगदाणे मिळतात, कुणाला बत्तासे, कुणास काजूचा तुकडा असलेला शिरा तर कुणास करपलेला शिरा.. आयुष्यातील प्रसंग त्या प्रसादासारखे मानावेत…. म्हणजे आयुष्य अधिक सुंदर बनेल..!!
श्री. निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे, कारेगावकर…
छत्रपती संभाजीनगर
मो. नं. – 9881084320


