
पंचनामा प्रतिनिधी – रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या.
विद्यार्थिनींनी विविध रंगांच्या व आकर्षक सजावटीच्या राख्या तयार करून त्या देशाच्या सीमेवर सेवा बजावणाऱ्या जवानांना पाठविण्याचा उपक्रम राबविला. देशाच्या रक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहून सेवा बजावणाऱ्या सैनिकांशी भावनिक नाते निर्माण व्हावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती व सामाजिक बांधिलकीची भावना वाढावी, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे प्राचार्य कांताराम टाव्हरे व पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी सांगितले.
या उपक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत जवानांविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त केली. ‘देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांना आमच्या प्रेमाची व शुभेच्छांची ही राखी,’ अशा भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
या उपक्रमासाठी प्रा. कल्पना चव्हाण-माखरे व प्रा. श्वेता डोके-कानडे यांनी विशेष सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, खजिनदार प्रकाश तापकीर व संचालक सुनील वळसे पाटील यांनी शिक्षक व विद्यार्थिनींचे कौतुक केले.
जवानांना राख्या पाठवून रक्षाबंधनाचा सण देशसेवेच्या भावनेशी जोडण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.




